वाराणसीमधील शीतला घाट येथे गंगा आरती सुरू असताना बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा हल्ला केला. आपले सरकार, गुप्तहेर खाते आणि पोलिसही असे हल्ले रोखण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले. असे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या यंत्रणांचा अभाव हेच असे हल्ले यशस्वी होण्याचे कारण आहे.वाराणसीचा गजबजलेला शीतला घाट… संध्याकाळी सहा वाजता गंगेची आरती सुरू… सुमारे 700 ते 800 भाविकांची उपस्थिती… मंगळवारचा दिवस… सर्व वातावरण श्रद्धेने भारलेले. संध्याकाळी सहानंतर हळुहळू गर्दी वाढत जाते आणि 6.35 वाजता बरोबर शीतला घाटावर बॉम्बस्फोट होतो. हा बॉम्बस्फोट कमी तीव्रतेचा (लोक इंटेन्सिटी) असला तरी लोकांमध्ये दहशत माजवण्यास पुरेसा ठरतो. 20 ते 22 लोक जखमी झाल्याचा आकडा समजतो परंतु, प्रत्यक्षात हा आकडा बराच अधिक असल्याचे जाणवते. त्यात काही विदेशी पर्यटकांचाही समावेश असतो.काही वर्षांपूर्वी वाराणसीच्याच हनुमान मंदिरात बॉम्बस्फोट झाला होता. दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोटही मंगळवारीच घडवून आणला होता. मंगळवारी कोणत्याही देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांची अधिक गर्दी असते हे लक्षात घेऊन अधिकाधिक हानी करण्यासाठी हाच दिवस निवडला असावा. हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे अतिरेक्यांचे दोन उद्देश असू शकतात. सर्वप्रथम वाराणसी हे संवेदनशील गाव आहे. त्या ठिकाणी बॉम्बस्फोट केल्यास त्याचा संपूर्ण देशावर परिणाम होऊ शकतो. दुसरे म्हणजे वाराणसी हे हिंदुंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी बॉम्बस्फोट केल्यास हिंदुंच्या भावना भडकण्यास वेळ लागणार नाही. त्यातून हिंदू आणि मुस्लिम दंगे घडून आणखी अशांतता आणि अराजक माजवणे शक्य होईल असा त्यांचा कयास असावा.उत्तर प्रदेश
ध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर बॉम्बस्फोटाचे सावट रहावे आणि त्याचा देशविघातक शक्तींना फायदा घेता यावा असाही उद्देश त्यामागे असू शकतो. पण, कोणी काहीही प्रयत्न केला तरी
आपण गाफील का रहावे किंवा या शक्तींच्या
खेळीत स्वत:चा बळी का द्यावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा घटनांकडे आपण फारसे गांभीर्याने पहात नाही. वाराणसीमध्येच हनुमान मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटापासून आपण कोणता धडा घेतला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर कोणाकडेही नसेल. आपल्याकडे केवळ खोटी आश्वासने आणि भाषणे देण्यातच वेळ वाया घालवला जातो. हनुमान मंदिरातील बॉम्बस्फोटानंतर गंगा आरतीसाठी येणार्या भाविकांना एका मेटल डिटेक्टरमधून यावे लागत होते. परंतु, मेटल डिटेक्टरही निकामी झाले होते. याबाबतीत पोलिसांना दोष देऊन तरी काय उपयोग ? निकामी मेटल डिटेक्टर दुरूस्त केला जात नाही, बदललाही जात नाही. शीतला घाट सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्थाही नाही. हे म्हणजे अतिरेक्यांना ‘आबैल मुझे मार’ असे म्हणण्यासारखेच आहे.हा बॉम्बस्फोट इंडियन मुजाहिद्दीनने घडवून आणल्याचे बोलले जाते. तो कोणीही घडवून आणला असला तरी त्या दहशतवादी संघटनेने किमान सहा महिने ते एक वर्ष तयारी केली असेल. पण, आपल्याकडे शासनाला फार लवकर झोप येते. राज्य शासन असो वा केंद्र शासन, कोणीही याबाबत मागे नसते. आजपर्यंत काही झाले नाही असा विचार करताना उद्याही काही होणार नाही असे का मानले जाते, याचे उत्तर कोणाकडेच नसते. खरे तर वाराणसीच नव्हे तर देशातील अनेक संवेदनशील ठिकाणी केव्हाही दहशतवादी हल्ला किंवा बॉम्बस्फोट होऊ शकतो याची सरकारला पुरेपूर कल्पना आहे. नसेल तर ती असायला हवी. असे असताना आपल्याकडे ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या बाबी
