दुसर्या महायुद्धाच्या काळात डॉ. ड्वाईट हार्केन यांनी हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेत प्रथम हृदयाला लहानसे छिद्र पाडण्यात येत असे. मग त्या छिद्रातून हाताचे बोट हृदयात घालून अरुंद झडप (व्हॉल्व्ह) थोडीशी मोठी करण्यात येई. हळूहळू हृदयशल्यचिकित्सकांना यात प्राविण्य मिळाले व अशा शस्त्रक्रिया सुलभतेने होऊ लागल्या. ही झाली ‘क्लोज्ड हार्ट’ अथवा आंधळी शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमुळे कितीतरी रुग्णांना फायदा झाला असला तरीही या पद्धतीला बर्याच मर्यादा होत्या. जर का हृदयाच्या आत हात घालून काम केले नाही तर यात शस्त्रक्रिया करणे अवघड होते. याशिवाय आणखी एक खूप मोठी अडचण होती ती म्हणजे या पद्धतीमध्ये रुग्णाच्या हृदयाचे स्पंदन चालूच राहात असे. रक्ताभिसरणाचा वेग कमी करून (Temporarily stopping a patient’s circulation) शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेसाठी फक्त चार मिनिटे इतकाच अवधी मिळत असे. त्यानंतर रक्तपुरवठा पूर्ववत झाला नाही तर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण होण्याचा धोका होता. या पद्धतीला ‘इनफ्लो ऑक्लुजन’ असे संबोधिले जाते. त्यामुळे हृदयावरील ज्या शस्त्रक्रियांना चार मिनिटांपेक्षा अधिक काळ लागेल अशा शस्त्रक्रिया करणे अशक्यच होते.
डॉ. विल्फ्रेड बिगलो यांनी यावर उपाय सुचविला, इतकेच नव्हे तर त्यावर काम करून ती प्रणाली अंमलातही आणली. बिगलो तेव्हा मिनेसोटा विद्यापीठात काम करीत होते. संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की कॅनडामधील (डॉ. बिगलो कॅनेडियन होते) तीव्र कडाक्याच्या हिवाळ्यात ‘ग्राऊंड हॉग’सारखे प्राणी हायबरनेशन मध्ये जातात. थंडीवर मात करण्याचा त्यांच्यासाठीचा तो उपाय आहे. या कालावधीत त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावतात व त्यांची उर्जेची गरज कमी होते, त्याचा परिणाम म्हणून अन्नावाचून ते बरेच महिने जगू शकतात. या संदर्भात विचार करीत असतांना बिगलोंना असे वाटले की ‘खूप कमी तापमान’ हा एक उपाय होऊ शकतो. मग त्यांनी प्राण्यांवर प्रयोग करून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की श्वानांच्या शरीराचे तापमान खूप कमी केले असता त्यांच्यावर ‘ओपन हार्ट सर्जरी’ बर्याच वेळा चार मिनिटांहून अधिक काळ करता येते व त्यात प्राणी दगावत नाहीत. बिगलोंनी असे सिद्ध केले की कमी तापमान ठेवले असता मेंदू व शरिरातील उतींची प्राणवायूची गरज कमी होते व त्यामुळे रक्तपुरवठा जास्त काळ रोखून धरला तरी मेंदूला इजा पोहोचत नाही. सप्टेंबर १९५२ मध्ये डॉ. लीलेहाय आणि डॉ. जॉन लुवीस यांनी या पद्धतीचा वापर करून प्रथमच एका पाच वर्षांच्या लहान मुलीवर शस्त्रक्रिया केली. या पद्धतीमुळे ती मुलगी शस्त्रक्रिया चालू असतांना, दहा मिनिटेपर्यंत हृदयाची धडधड थांबली असतांना देखील जिवंत राहू शकली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या उपचारप्रणालीला ‘द हायपोथरमिक अॅप्रोच’ असे संबोधिले जाते. हृदयातील छोटे दोष दुरुस्त करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरली.
कॅनडामधील मॅनीटोबा येथे १९१३ मध्ये डॉ. बिगलो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देखील डॉक्टर होते. त्यांच्या वडिलांनी कॅनडातील पहिले ‘मेडिकल क्लीनिक’ स्थापन केले. १९३८मध्ये बिगलो यांनी टोरोंटो विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये त्यांनी प्रशिक्षणार्थी (सर्जिकल रेसिडेन्ट) म्हणून काम केले.
१९४१ मध्ये त्यांच्याकडे एक रुग्ण चिकित्सेसाठी आला. हिमदंशामुळे (फ्रॉस्ट बाईट) त्याच्या हाताच्या बोटांना गॅन्गरीन झाले होते. बिगलोंना शस्त्रक्रियेद्वारे त्याची बोटे कापावी लागली. या घटनेने ते अस्वस्थ झाले. हिमदंशावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. या घटनेतून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बिगलो यांनी सैन्यात प्रवेश घेतल्यावर युद्धभूमीवरही काम केले. हिमदंश झालेल्या कित्येक सैनिकांवर उपचार करीत असतांना ‘हायपोथर्मिया’वर ते विचार करू लागले. दुसरे महायुद्ध संपल्यावर ते टोरोंटो येथे परत गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील बाल्टीमोर येथील जॉन हॉपकिन्स रुग्णालयात प्रशिक्षण घेतले. १९४७मध्ये ते कॅनडाला परतले व ‘टोरोंटो जनरल हॉस्पिटल’मध्ये ‘स्टाफ जनरल सर्जन’ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९५०मध्ये टोरोंटो विद्यापीठाच्या शल्यचिकित्सा विभागात त्यांना नेमणूक मिळाली. १९५३ साली तेथेच ते सहाय्यक प्राध्यापक झाले तर १९७० मध्ये प्राध्यापक झाले. १९८४ साली बिगलो यांनी त्यांच्या या संशोधनावरील पुस्तक प्रकाशित केले. त्याचे नाव होते, ‘कोल्ड हार्टसः द स्टोरी ऑफ हायपोथर्मिया अॅन्ड द पेसमेकर इन हार्ट सर्जरी’
बिगलो यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. जैववैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना १९५९चा गाईर्डनर फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९८१ साली ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ तर १९९२ साली कॅनेडिअन मेडिकल असोसिएशनचे ‘फ्रेडरिक न्यूटन गिसबोर्न स्टार अॅवॉर्ड’ देण्यात आले. असोसिएशनच्या वतीने कोणत्याही सदस्याला देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर पाच वर्षांनी ‘कॅनेडिअन हॉल ऑफ फेम’मध्ये बिगलोंना स्थान देण्यात आले. ‘अमेरिकन असोसिएशन फॉर थोरॅसिक सर्जरी’ तसेच ‘सोसायटी फॉर व्हॅस्क्युलर सर्जरी’चे ते अध्यक्ष होते. १९७० ते १९७२ या कालावधीत बिगलो ‘कॅनेडिअन कार्डिओव्हॅस्क्युलर सोसायटी’चे अध्यक्ष होते. टोरोंटो जनरल हॉस्पिटलच्या हृदयशल्यचिकित्सा विभागाचे ते वीसपेक्षा अधिक वर्षे प्रमुख होते. सन २००१ मध्ये ‘इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’ तर्फे बिगलो यांना ‘लीव्हिंग लीजंड’या किताबाने गौरविण्यात आले. हृदयशस्त्रक्रियेला शक्यतेच्या कक्षेत आणण्यात डॉ. बिगलो यांच्या संशोधनाचा मोलाचा वाटा आहे. २७ मार्च २००३ रोजी डॉ. बिगलो यांचे निधन झाले.
डॉ. बिगलो मध्यभागी पेस-मेकरचे कार्य समजावून सांगताना, ऑक्टोबर १९८२
टोरोंटो विद्यापीठातील बॅन्टींग इन्स्टिट्यूट येथे काम करीत असतानाच, ५०च्या दशकात डॉ. बिगलो पेस-मेकरचे सह-संशोधन केले होते..
Leave a Reply