ज्येष्ठ सारंगीवादक आणि हिंदूस्तानी शास्त्रीय गायक व संगीतकार उस्ताद सुलतान खान यांचा जन्म १५ एप्रिल १९४० रोजी जोधपूर येथे झाला.
सुप्रसिद्ध सारंगीवादक साबीर खान यांचे ते वडील आणि गुरू होत. वडील आणि सारंगीवादक गुलाब खान यांच्याकडेच सारंगीवादनाचे शिक्षण त्यांनी घेतले. सारंगीवादनात अनेक नवे प्रयोग करून उस्ताद सुलतान खान यांनी सारंगी या वाद्याला आणि सारंगवादनालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली. वडिलांकडे सारंगीवादनाचे सुरुवातीचे धडे गिरविल्यानंतर उस्ताद सुलतान खान यांनी इंदूर घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद अमीर खान यांच्याकडे गाण्याचे शिक्षणही घेतले. उस्ताद सुलतान खान यांनी वयाच्या ११व्या वर्षी ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा आपल्या कलेची झलक दाखवली होती. तेव्हापासूनच त्यांनी आपले जीवन सारंगीवादनाला अर्पण केले होते. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पंडित रवी शंकर यांच्यासोबत अनेक कार्यक्रमही केले.
संगीत नाट्य अकादमी पारितोषिक, राष्ट्रपती पारितोषिक, महाराष्ट्र शासनाचा गोल्ड मेडलिस्ट ऍवॉर्ड, अमेरिकन ऍकॅडमी ऑफ आर्टिस्ट ऍवॉर्ड असे अनेक संगीत पुरस्कार त्यांच्या खात्यावर जमा आहेत. विशेष म्हणजे त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कला सादर केली होती.
पाकिजा चित्रपटातील गाण्यांमध्ये सारंगी वादनाने आपल्या चित्रपट संगीताच्या कारकीर्दीला प्रारंभ करणा-या सारंगी सम्राट उस्ताद सुलतान खान यांनी उमराव जान चित्रपटातील सादरीकरणाने आपल्या या कारकीर्दीवर कळस चढवला. सारंगी वादक म्हणून नाव प्रस्थापित झाल्यानंतर सुलतान खान यांनी हिंदी सिनेसृष्टीतही अनेक गाण्यांचे योगदान दिले. ‘पिया बसंती रे’ या गाण्याला त्यांचा आवाज होता. याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातले ‘अलबेला सजन आयो री..’ हे गाणे त्यांनी गायले होते. उस्ताद सुलतान खान यांचे सहा अल्बम प्रकाशित झाले असून त्यांच्या सारंगीची ४५ रेकॉर्डस् उपलब्ध आहेत. त्यांनी सुखशिंदर शिंदा आणि राम गोपाल वर्मा यांच्यासाठी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. अनेक तामिळ चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केले. ते इंदूर घराण्याचे गायक होते.
उस्ताद सुलतान खान यांना २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांनी दोनवेळ संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार पटकाविला होता.
उस्ताद सुलतान खान यांचे निधन २७ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. गुलाम अली यांनी एकदा म्हटले होते की, आम्ही कितीही चांगले गायलो तरी सुलतान खान एका सुरातच सर्वांना मागे टाकतात. शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ म्हणत की, अनेक सारंगीवादक आले व गेले; पण सुलतान खान जेव्हा सारंगी वाजवतात, तेव्हा गुंता उलगडत असल्याचे जाणवते. आमीर खान यांचे गाणे व सुलतान खान यांची सारंगी ऐकणे सारखेच आहे.
https://www.youtube.com/watch?v=plfCU6cz7_E
https://www.youtube.com/watch?v=3CNFvgrtOOU
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply