१६ डिसेंबर १९४८ रोजी पुण्यात महाराष्ट्र वि. काठियावाड हा रणजी चषकाचा सामना सुरू झाला होता. चार दिवसांच्या या सामन्यात पहिल्या दिवशी काठियावाडचा संघ २३८ धावांवर बाद झाला होता. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने १ बाद १३२ धावा केलेल्या होत्या. १ बाद ८१ पासून भांडारकर-निंबाळकर ही जोडी मैदानात होती. या जोडीने तब्बल ४५५ धावांची भागीदारी केली. वैयक्तिक २०५ धावांवर कमल भांडारकर बाद झाले. या दुसर्या दिवसाच्या अखेरच्या षटकात भाऊसाहेब निंबाळकरांनी आपले त्रिशतक पूर्ण केले.
तिसरा दिवस २ बाद ५८७ पासून सुरू झाला. भाऊसाहेबांसोबत २४२ धावा तिसर्या गड्यासाठी जोडून देवधर बाद झाले. त्यानंतर लवकरच मोहन लाल बाद झाले. भाऊसाहेब एका बाजूने धावा जमवितच होते. ४०० धावांचा आकडा त्यांनी पार केला. प्रथमश्रेणीतील एका डावातील सर्वाधिक धावांचा विक्रम त्यावेळी डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता (४५२ धावा).
तिसर्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्र ४ बाद ८२६ आणि भाऊसाहेब नाबाद ४४३ ! त्या काळी चहा मैदानातच आणून खेळाडूंना दिला जाई. राजकोटचे ठाकूरसाहेब हे काठियावाडच्या संघाचे कर्णधार होते. त्यांनी फलंदाजांना दरडावणीच केली – डाव घोषित करा, नाहीतर आम्ही घरी !
महाराष्ट्राचे कर्णधार राजा गोखले आणि सामनाधिकार्यांची ठाकूरसाहेबांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. दोन षटकांचा तरी खेळ व्हावा आणि भाऊसाहेबांना ब्रॅडमनचा विक्रम मोडण्याची संधी दिली जावी अशी विनंतीही करून पाहिली, पण व्यर्थ…ठाकूरसाब संघाला घेऊन मैदानाबाहेर गेले आणि त्यांनी थेट स्टेशन गाठले ! (आपण ब्रॅडमनच्या विक्रमाच्या इतके जवळ आहोत हे भाऊसाहेबांना तोपर्यंत ठाऊक नव्हते असे त्यांनीच नंतर सांगितले होते. आपल्याला नऊच धावा हव्या आहेत असा संदेश वेळेत मिळाला असता तर आपण त्या क
ाढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असता असेही ते सांगतात.)
“तुम्ही आधीच एवढ्या धावा केलेल्या आहेत, आणखी कशासाठी
हव्यात?” असे काठियावाडचे खेळाडू भाऊसाहेबांना विचारीत
होते. (१२ डिसेंबरला भाऊसाहेबांनी वयाची २९ वर्षे पूर्ण केलेली होती.)
भाऊसाहेबांच्या ह्या ४४३ धावा (४६ चौकार आणि १ षटकार) हा आजही भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमधील फलंदाजाचा एका डावातील सर्वाधिक स्कोअर आहे. जागतिक प्रथमश्रेणीचा विचार करता, कधीही कसोटी सामना न खेळलेल्या फलंदाजाचा हा सर्वाधिक धावांचा डाव आहे. भारतातर्फे कसोट्यांमध्ये त्यांची निवड का झाली नसावी?….
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply