संकासुर…एक प्रवास असुराचा… लोककलेकडे
एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर.
कुणी कोकणवासी या असुराला दानशूर राजा म्हणूनही मान देताना दिसतो.
काहीजण संकासुराला ग्रामदेवतेचे प्रतीकही मानतात त्यामुळे संकासुरासह नमनांच्या खेळात त्याचे दोन रक्षकही असतात बरं का!
आजही भेटतो तो… कलेच्या … लोककलेच्या रूपाने जिवंत असलेला… त्याला भेटायचं आहे तुम्हाला???
चला आम्ही नेतो तुम्हाला कोकणात…. भातशेतीच्या,नारळी पोफळीच्या समृद्ध प्रदेशात शिमग्याला… आत्ता हा संकासूर नमन मंडळींसह सराव करताना भेटेल.
दापोली, दाभोळ, गुहागर, असगोली, हेदवी, पालशेत, पालपेणे, निवोशी, वेळंब; तसंच वरवेलीमधील रांजाणेवाडी व शिंदेवाडी… वगैरे गावांमधे संकासुराची नमन मंडळे आजही आपले अस्तित्व सांभाळून आहेत.
शिमगोत्सवाच्या पंधरा दिवसात पंचक्रोशीतल्या वाड्यावाड्यातून आपली लोककला जपताना दिसेल आणि आषाढात गेलात तर गुडगाभर चिखलात भातलावणी करतानाही भेटेल बरं का?
कोकणातल्या शिमग्याच्या सोंगांमधला संकासुर.वर्षानुवर्षे स्थानिक लोककलेचा अविभाज्य भाग असणारा हा पुराणातला राक्षस शिमगोत्सवात देव होतो.राधा किंवा गोमू या सोंगांसह नाचतो.दशावतारी खेळातही संकासुर भेटतोच.
कोकणातल्या शिमगा उत्सवात विविध सोंगे सादर केली जातात.काबाडकष्टातून आयुष्य जगणारा कोकणी माणूस उत्सवात चार घटका आनंद शोधतो, लोकांचं रंजन करतो.
प्रबोधनाची कोणतीच माध्यमं उपलब्ध नसताना स्थानिक लोककलाकारांनी कोकणात ही कला जिवंत ठेवली आणि ती ते आजही श्रद्धेने,आस्थेने जपत आहेत.
अंगात निळा किंवा काळा कापडी पूर्ण अंगरखा घालून,कमरेला सुमारे पंधरा किलो वजनाचा घुंगुरांचा वजनदार पट्टा बांधून नमन मंडळींसह संकासुर करणारा कलाकार ग्रामदेवतेच्या मंदिरात दाखल होतो. काटेसावरी,पळस,पांगारा यांनी आकाशात होळी पेटवलेली असतानाच फाक पंचमीला होम लागतो आणि शिमगोत्सव सुरु होतो.मागच्या वर्षी देवीसमोर उतरवलेला पांढर्या दाढीचा,टोपीवरील गोंड्यांची शोभा,जाड कापडाचा मुखवटा कलाकाराच्या चेहर्यावर चढतो… तालवाद्यांच्या आणि टाळांच्या घनगंभीर घुमेदार आवाजात सजून पूर्ण झालेला संकासुर देवीच्या चरणी लीन होतो… नमन मंडळींसह नाचू लागतो.हातातल्या वेटाने भक्तांना हळूच मारतोदेखील.
वाड्यावाड्यातून नमन मंडळींचे खेळ सुरु होतात.खेळ सादर करणार्या मंडळींची विशेष व्यवस्था केली जाते.संकासुराला देव मानले गेले असल्याने त्याची पूजा होते.त्याला नवस बोलला जातो.मागच्या वर्षीचा नवस पूर्ण झाला तर तो फेडलाही जातो.
असुराचा देव का झाला? कधी झाला? हे नक्की सांगता येणं कठीण आहे.पण एवढं मात्र सांगता येईल की निसर्गाच्या सहवासात राहणार्या भाबड्या कोकणी शेतकर्याने त्याला देवत्व दिलं.कालांतराने संकासूर दशावतारात येणारं विनोदी पात्रही बनला.
कुणी म्हणतं तो विष्णूचा अवतार तर कुणी आणखी काही… कुणी प्रसंगी त्याची चेष्टा करून त्याला भंडावूनही सोडतं.
आपला वजनदार पेहराव सावरत अनवाणी पायांनी संकासूर या खोडसळांच्या मागे पळत सुटतो,प्रसंगी पडतो,ठेचकाळतोही.पण संकासुराचं पात्र करणारा कलाकार मात्र त्या भूमिकेत पूर्णतया समरस झालेला असतो… त्याला दुःखाची जाणीवही नसते.
नमनांच्या खेळात संकासुरासह राधा,नकटा,पखवाजवादक,गोमू अशीही पात्रे असतात.पंधरा दिवस खेळ करत,संतांच्या रचना म्हणत थकले भागलेले हे जीव आपल्या गावी शिधा दक्षिणेसह परत येतात.
शेवटचा खेळ पुन्हा ग्रामदेवतेसमोर सादर होतो. संकासुराचा मुखवटा,मोठी पांढरी दाढी सगळं देवीला सादर केलं जातं… त्यात त्याच्या अनेक भावभावना गुंतलेल्या असतीलच….
काळाच्या ओघात मालवणी दशावतारात लोकरंजनाचे विनोद करताना तसेच आधुनिक बाजाच्या गाण्यांवर नृत्य करतानाही संकासूर दिसू लागला आहे.
पण खरा संकासूर मुखवटा उतरवल्यावरही वाद्यांच्या घुमावात गिरक्या घेतो आहे… कोकणच्या लाल मातीत… कोकणी माणसाच्या श्रद्धाळू मनात…
त्याचा प्रवास सुरुच आहे… एका होळीपासून पुढच्या होळीपर्यंत…. आपल्या देवत्वाला लोककलेची झालर चढवून तो नाचतच राहणार आहे….. परंपरागत लोककलेचे ज्ञान पुढच्या पिढ्यांना देण्यासाठीही तो उत्सुक आहे…
(मेहेंदळे मोशन पिक्चर्सने “संकासुर” या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन एक माहितीपटही तयार केला आहे.)
— डाॅ. आर्या जोशी
Khup chhan ajun vistrut mahit bhetali tr nakki try kra but ha lekh sankasurala chehra deun gela