नवीन लेखन...

चालणे आणि चालणे…

अनादी कालापासून आपण चालत आहोत. अगदी रामायण काळ जरी म्हटला तरी सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र थेट चौदा वर्ष चालत होते, वनवास होता ना. वामन अवतारात तीन पावलांत विश्व व्यापले गेल्याचे आपण ऐकत आलो आहोत. पांडवही बारा वर्षे वनवासात होते, चालतच असतील ना. थोडक्यात काय तर चालणे आपल्याला सुटलेले नाही. आपण सारेच चालत आहोत… चालतच राहणार आहोत.

मानवाचे चालणे इतर प्राण्यांसारखे नसते. मानवाच्या चालण्यात वैविध्य असते. काही माणसे भरभर चालतात. काही संथ पावले टाकत चालतात. काही घाई असल्या सारखे पावले टाकत चालतात. काही पावले मोजत चालतात. काही पायात पाय अडकवून चालतात. काही जवळजवळ पावले टाकुन चालतात. काही जमा झालेली चरबी कमी करण्याच्या इराद्याने चालतात. काही जणू ‘आम्ही राजे या भू’ चे या ऐटीत चालतात. असे नानाविध प्रकार चालण्याचे आपल्याला पहायला मिळतात. त्यातही राजकारण्यांचे चालणे वेगळे, मंत्र्याचे चालणे वेगळे, अधिकाऱ्याचे चालणे वेगळे, सर्वसामान्यांचे चालणे निराळे, तरुणांचे चालणे वेगळे. तरुणींचे आणि महिलांचे चालणे आणखीनच वेगळे. महिलांच्या चालण्यावर स्वतंत्रपणे आणि सविस्तर लिहले गेले आहे, लिहता येऊ शकते.  ‘तौबा ये मतवाली चाल, झुक जाये फुलो की डाल’ असे म्हणत या चालण्यावर श्रवणीय गाणेच रचले गेलेय.

घरात नव्या पाहुण्याचे आगमन होते, जल्लोषात त्याचे स्वागत केले जाते. त्याच्या बोबड्या बोलांनी घर बहरते, फुलते आणि हसतेही. हा नवा पाहुणा मोठा होऊ लागतो. बसू लागतो, रांगू लागतो आणि धडपड करत उभा राहतो. नंतर तो पहिले पाऊल टाकतो. त्याचे हे पहिले पाऊल टाकणे आई-बाबांसाठी कौतुकाचा आणि साठवून ठेवण्याचा क्षण. मग घरभर या नव्या पाहुण्याची मस्ती सुरू होते, घरातल्या सर्व सदस्यांना घरभर पळायला लावतो हा नवा पाहुणा. त्याचे हे चालणे निरालस, निर्व्याज असते. ते हवेहवेसे वाटते. थोडं मोठं झाल्यावर हा नवा पाहुणा शाळेच्या मार्गाने चालू लागतो. घराबाहेर पडलेलं त्याचं हे पहिलं पाऊल. तेथून त्याच्या आयुष्यभराची पायपीट सुरू होते. ती पुढे अव्याहतपणे सुरू राहते. वेगवेगळ्या संदर्भात चालण्याला अनेक अर्थ जोडले गेले आहेत. जसे मंदिरात गाभाऱ्याला फेऱ्या मारणे प्रदक्षीणा होऊन जातात. लग्नात वधुचा हात हाती धरून सात पावले चालणे सप्तपदी होऊन जाते. पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकाऱ्यांचे चालणे वारी होऊन जाते. प्रांत समयी ईश्वराचे नाम घेत चालणे प्रभातफेरी होते. डोंगरावर चालणे गिर्यारोहण होते, दोरीवरचे चालणे कसरत होते. चालता चालता फेर धरला तर ते नाचणे होऊन जाते. वाईट वळणावर गेलेल्याला वाईट चालीचा म्हटले जाते. अशा अनेक गोष्टी चालण्याला जोडल्या जातात. चालणे तेच राहते मात्र त्याला अनेक संदर्भ जोडले जातात, अनेक अर्थ प्राप्त होतात.

वैश्विकस्तराचा जर विचार केला तर आपण राहतो ती पृथ्वी देखील स्वत:भोवती प्रदक्षीणा घालते आहे. सूर्याभोवती फिरते आहे, म्हणजेच चालते आहे. या विश्वातील सर्व ग्रह स्वत: भोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षीणा घालत चालत आहेत. वैश्विकस्तराचे हे चालणे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. जीवनप्रवासाचे अनेक संदर्भ या चालण्याला जोडले गेले आहेत. आपण कोठुन कोठे चालत जातो आहोत याचा शोध अजुन लागायचा आहे. कदाचीत त्या शोधासाठीच आपण सारेच चालत आहोत, चालत राहणार आहोत. म्हणूनच हाच संदर्भ घेत लिहिले गेले असावे…

‘जिंदगी का सफर, है ये कैसा सफर,

कोई समझा नही कोई जाना नही

चलते है सब मगर, कोई समझा नही

कोई जाना नही’

— दिनेश दीक्षित जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..