भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.
पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याची दुर्मीळ झालेली गायकी तीन तपांच्या निरंतर प्रयत्नांनी पुन्हा प्रस्थापित करून ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली.
रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.
कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे.
मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. सुहासिनी ताईचा सहभाग आकाशवाणी व दूरदर्शनच्या कार्यक्रमांत अनेकदा असे. सूरसिंगार संसद संस्थेचा सूरमणी, गानवर्धन संस्थेचा स्वर-लय भूषण, सम संस्थेचा संगीत शिरोमणी, पूर्णवाद प्रतिष्ठानचा संगीत मर्मज्ञ आणि स्वर-साधना समितीतर्फे स्वर-साधना रत्न असे मानाचे पुरस्कार त्यांना लाभले.
केवळ गायिका म्हणून स्वत:ची कारकीर्द घडविण्यापेक्षाही मुक्त हस्ते विद्यादान करून अनेक शिष्य घडविणाऱ्या गुरू आणि ‘निगुनी’ या टोपणनावाने अनेक उत्तमोत्तम बंदिशी बांधणाऱ्या वाग्येयकार म्हणून कोरटकर यांचे कार्य अलौकिक स्वरूपाचे आहे.
गुरुप्रतीचा अपार श्रद्धाभाव हे वैशिष्टय़ असलेल्या सुहासिनीताई यांनी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवा गायक कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. गानवर्धन या संगीत प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणाऱ्या संस्थेकडे त्यासाठी त्यांनी देणगी दिली होती.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home
डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply