फोनची रिंग वाजली म्हणून रुद्राने फोन उचलला. अननोन नंबर होता.
“रुद्रा बोलतोय!”
“हो मला माहित आहे! तुझ्या कडे किती पैसे आहेत?”
“साला कोण बोलतंय? असल्या फडतूस गोष्टीन साठी माझ्या कडे वेळ नाही!”
“असं डोक्यात राख घालून घेण्यात काही अर्थ नसतो. सध्या मला फक्त तीन लाखाचं पाहिजेत! आणि ते तू देणार आहेस!”
“आबे हट !”रुद्रा फोन कट करत म्हणाला.
पुन्हा रिंग वाजली. पण या वेळेस काही तरी मेसेज आल्याची होती.
मेसेज मध्ये केवळ पाच सेकंदाची व्हिडीओ क्लिप होती! रुद्राला दरदरून घाम आला! तो खून करताना त्याने संतुकरावांच्या तोंडावर दाबलेल्या हाताची ती क्लिप होती! त्यात फक्त त्याचा चेहरा दिसत नव्हता. नसता ती क्लिप त्याला फासावर चढवण्यास पुरेशी होती!
पुन्हा रिंग वाजली. नम्बर तोच होता! या वेळेस रुद्राने कॉल रेकॉर्डर सुरु केला!
“रुद्रा, हे फक्त त्या सिनेमाचे टीजर पाठवलंय! सम्पूर्ण मुव्ही इन्स्पे. राघव आवडीने पाहिलं! आणि त्याला तुझ्या पर्यंत पोहचवण्याची मी व्यवस्था नक्कीच करू शकतो! तुझ्या साठी तीन लाख किरकोळ रक्कम आहे. तुला ते हातउसने कोणी पण देईल किंवा —- जावू दे मार्ग काढणे तुझा प्रॉब्लेम, मला पैसे हवेत!अर्थात अजून लागले तर काळवीनच म्हणा! लवकरच पैसे कोठे आणि कसे पोहंचवायचे ते सांगीन! तोवर बाय !” फोन कट झाला.
रुद्राने कपाळाला हात लावला! हे नवीनच झेंगट सुरु झाले होते! त्याने नवीन सिगारेट शिलगावली. थोडा शांत विचार करायला हवा. There is always a way! हे त्याचे लाडके तत्व होते. रुद्राने कॉल रेकॉर्डर ऑन केला. एकदा, दोनदा, तीनदा,तो पुन्हा पुन्हा एकला. त्या आवाजात काही तरी ओळखीचे जाणवत होते. चौथ्या वेळेस ऐकताना ‘एस!’ रूद्रा स्वतःशिच म्हणाला. शंकाच नको तो सोलापुरी हेल! हा कॉल त्या ‘सुपारी’वाल्याचाच होता! आता ते पाच फुटी माकड पकडणे गरजेचे होते. एक तर पैसे देऊन ‘काम’करून घेतले. त्याची व्हिडीओ करून तो ते पैसे परत मिळवू पहात होता! तेव्हा आश्चर्य याचे वाटले होते कि, इतक्या झटपट कशी डील झाली होती, पण याचा उलगडा आता होत होता! पण व्हिडीओ झालाच कसा? कारण त्या आऊट हाऊस मध्ये cctv कोठेच नव्हता! याची खात्री रुद्राने जातीने करून घेतली होती. आणि शूटिंगचा अँगल पहाता, रेकॉर्डिंग खूप जवळून घेतल्या सारखे दिसत होते. इतके जवळून कि रुद्राच्या हातावरचे केस पण स्पष्ट दिसत होते! अगदी समोरून घेतल्या सारखे! समोर तर फक्त लॅपटॉप, पुस्तक आणि वही होती. लॅपटॉपचा कॅमेरा तर ऑन नसेल? नाही ती शक्यता नाही. कारण तसे असते तर इन्स्पे. राघवने एव्हाना त्याचा फोटो व्हायरल केला असता! मग रेकॉर्डिंग कसे झाले?
काहीही करून त्या सुपारीवाल्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. पण त्याला या विशाल शहरात कोठे म्हणून हुडकावे?आणि कसे?काही क्षण रुद्रा ताठ झाला. खरे तर हे त्याच्या आधीच लक्षात यायला हवे होते. तो किंवा त्याचा हस्तकआपल्यावर पाळत ठेवून असणार होता! त्याला ट्रेस करणे फारसे आवघड नव्हते.
(क्रमशः)
— सुरेश कुलकर्णी
Leave a Reply