चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत
पुन्हा एकदा लहान होऊ,
हाती हात मिळवत,–!!!
आठवांचे गावच रमणीय,—!!!!
किती नांदती सगेसोयरे,
हासुन आपले स्वागत करती,
त्यात बालपणीचे वडीलधारे,–!!!
शाळेतील शिक्षकांच्या हाती,
मुळीच लागायचे नाही,
त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही,
आठवावा तो निरागसपणा,
निष्पाप कोवळे ते वय ,
अशावेळी हमखास येते,
मैत्रिणींची खूप सय,
कधी लुटूपुटूची भातुकली,
त्यातले खोटेच रुसवे-फुगवे,
आज डोळे गहिंवरती,–!!!!
पण वाहून ना जाती त्या सयी,
लग्न बाहुला-बाहुलीचे,
सासूने मागता हुंडा,
ठाम राहून नकार देत,
मुलगी परतवणे घरां,
बरोबर येई मग सासू,
हीच मुलगी करायची,
दोन तोळे जास्त घालू,
समजूत अशी काढायची,–!!!!
आट्यापाट्या लपंडाव लगोरी, किती त्यांच्या आहारी जाणे,
वेळ काळ विसरत सगळे,
त्यावरून बोलणी खाणे, बालपणीची ही धुंदी,,—!!!!
अजूनही गेली नाही,
भोंडल्याची खरी मज्जा,
आजच्या मुलीला कळत नाही,
पाच दहा पैसे परंतु,
कधी हाती ना लागले,
त्यासाठी किती सायास कित्येकाना पटवावे लागले,–!!!
हिरव्या लाल गाभुळल्या चिंचा, आवळे जाम आणिक बोरे,
त्यांची किंमत सांगा आज,
थोडी आठवून बघा बरे,–!!!
मे महिन्याच्या सुट्टीत कसा,
घरात घालायचा धिंगाणा,
जो येईल तो ओरडे,
पण विचारलेच नाही कुणा,–!!!
पापड पापड्या कुरडया,
पदार्थांची रेलचेल असे,
कामाच्या सांगून नावाखाली, पळवापळवी” ठरलेली असे,
वेळ येता आजोबांचा,
मिळे खंबीर पाठिंबा ,
त्यांच्या प्रेमापुढे गप्प सगळे,
हिंमत”” व्हायची नाही कुणा,–!!!
किती अशा आठवणी,
शब्दच अपुरे पडती,
*स्वप्नातील हे गाव ठरते,
डोळे उघडून बघा भोवती*,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply