आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.
‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
Leave a Reply