बकुळीची ओंजळभर फुले,
तू देतां हातांत,–
विसरून आपुले भान सारे,
उभी राहिले अंगणात,–!!
सुवास त्यांचा आसमंती,
जरी ती असती ओंजळीत,
बाहेरील जगाहून अधिक,
दरवळ उरला माझ्या मनात,–!!!
चोरटी ती भेट आठवे,
लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे,
आज स्मृती मनी खेळती,–!!!
तू हाती हात घेता ,
मी जशी फूल झाले ,
पाकळीगत नाजूक,
बहरून कशी उठले,–!!!
लज्जेचा पडदा मध्येही,
तोही अगदी अवगुंठला,
मान खाली झुकवत ,
अंगठा मी मातीत घासला,–!!!
जवळ तू येता कसा,
हातही जणू थरथरला,
बिनधास्त रांगडेपणा,
पाहुनी जीव भांबावला,–!!!
बावरल्या मना सावरता,
जवळीक तुझी हवी वाटे,
दूर जात,येता जवळी,
एकरूपतेचे आपले नाते,–!!!
सुगंधभारल्या बकूळ फुलांचा, वाटा मजसी तू दिला,
हृदयाचे बकुळफूल करत,
प्रेम- सुगंध मी वाटला,–!!!
बकुळीची फुले सानुली सानुली, आता आहेत सुरकुतलेली,—
दरवळ अजून कायम त्यांचा, प्रेमरंगीच खरी रंगलेली,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply