काही घटना आठवणींच्या पल्याड जात नाहीत.विस्मरणाचा स्पर्शही त्यांना स्पर्शून जात नाही.अशा या आठवणींमध्ये कुणीतरी मायेच्या सलगीने , बापाच्या काळजीने ,भावाच्या -बहिणीच्या मायेने,जिवलगाच्या प्रेमाने किंवा अव्यक्त नात्याने कूणी मनोमन आधार देत म्हणत असेल काळजी नसावी .या वाक्यासारखी वाक्य ही शब्दांचा गुच्छ न राहता जीवाचं अंतरंग बनतं.
अशा या आठवणी धुक्यातील दव ज्याप्रमाणे फुलावरं बसून एकरूप होऊन फुलांच्या अस्तित्वाचा हिस्सा बनून राहते. अगदी अशाच मनाच्या आतल्या कप्प्यात हट्ट करून बसलेली ही वाक्यातली आठवण ………………काळजी नसावी.
आधी पत्रव्यवहार असायचा .त्यामध्ये हट्टाने खाली हे वाक्य लिहीलेलं असायचं……काळजी नसावी
हे वाक्य वाचतांना ड़ोळ्यात आपसूकच पाणी यायचं.आणी मन त्या लिहीणा-या व्यक्तीच्या आठवणीत रमून यायचं .
अगदी असचं बोलताना हे वाक्य आपल्या बाबतीत जर कूणी म्हणत असेल तर आपल्या सारखे आपणच नशीबवान .
या दोन शब्दाच्या वाक्यात अवघी नाती समाविष्ट झाल्यासारखी वाटतात .म्हणजेच प्रत्येक नात्यातलं प्रेम . हे या दोन शब्दाच्या वाक्यातच समाविष्ट आहे की काय ?असं वाटायला लागतं.
काळजी नसावी
काळजी या शब्दातच बोलना-या,लिहीणा-या व्यक्तींचं काळीज ……काळजी हा शब्द शोधून आणतो.बोलतांना,लिहीतांना अगदीच साधं वाटणारं वाक्य …..वाचल्याबरोबर किंवा ऐकल्याबरोबर काळजाचा ठाव घेतं.आणी आपसूकचं हेच साधसं वाक्य पून्हा पून्हा वाचत किंवा ऐकत रहावसं वाटतं.
या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल ?
चला तर मग करूया सुरूवात ……..काळजी नसावी
© वर्षा पतके-थोटे
12-12-2018
Leave a Reply