दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते.
लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे मा.एन. दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत.
स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. ‘जाल’ (१९५२) या चित्रपटाची पाश्र्वभूमी गोव्याची असल्याने या चित्रपटाचं संगीत गोमंतकीय लोकसंगीतावर आधारित होतं. सचिनदांना एन. दत्ता हे गोवेकर असल्याचे माहीत असल्याने त्यांनी गोवन लोकसंगीतावर आधारित गाण्यांना चाली लावण्याचं स्वातंत्र्य एन. दत्ता यांना दिलं होतं. दत्ताजींचा स्वभाव विनम्र व भिडस्त असल्याने त्यांनी अशा गोष्टीचं भांडवल करून चालींचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कधीच केला नाही.
‘टॅक्सी ड्रायव्हर’पासून एस.डी. बर्मन यांचे दुसरे साहाय्यक बनलेले जयदेव मात्र परखड स्वभावाचे असल्याने अशा गोष्टी ते स्पष्टपणे बोलून दाखवत. ‘बुजदिल’ व ‘जाल’ या चित्रपटांचे निर्माते असलेल्या फत्तेचंद यांनी एन. दत्तांची प्रतिभा ओळखली होती म्हणूनच १९५५ साली राज खोसला दिग्दर्शित ‘मिलाप’ या चित्रपटाच्या संगीताची धुरा त्यांनी विश्वासाने त्यांच्यावर सोपविली होती. एन. दत्तांनी फत्तेचंद यांचा विश्वास सार्थ ठरवीत पदार्पणातच अप्रतिम कामगिरी केली. या चित्रपटातील ‘ये बहारों का समां, चांद तारों का समां’ ही लता मंगेशकर व हेमंतकुमारने वेगवेगळी गायलेली गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाते हो तो जाओ पर जाओगे कहां’, ‘हमसे भी कर लो कभी कभी तो मिठी मिठी दो बातें’ व ‘चाहे भी जो दिल तो जाना न वहां’ ही सोलो गाणी व रफीबरोबर गायलेलं ‘बचना जरा ये जमाना है बुरा’ या युगुलगीताने अक्षरश: धमाल उडवून दिली होती.
बी. आर. चोप्रांच्या ‘धूल का फूल’ या चित्रपटात एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशा भोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते.
एरवी दोन गाण्यांतलं साधम्र्य सहजासहजी लक्षात येणार नाही अशी बहारदार सुरावट व ऑर्केस्ट्रेशनची ट्रीटमेंट एन. दत्तांनी या गाण्याला दिली आहे. कोरसचा कल्पक वापर, महेंद्र कपूरचं ‘हमिंग’, लता मंगेशकरांचे उन्मनी आलाप व लडिवाळ तानांची आतषबाजी मन मोहून टाकते. अंतऱ्यात एके ठिकाणी साहिरच्या ‘परछाईंयां’ या दीर्घ काव्यातल्या काही आशयघन ओळी ‘रवां है छोटीसी कश्ती.’ जेव्हा डोकावतात तेव्हा एन. दत्तांमधला संगीतकार ज्या हळुवार व तरल अंदाजात त्यांना स्वरात गुंफताना दिसतो, ते पाहून त्यांच्या बहुआयामी प्रतिभेला मनापासून सलाम करावासा वाटतो. ‘दीदी’ (१९५९) या चित्रपटातली एन. दत्ता यांची ‘बच्चों तुम तकदीर हो कलके हिंदूस्तान की’ व ‘ मेरे भैया को संदेसा पहंचाना’ ही गाणी कमालीची गाजली. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते.
१९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. ते राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव आहे.
एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply