कधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत.
कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय ? तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी दूर दूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते.
वृदांवनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखंच विझत जातं.
प्रसन्न दिसणारा प्रभाकर गरगरत लालबुंद सोनेरी भगवा होत क्षितीजापलीकड़े एकटाच जातांना उगाचच तो ही शापीत वाटायला लागतो.
झगमगती दीपमाळ नजरेला अस्पष्ट आणि विरळ भासू लागते. निशब्द सळसळणा-या अंधारल्या झाड़ांकड़े पाहून त्यांचेच नव्हे तर स्वतःचेही श्वास पोरके वाटायला लागतात.
ओसाड माळरानावरची क्षणभरासाठी जमलेली पाखरं आता उरलेली नसतात . या निष्पर्ण माळरानाचे एकटेपण अशा संध्याकाळी कसे असेल याचा विचार अगदी नाहीच करवत .
तू का नाही येत रे फुलून बहरुन ? मग पाखरंही रेंगाळतील .. सूर्य तुझ्याआडच मावळेल .. तू असा फुललेला .. पक्षी जायचे नाहीत दूर मग .. तुझ्याच आश्रयाला राहतील.. किती छान दिसशील तिथं तू .. बहरलेला , चिमण्या पाखरांनी लगडलेला ..मी सांगते म्हणून ऐक ..माझ्यासाठी काहिही जमेल तुला .. बघ !
नाहितरी मी तुला “विश्रब्ध ” उगाच म्हणते का रे !
बघ उजळतंय इथं .. नुसत्या कल्पनेनंही …
©वर्षा पतके -थोटे
5-01-2019
Leave a Reply