शासकीय कार्यालयं. फायलींचा ढिग.. फायली अनेकांच्या आशा अपेक्षा कैद झालेल्या, कुणीची टेंडर गिळून बसलेल्या फायली, कुणाचे प्रमोशन थांबवून बसलेल्या फायली. कुणाची तक्रार घेऊन आलेल्या फायली. कुणाच्या अपेक्षांच्या निवेदनाने तयार झालेल्या फायली… एक ना अनेक विषय या फायलींत कैद झालेले असतात, आहेत. ऑन-लाईन आणि ई-टेंडरिंगच्या जमान्यातही फायली आहेतच की. कारण फायली असल्याशिवाय काम होत नाही, असा एक शोध नुकताच लागलाय. कुणी लावलाय माहित नाही. हे शोधण्यासाठीही फाईल तयार करावी लागणार आहे. असो…
फायली, कागदांची भेंडोळं सांभाळत त्यांचा प्रवास सुरू होतो. आशा-अपेक्षांचे शब्द घेऊन ते कागदावर उतरतात. हे कागद सादर केले जातात. त्यावर शिक्का मारला जातो, मग तो कागद पुढे जातो, त्यावर आणखी काही कागदं जोडली जातात, शिक्के मारले जातात. फाईल तयार होत जाते… पुढे जात राहते… काही वेळेला तिच्या चालण्याचा वेग जोरदार असतो. एखाद्या सुपर एक्स्प्रेस सारखा, तिचा प्रवास सुरू होता. काही स्टेशन गाळत ही फाईल इच्छित स्थळी पोहचतेही. काहीवेळा फाईल पॅसेंजरमध्ये बसते. प्रत्येक टप्प्यावर ती थांबत जाते, अडकत जाते, काहीवेळा ही फाईल मालगाडीही होऊन जाते, तिला कोणताच सिग्नल लवकर मिळत नाही, तिचा प्रवास सुरू होतो पण लगेच थांबतो देखील. जास्त दूर पर्यंत ती जाऊ शकत नाही. तिच्यावर विशिष्ट शेरा मारला जातो, तिला साईडला टाकले जाते. जशी मालगाडी साईडला उभी करून एक्स्प्रेसला वाट करून दिली जाते. तशी… फाईल सिक्रेट असते, फाईल ओपन असते. फाईल हाय प्रोफाईल सुद्धा असते, फाईल सामान्यांची सुद्धा असते…
आपल्या विविध शासकीय कार्यालयात तयार होणाऱ्या फायलींना त्या त्या कार्यालयाची एक किनार लाभते. कसे. पोलिस ठाण्यात तयार होणाऱ्या गुन्हेगारांच्या फायलींना गुन्ह्याची किनार असते. सरकारी रुग्णालयात तयार होणाऱ्या फाईलीला वेदनेचा हुंकार असतो. शिक्षणाच्या मंदिरात तयार होणाऱ्या फायलींना स्वप्नाची किनार लाभलेली असते. कृषी विभागात तयार होणारी फाईल शेतकऱ्यांच्या अश्रुंचे संचीत असते. या आणि या सारख्या अनेक विभागात तयार होणाऱ्या फायलींना काही ना काही संदर्भ लागलेले असतात. काही ना काही अर्थ लाभलेले असतात. त्यांचा प्रवास सुरू असतो…!
बर ही फाईल एखाद्या कार्यालयात आल्यावर त्यात काय लिहिलंय, काय मांडलंय हे किती गंभीरपणे पाहिले जाते, माहिती नाही. सही करण्या आधी त्यावर वजन किती आणि कसं आहे हे आधी पाहिले जाते. मग ठरवलं जातं सही करावी की नाही, हा सार्वत्रिक अनुभव असावा आणि आहेच… आशा अपेक्षांच्या पुर्ततेचा, सत्याच्या विजयाचे आश्वासन देणाऱ्या या फायली निर्जीव असल्या तरी त्यांच्यात जान असते. ही जान अनेकांना न्याय देते, अनेकांच्या अपेक्षा पुर्ण करते, काहींना अडचणीत आणते, काहींना घरचा रस्ता दाखवते.
फायलींत काय असते… फायलीत असते धरण, फायलीत असतो रस्ता, फायलीत असते शेततळं, फायलीत असते गुरा-ढोरांचे वाटप, फायलीत असते शेतकऱ्यांची कर्जे, फायलीत असतात अनुदानं… फायलीत असतात सानुग्रह अनुदानं… फायलीत असतात नोकऱ्या देणारे आदेश.. इतकेच काय पण माणसाच्या जन्म-मृत्यूची नोंदही फायलीतच सापडते… आता बोला… फायलीपासुन आपण लांब जाऊ शकत नाही… आपण त्या नाकारू शकत नाही… त्या आपल्याला नाकारू शकत नाही… इतके मात्र खरे…!
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
Leave a Reply