नवीन लेखन...

डिसेंबर ०९ : मंकडबाद- धावबादचा खास प्रकार





९ डिसेंबर १९९२. स्थळ पोर्ट एलिझबेथ. भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी सामना. गोलंदाज कपिल देव. फलंदाज केप्लर वेसल्स. कपिल धावत धावत यष्ट्यांकडे येत असताना बिनटोल्या पीटर कर्स्टन पुढे सरकला. चेंडू टाकण्याऐवजी कपिलने पंचांसमोरील यष्ट्यांवरील बेल्स उडविल्या आणि पंचांकडे पीटर कर्स्टन धावबाद असल्याचा आग्रह धरला. बोट वर गेले. ते दिसूनही पीटर मैदान सोडत नाही म्हटल्यावर पंचांनी त्याला तोंडानेही निर्णय सांगितला. अखेर तावातावाने पीटरने मैदान सोडले. त्याच्या सामन्याच्या मानधनातील अर्धी रक्कम कापण्यात आली. दोन बोटांच्या सहाय्याने कपिलला काही सूचना (ताकीद?) देणारा केप्लर वेसल्स मात्र आश्चर्यकारकरीत्या केवळ ‘समज’ घेऊन वाचला.

तांत्रिक परिभाषेत कपिलदेवने पीटर कर्स्टनला धावबाद केले होते. क्रिकेटच्या नियमावलीतील ३८ वा नियम धावबादशी संबंधित आहे. या नियमानुसार धाव घेण्याचा प्रयत्न करताना किंवा असा प्रयत्न करीत नसतानाही फलंदाज अगदी नो बॉलवरही धावबाद होऊ शकतो. या नियमाला काही अपवाद आहेत.

गोलंदाज, विशेषतः वेगवान गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावण्यास प्रारंभ करतो तेव्हा बिनटोल्या फलंदाज धाव घेण्याच्या इराद्याने पुढे सरकत असतो. धाव मिळणारच असेल तर ती चटकन मिळावी असा हेतू यामागे असतो. प्रत्यक्ष चेंडू टाकला जाण्यापूर्वीच बिनटोल्या पुढे सरकत असेल तर मात्र अनेक प्रश्न उभे राहतात. अशा फलंदाजाला गोलंदाजाने धावबाद करावे का हा नैतिकतेबरोबरच खिलाडूवृत्तीशीही संबंधित सवाल आहे. तेव्हा वाजवीपेक्षा लवकर पुढे सरकणार्‍या बिनटोल्याला आधी सावध करणे, त्याची नैतिकता जागी करण्याचा प्रयत्न करणे आणि मग पहिले पाढे पंचावन्नच राहिल्यास त्याला बाद करणे हा पटण्यासारखा उपाय म्हणता येईल. उपरोल्लेखित घटनेत कपिलने त्या दौर्‍यावर अनेकदा कर्स्टनला असे सावधानतेचे धडे दिले होते.

विनू मंकड हे आपल्या क्रीडाकौशल्यांबरोबरच या प्रकारच्या घटनांसाठी फार प्रसिद्ध आहेत. १९४७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सिडनी कसोटीत मंकडांनी

बिल ब्राऊनला अशा थाटाने धावबाद

केले होते. याच दौर्‍यावर आधी एका सराव सामन्यातही मंकडांनी ब्राऊनला असे बाद केले होते. पन्नास वर्षांपूर्वीची प्रसारमाध्यमे होती म्हणून काय झाले- तेव्हाही ऑस्ट्रेलियाई वृत्तपत्रांनी मंकडवर टीकेची झोड उठवली होती. डॉन ब्रॅडमन आणि इतर काही ऑस्ट्रेलियाईंनी मात्र मंकडांनी काहीही चुकीचे केले नाही असे म्हटले होते.

या घटनेनंतर अशा थाटात बाद होणार्‍या फलंदाजाला ‘मंकडेड’ म्हटले जाते.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..