मोरुचे बाबा हे फार बडे प्रस्थ.त्यांचं सारं काही मोठं.नवी कोरी बीएमडब्ल्यू चोरिला गेली तर त्याचं सिलेब्रेशन त्यांनी केलं होतं.त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला नवा चाँद लागणार होता .चोर महोदयांनी त्यांना नवी रोल्स रॉयल्स घेण्याची सुवर्णसंधी बीएमडब्ल्यूची चोरी करुन दिली असं त्यांचं या सेलिब्रेशन मागचं तत्वज्ञान होतं.असं अत्तुच्च कोटीचं तत्वज्ञान प्राप्त मोरुचे बाबा आज चिंतेत सापडले होते.
मोरुच्या मम्मीसाठी हे नवलच होतं. ओबामा साहेब एकदाचे चिंताग्रस्त होऊ शकतात पण मोरुचे बाबा चिंताग्रस्त होऊच शकत नाही,अशी त्या माऊलीची ठाम समजूत होती.या समजुतीला असा तडा जात असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर हाय आणि लोच्या अधेमधे हलू लागले. मोरुच्या बाबांना चिंतेबद्दल विचारावं तर पंचाईत नाही विचारावं तर ब्लड प्रेशरचा पेंडूलम फारच वेगात.अशा पेचात मोरुची मम्मी सापडली.माधुरी दीक्षितांचा देढ इष्किया हा चित्रपट चालेल की नाही या चिंतेत मोरुचे बाबा नसले म्हणजे सिध्दीविनायक पावला असे मनाशी म्हणत मोरूच्या मम्मी मोरूच्या बाबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करु लागल्या.
मोरुच्या बाबांनी शांतपणे त्यांच्याकडे बघितले.त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या चिंतेचा इंडेक्स आणखी वाढला.ते बघून मोरुच्या मम्मीच्या हाय आणि ब्लड प्रेशरला नेमकं काय करावं हे कळेना.मोरुचे बाबा गरजले असते तर हे प्रेशर एकतर लो झाले असते नाही तर हाय झाले असते.मोरुच्या बाबाच्या चिंतेने शिंखडीचं स्वरुप घ्यावं हे धोकादायकच होतं. कशाला मेली माधुरी अमेरिकेतलं सुखाचं जीवन सोडून इथं आली,आपल्या नवऱ्याला चिंतेच्या डोहात टाकायला,असं काही बाही, त्या मनातल्या मनात म्हणत राहिल्या. मोरुच्या बाबांना शांत-शांत बघून त्या त्यांच्यासमोर तशाच उभ्या राहिल्या. अखेर मोरुच्या बाबांनाच त्यांची दया आली आणि त्यांनी मोरुच्या मम्मीला बसावयास सांगितलं. संवाद साधण्याची ही संधी दवडायची नाही असे चटदिशी ठरवून मोरुची मम्मी पटदिशी बोलत्या झाल्या,नका हो माधुरीचे इतके टेन्शन घेऊ. एक तुमची फाइल तिचा चित्रपट हिट करेल.100 कोटीचं उत्पन्न आपणच देऊन टाकू देढ इष्कियाला. त्याची काय एवढी चिंता करता.तुम्हाला चिंता शोभत नाही.
गप्प बसा,मोरुचे बाबा गरजले.मोरुच्या मम्मीला आणि त्यांच्या हाय आणि लो ब्लडप्रेशरला हायसे वाटले.आता आपला नवरा रागवून कां होईना,बोलणार याचे इंडिकेशन आल्याने स्वर्गप्राप्तिचा आनंद एखाद्याला होऊ शकतो तसा आनंद मोरुच्या मम्मीला झाला.मोरुचे बाबा काय बोलतात याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले.,
बाबा बोलते झाले.काहीतरीच येड्यासारखे बोलू नकोस. माझ्या चिंतेसाठी तुमचा लेक मोरु जबाबदार आहे.
अगं बाई खरचं,काय केलं हो मोरुने.मोरुची मम्मी आनंदाने पण त त पप करत बोलल्या
तुमच्या लेकराने एव्हरेष्ट चढायचा पराक्रम गाजवला नाही.अग बाई खरच म्हणायला.
त्याने कशाला जायलं हवं एव्हरेष्टवर.तुम्हीच एव्हरेष्टला इथं आणू शकता ना.तुमची कॅपॅसिटी मला ठाऊक नाही होय.
माझी कॅपॅसिटी ताजमहाल बांधण्याची आहे हो.म्हणून काय मोरुने असे वागायला हवे.
झाले तरी काय?
मोरुच्या मम्मी आपण मोरुस दर महिन्याला खर्चासाठी अलाउंस देतो की नाही.
ते त्याने वाढवून मागितलेय का?.द्या महागाई किती वाढलीय हो.कांदे 100रुपये किलो झालेत..
नाकाने कांदे सोलू नका.कांद्याचा भाव दहा हजार रुपये किलो झाला तरी त्या भावात कांदे विकत घेण्याची माझी क्षमता तुम्हास ठाऊक नाही काय?
मलाच काय,पाकिस्तानच्या आणि बांगला देशाच्या राष्ट्रपतींना सुध्दा आपली ही क्षमता ठाऊक आहे.मग तरी सुध्दा चिंता का करता तुम्ही.
मोरुला आता पॉकेट खर्चासाठी अलौंन्स नको आहे.
खरचं.शहाणा हो माझा लेक.
शहाणा कसला, दीड शहाणा झालाय.
म्हणजे.
आता त्याला अलौंन्स नकोय.काल मला कितीदिवस यावरच चालवायचं ,असं म्हणाला.
मग काय हवं त्याला.
त्याला पूर्ण पगार हवाय.
आँ.
याला आता पगार हवा.पुढच्या वर्षी वेतन वाढ मागेल.
मग देऊन टाका. तुम्हाला अशक्य ते काय?तुम्ही ठरवलं तर मिशेल वहिनींच्या लेकरांना सुध्दा पगार देऊ शकाल की.किती दिवस त्यांनी अलाऊंसवर राहायचं.नाही का?
मोरुच्या मम्मीचं हे उत्तर ऐकून मोरुच्या बाबांच्या चेहऱ्याला प्रश्न पडला की आपण पडावं की भोकाड पसरावं,खेकसावं की शून्यात जावं…
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply