१९ जानेवारी १९९१ रोजी ऑस्ट्रेलियातील कॅरारा ओवल मैदानावर प्रवासी इंग्लंड विरुद्ध क्वीन्सलँड हा सामना सुरू झाला. क्वीन्सलँडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्याच दिवशी २८६ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. दिवस-अखेर इंग्लंडने एक गडी गमावून २७ धावा काढल्या होत्या. पहिल्या दिवशी नबाद परतलेले (खेळ संपल्यामुळे त्या-त्या दिवशी तंबूत परतणार्या फलंदाजाचा डाव संपलेला नसल्याने त्याला नाबाद म्हणणे फारसे आक्षेपार्ह नसले तरी मागाहून त्या दिवसाच्या खेळाविषयी बोलताना ‘अॅट द क्रीज’ला समर्पक तोड ‘नबाद’ ही असू शकते.) ग्रॅहम गूच आणि जॅक रसेल दुसर्या दिवशी बाद झाले आणि ३ बाद २५३ धावांवर दुसरा दिवस संपला. जॉन मॉरिस आणि रॉबर्ट स्मिथ नबाद परतले. मॉरिस होता ११८ धावांवर.तिसर्या दिवशी मॉरिस बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या २७६ धावा झालेल्या होत्या….फलंदाजीचा क्रमांक आता असणार होता डेविड गॉवरचा. संघाच्या ३०३ धावांवर तो बाद झाला.
उपाहारादरम्यान एक भन्नाट कल्पना गॉवरला सुचली. या मैदानापासून जवळच एक हवाई अड्डा होता. त्यामुळे मैदानावरून विमाने जात असल्याचे दृश्य खेळाडूंसाठी नवीन नव्हते. एक विमान भाड्याने घेऊन हवाई सफर करण्याचा आपला इरादा गॉवरने अॅलन लँब आणि स्मिथला बोलून दाखविला. (हे ‘नबाद’ होते.) (१ एप्रिल हा गॉवरचा वाढदिवस !) तो जॉन मॉरिसने (ह्याचाही वाढदिवस १ एप्रिलचाच) ऐकला आणि या उपक्रमात सामील होण्यास तो तयार झाला.खरेतर उपाहारादरम्यान कर्णधाराला न सांगता मैदानाबाहेर जाणे क्रिकेटच्या शिस्तीला धरून नव्हते पण गॉवर त्यावेळी जबरदस्त फॉर्मात होता. अड्डा जवळच होता आणि इंग्लंडचा डाव कोसळला तरी क्षेत्ररक्षणासाठी परतणे शक्य होते.
झाले… एप्रिल फूल्सवाल्यांनी अड्डा गाठला. हवे ते विमान त्यांना मिळाले नाही. लँब-स्मिथ खेळू लागले आणि अखेर टायगर मॉथ नावाच्या महायुद्धापूर्वीच्या एका विमानात ही जोडगोळी बसली. भाडे सत्तावीस पौंड ! दोन हजार फुटांवरून विमान उडणे अपेक्षित असताना गॉवरने वैमानिकाला गटवले आणि सुमारे २०० फुटांवरून हे विमान मैदानावर उडत उडत आले. स्मिथने शतक पूर्ण केले तेव्हा हे विमान किंचित खाली उतरले. अर्थातच त्यात आहे कोण हे स्मिथ-लँब या दोघांनाच ठाऊक होते. स्मिथने तर एक चेंडू गोळीप्रमाणे विमानावर मारण्याचा प्रयत्न केला !
मात्र वैमानिकांपैकी एकाने पत्रकाराला मसाला दिला होता आणि एका पत्रकाराने आपण दूरदर्शक भिंगाचा वापर करून ह्या दोघांना ओळखल्याचे सांगितले. तोवर इकडे एक स्वागतसमिती तयार झालेली होती. हे दोघे ड्रेसिंगरूममध्ये येताच कर्णधार गूचने “विमानात तुम्ही होतात की काय?” अशी विचारणा केली. गॉवरने आव आणला पण व्यर्थ ! इतर पत्रकारांनी इंग्लिश व्यवस्थापकाकडे विचारणा केली. त्याला हसू आवरले नाही आणि ह्या दोघांना तो शोधायला गेला तर काही उत्साही पत्रकार त्या दोघांना घेऊन प्रकाशचित्रे काढण्यासाठी विमानतळावर गेलेले होते !संघासोबतच्या अधिकार्यांचा पारा चढला. गॉवर वरिष्ठ खेळाडू होता. दोघांनाही प्रत्येकी १००० पौंडांचा दंड झाला. गॉवरची लय बिघडली. खरेतर दोघांनाही घरी पाठविण्याचा निर्णय झाला होता पण संघाची कामगिरी खराब होत असल्याने तो अमलात आणला गेला नाही असे नंतर उघड झाले.
शेवट गोड ते सारे गोड पण इथे ? मॉरिसला पुन्हा कधीही कसोटी खेळायला मिळाली नाही. गॉवर आणखी तीन कसोट्या खेळला पण ती त्याची सावलीसुद्धा वाटली नाही. पुढच्या दौर्यासाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आले (भारत दौरा). हजारो लोकांनी स्वयंस्फूर्तपणे सभा घेऊन या गोष्टीचा निषेध केला पण काही उपयोग झाला नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply