नवीन लेखन...

प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांचा प्रवेश सध्या विचाराधिन

बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेली मुलाखत
प्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण असंख्य जवान हे खेड्यापाड्यातील असल्याने ते महिला कमांडरचे आदेश पाळतीलच याची खात्री देता येत नाही, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त केले. राष्ट्रीय रायफलमध्ये समजा एखाद्या महिलेला कमांडिंग अधिकारी म्हणून नेमले गेले तर ती सहा महिने बाहेर रणभूमीवर राहील. तिच्या या कमांडच्या कार्यकाळात तिला बाळंतपणी रजाच देता येणार नाही. यामुळे यासंदर्भात मी तिच्यावर बंधने कशी काय आणू शकतो, असा सवालही त्यांनी केला.
काही टीकाकारांना सैन्य प्रमुखांचे हे विधान महिलांवरती एक अदन्याय वाटला. त्यांना वाटते की ही लढाई सैन्यांमध्ये पुरुष आणि स्त्री या मधल्या समान हक्काची आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपले सीमेवरचे शत्रू हे पाकिस्तानी आणि चिनी सैनिक आहेत. देशाच्या सैनिकांना दहशतवादी आणि माओवाद्यांशी लढावे लागते. ही लढाई अतिशय कठीण जगंलामध्ये आणि डोंगरावरती होते. अशा ठिकाणी महिला सैनिक आणि अधिकारी किती यशस्वी ठरतील?

लष्करामध्ये सध्या महिला सैनिक कार्यरत आहेत. सुरुंग पेरणे, सुरुंग निकामी करणे अशा प्रकारची कामेही त्या करतात. मात्र युद्धभूमी किंवा युद्धआघाडीवर महिला अद्याप नाहीत. ”युद्धआघाडीवर महिलांसाठी वेगळी जागा निर्माण करावी लागेल.युद्धआघाडीवर मारले जाण्याची/ गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. त्यांना रस्त्यावरील अपघातातही मृत्यू येऊ शकतो. मात्र मूलबाळ असलेल्या महिला अधिकाऱ्याचे शव युद्धभूमीवरुन येईल तेव्हा आपल्या देशाला ते सहन होइल का?

अनेक अनुत्तरित प्रश्‍न
लष्करप्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सुरवातीला “मिलिटरी पोलिस’ या पदावर सामावून घेतले जातील. या लष्करी पोलिसांची कामे ही आर्मी कॅंटोन्मेंट, तसेच अन्य लष्करी आस्थापनांवर पहारे देण्यासंबंधातील असून, लष्करातील जवानांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. या अनुभवांनंतर त्यांना थेट सीमेवर धाडण्यात येईल. आजही अनेक प्रश्‍नअनुत्तरितच आहेत. हे महिलांसाठी खरोखरच पुढचं पाऊल आहे का? पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र त्यांनी जिंकलंय का? त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा सन्मान मिळतोय का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना स्वतःला काय म्हणवून घ्यायला आवडेल? एक अधिकारी, महिला अधिकारी, की निव्वळ सैनिक?

महिलांच्या सुरक्षिततेची काळजी असल्याने
महिलांना प्रत्यक्ष लढाऊ जबाबदाऱ्या देणे योग्य नाही. महिलांना आघाडीवर पाठवल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बॅरेक्स, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. अमेरिकन लष्करात महिला जवान आहेत. मात्र अमेरिकेची संस्कृती सर्वस्वी भिन्न आहे. भारतीय महिलांना ते योग्य ठरणार नाही. शिवाय, लढाऊ विभागांमध्ये महिलांच्या समावेशाने युद्धकैद्यांचा प्रश्न अधिक गंभीर होईल. त्याखेरीज, कॉम्बॅट आर्म्समध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असला तरी त्यातही जोखमीच्या कामांसाठी पुरुष अधिकाऱ्यांना पाठवले जाते, असा महिलांचा अनुभव आहे. इथे महिलांच्या क्षमतेबाबत शंका घेण्याचा किंवा भेदभाव करण्याचा वरिष्ठांचा दृष्टिकोन नसतो, तर ‘प्रोटेक्ट’ करण्याची भावना अधिक आढळते, असे या लेडी ऑफिसर सांगतात. त्यामुळे महिलांनी लढाऊ विभागांचा आग्रह धरू नये.

सैन्याच्या अधिकाऱ्यांपुढे मात्र या भरतीने नवे प्रश्‍न निर्माण केले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेची काळजी असल्याने अनेकदा आपल्या हाताखाली महिला घेण्यास अधिकारी काचकूच करतात. विशेषतः जेव्हा महिलांवर एखादी अवघड जबाबदारी सोपवायची वेळ येते, तेव्हा हे अधिकारी अधिकच सावधगिरी बाळगतात. त्यामुळे ज्या स्त्री-पुरूष समानतेच्या तत्त्वासाठी महिला इथे येतात, तेच कामाच्या ठिकाणी नाहीसं झालेलं असतं.

ताकद,स्टॅमिना,चपळपण अजुन सुध्दा महत्वाचे
शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने पाहिले तर सामान्य पुरुष हा महिलेपेक्षा ४० टक्के जास्त ताकदवान असतो. एक महिला रिक्रुटची उंची पुरुष रिक्रुटपेक्षा ५ इंचांनी कमी असते. महिलांचे वजन पुरुषांपेक्षा ३० पौंड कमी असते आणि सर्वात महत्त्वाचे – महिलांच्या शरीरामध्ये असलेले स्नायू हे पुरुषांच्या शरीरातील स्नायूंपेक्षा सहा टक्के कमी असतात. यामुळे पुरुष सैनिक महिला जवानापेक्षा जास्त ताकदवान असतो. त्याला जास्त स्टॅमिना असतो आणि तो जास्त चपळपण असतो. हे सर्व गुण लढाईमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. सैन्यामध्ये झालेल्या एका अभ्यासाप्रमाणे महिलांची हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा पाच पटींनी जास्त आहे. यामुळे महिलांना आरोग्यदृष्ट्या अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते.