सायलाच हव्यात. ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ मध्ये पुढील काळात दोन, पाच, सहा महिन्यांमध्ये कोणत्या ठिकाणी दहशतवाद्यांपासून धोका संभवू शकतो याचे विश्लेषण तयार असायला हवे. असे विश्लेषण तयार असेल तर दहशतवाद्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यानुसार आपल्याला सुरक्षेचे उपाय योजता येतात. ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ मध्ये दहशतवादी हल्ल्यांबद्दल अचूक अंदाज वर्तवता येतो. यासाठी यापूर्वीच्या काळात दहशतवाद्यांनी केलेले हल्ले, त्यासाठी अवलंबलेले मार्ग, स्फोटकांची निवड आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करून दहशतवादी का, कुठे, कसे आणि केव्हा हल्ले करू शकतील याचा अंदाज बांधता येतो. असे विश्लेषण तयार असेल तर आपण देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत बर्याच सुधारणा करू शकतो. पण, आपल्याकडे या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. हा अभाव शासकीय पातळीवर आहेच पण, गुप्तहेर खाते आणि पोलिसांच्या पातळीवरही हा अभाव दिसून येतो. प्रत्येक वेळी हल्ला झाल्यावर आपण जागे होतो आणि त्यानंतर चौकशी समिती नेमणे, दहशतवाद्यांचा शोध घेणे, सुरक्षेचे काही उपाय योजणे आणि महिनाभरातच त्या उपायांची अंमलबजावणी थांबवणे हे आपल्या अंगवळणी पडले आहे. वाराणसी, पुणे, हैदराबाद, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये दहशतवाद्यांनी यशस्वीपणे हल्ले केले असून आपले सरकार ते रोखण्यासाठी काहीही करू शकलेले नाही हे त्रिकालबाधीत सत्य आहे.परदेशातील कोणतीही दहशतवादी संघटना आपल्या देशात येऊन दहशतवादी हल्ले करत असेल तर ते केवळ त्यांचेच काम आहे असे म्हणून उपयोग नाही. त्यांना स्थानिक लोकांची साथ असल्याशिवाय एवढे गंभीर हल्ले शक्य नाहीत. त्या पातळीवर विचार व्हायला हवा. आता इतर शहरांमधील स्फोटांप्रमाणेच या स्फोटाचीही चौकशी होईल. काही दिवस उत्तर प्रदेशमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल. वाराणसीमध्
े सर्वांची तपासणी केली जाईल. परंतु, हा प्रकार ‘बैल गेला, झोपी गेला’ असाच होईल. यातून आपण काय शिकलो आणि त्यामुळे पुढील काळात आपण हे हल्ले टाळू शकणार का या प्रश्नांचे उत्तर मिळेल तेव्हाच दहशतवादी असे हल्ले करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतील.चौकट-सुरुवात… आणि ‘सॉफ्ट टारगेट’ ठरला दशाश्वमेध घाट
वाराणसीचा दशाश्वमेध घाट हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते. दुसर्या क्रमांकाचा महत्त्वाचा घाट मानला जाणारा हा परिसर अनेकांना भुरळ पाडतो. येथे
सकाळी आणि संध्याकाळी गंगेची आरती केली जाते. ही आरती मोठ्या जल्लोषात
पार पडते. सुमारे 45 मिनिटे चालणार्या या आरतीसाठी अनेक ठिकाणांहून भाविक मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. या आरतीप्रसंगी सुमारे दोन फूट उंचीचे दीप उभे केले जातात. संध्याकाळच्या वेळी या दीपांच्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघतो. त्यामुळे गंगेच्या आरतीचे दृश्य अत्यंत मनोहारी असते. मंगळवारच्या बॉम्बस्फोटाच्या प्रसंगीही या नयनरम्य अध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. भारतीय संस्कृतीची श्रीमंती जवळून पाहू इच्छिणारे परदेशी पर्यटकही या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावतात. त्यामुळे बॉम्बस्फोटाच्या वेळी स्वदेशी नागरिक जखमी झाल्याचे दिसून आले. वाराणसीच्या वेगवेगळ्या घाटांना वेगवेगळ्या प्रकारची पारंपरिक महानता लाभली आहे. यापैकी दशाश्वमेध घाटावर आरतीसाठी जमणार्या भाविकांची संख्या मोठी असते. सुमारे 50 पायर्या उतरून गेल्यानंतर लागणार्या या घाटाचा विस्तार सुमारे 20 फूट बाय 40 फूट इतका म्हणता येईल. म्हणजेच या 800 चौरस फुटाच्या जागेत भाविक अधिक प्रमाणात असतात. एकंदरीत, या घाटाचे सांस्कृतिक महत्त्व आणि सांस्कृतिक मोठेपण त्याला ‘सॉफ्ट टारगेट’ बनवून गेले. तेथे उपस्थित असणार्या विदेशी पर्यटकांमुळे एकूणच परिस्थिती नीच प्रवृत्तीच्या दहशतवाद्यांसाठी बॉम्बस्फोट घडवण्यास अधिक अनुकूल ठरली.चौकट-शेवट
(अद्वैत फीचर्स)
— लेफ्ट.जन. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)
Leave a Reply