बोलपटाच्या सुरवातीची काही वर्षं गाजवणारी मराठी अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म १९२० साली झाला. स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्या आधी स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत असत. पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.
स्नेहप्रभा प्रधान यांना १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.
नंतर त्यांची घट्ट मैत्री जुळली ती डॉ. शिरोडकर यांच्यासोबत. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. स्नेहप्रभा प्रधान मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या. शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्मुखपणे व शांतपणे व्यतीत केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन, पहिली मंगळागौर ,सजनी, सिव्हिल मॅरेज, सौभाग्य या चित्रपटात कामे केली.
स्नेहप्रभा प्रधान यांचं आत्मवृत्त “स्नेहांकिता‘ वाचण्यासारखे आहे. ७ डिसेंबर १९९३ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.
स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके
पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
सर्वस्वी तुझाच (नाटक)
स्नेहांकिता (आत्मचरित्र),
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्नेहप्रभा प्रधान यांचा जन्म १९२० हे सपशेल चुकीचे वाटते कारण १९३१-३२ मधे त्या पुण्यात फर्ग्युसन कॉलेजात त्या काळातल्या मॉडर्न फॉरवर्ड गर्ल स्टुडन्ट म्हणून विशेष प्रसिद्ध होत्या. ही माझी माहिती पक्की आहे. जर त्यांचे तेव्हाचे वय १८-१९ चे जरी धरले तर त्यांचा जन्म १९१४-१५ चा किंवा त्याही पूर्वीचा होता असे दिसते.