महिला व पुरुष असा वेगवेगळा विभाग करता येत नाही
अर्थात, हे सगळे आकडे हे सामान्य पुरुष आणि सामान्य महिलांकरिता आहेत. सानिया मिर्झा, सायना नेहवाल,पि व्ही सिंधु आणि कविता राऊत यासारख्या उत्तम स्टॅमिना असलेल्या महिला खेळाडू मात्र याला अपवाद आहेत. ही सगळी कारणे पाहता थेट रणांगणावर लढण्याकरिता महिलांची नियुक्ती भारतात आजवर झालेली नव्हती. याशिवाय सैन्याचे काम असते ते शत्रूला मारणे किंवा त्याला जखमी करणे. अशा कामांकरिता महिला जवानांचा वापर करणे हे सोपे नसते. प्रत्यक्ष लढाई होते त्या वेळेला महिला व पुरुष असा वेगवेगळा विभाग करता येत नाही.

याशिवाय ज्या ठिकाणी महिला जवानांना तैनात केले जाते तिथे त्यांची लहान मुले असतील तर त्यांच्याकरिता पाळणाघर अशा सुविधा तयार कराव्या लागतील. अशा सुविधा सध्या सीमेवरती नाहीत. म्हणूनच महिलांना लढणाऱ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामील करणे हे सध्यातरी शक्य नाही. अमेरिकेमध्ये सैन्यामध्ये २० टक्केहून जास्त महिला आहेत, पण त्या थेट लढाईमध्ये जात नाहीत. युरोपीय देश व इस्रायलमध्ये हीच स्थिती आहे.

महिलांनी ताबारेषेवर सेवा बजावणे सध्या शक्य नाही
सध्या केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये सीमा सुरक्षा दलासह एकूण 11 हजार 412 महिला आहेत. हा आकडा एकूण सैन्याच्या केवळ 1.5 टक्का आहे. लष्करात 4,101 महिला आहेत, मात्र त्या सहायक विभागांमध्ये म्हणजे सिग्नल यंत्रणा, तंत्रज्ञ, दारूगोळा इ. पुरत्याच सीमित आहेत. भारतीय नौदलात 252 महिला आहेत, मात्र तिथेही त्यांची जहाजांवर आणि पाणबुडीवर नियुक्ती होत नाही. वायुदलात 872 महिला काम करतात. इथे युद्धक्षेत्र सोडलं तर त्यांना इतर सर्व विभागांत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे.

आपल्याकडे प्रत्यक्ष ताबारेषा, लढाईच्या जागा या अत्यंत कठीण प्रादेशिक जागी, डोंगराळ व दुर्गम जागी आहेत. तेथे कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा नाहीत. पायदळामध्ये महिलांना अशा आव्हानात्मक स्थितीत जबाबदारी देणे सोपे नाही. तसेच युद्धभूमी ही सोशल इंजिनिअरिंग करायची जागा नाही.

देशात निमलष्करी दले व सीएपीएफ कोणत्या भागात कार्यरत आहेत व तिथे काम करण्याकरिता महिला कॉन्स्टेबलना योग्य वातावरण आहे का, याचे विश्लेषण व्हायला हवे.महिला म्हणून काही सवलती मिळतात. उदाहरणार्थ, पुरुषांना 3.2 किमीचं अंतर धावण्यास 13 मिनिटांचा कालावधी दिला जातो, तर महिलांसाठी तो निकष 17 मिनिटं आहे. कामावर दाखल झाल्यावरही त्यांना काही सवलती असतात. प्रत्यक्षात त्या गस्त घालतात, पण फक्त दिवसा. त्यांच्या कामाची वेळही सहा तासांचीच असते. पुरुषांना मात्र या सवलती नाहीत.

भारतीय सैन्यात 90 टक्के जवान हे पुरुषप्रधान ग्रामीण भागातून येतात.महिला लष्करात, युद्धभूमीवर दाखल होण्यासाठी फक्त महिलांनाच प्रशिक्षणाची गरज आहे असे नव्हे. तर त्यांना दलात सामील करून घेण्यासाठी पुरुषांचीही बरीच तयारी करून घ्यावी लागणार आहे.’
रात्रीच्या वेळेला महिलांना पहारा करण्यासाठी तैनात ठेवणे तितकेसे सुरक्षित नाही”प्रत्यक्ष युद्धात महिलांचा सहभाग” हे अजूनही पूर्ण न झालेलं स्वप्न आहे. पुरुषांपेक्षा महिला कमजोर असतात ,पण त्या , बौद्धिक व मानसिकदृष्ट्याही युद्धासाठी सक्षम आहेत. किंबहुना शिस्तपालन व सहकाऱ्यांशी सौहार्दाने वागणं, परिपक्वता या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस असल्याचं दिसलं आहे.सैन्याच्या अशा विभागात ज्यामध्ये त्यांच्या गुणांचा वापर केला जाऊ शकतो तिथे त्यांना प्रवेश मिळाला आहे आणि तो मिळत पण राहावा.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..