नवीन लेखन...

आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश, दूरस्थ अवकाश वगैरे…

अवकाशयुगामुळे बरेचसे विज्ञानीय शब्द प्रचारात आले आहेत. आकाश, अंतराळ, अंतरिक्ष, अवकाश आणि दूरस्थ अवकाश या पाच शब्दांचा अर्थछटा समजून घेणे किंवा त्यांचे अर्थ संकेताने निश्चित करणे आवश्यक वाटते.

आकाश : पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यपकाशाचे विकीरण होअून निळ्या रंगाची पोकळी दिसते ते आकाश. आकाशात ढग असतात, इंद्रधनुष्य दिसते, आकाशातून पाअुसही पडतो. आकाशात पक्षी अुडतात, विमाने अुडतात (हिंदीतील हवाआी जहाज असा शब्द मराठीत न वापरता, रामायणातला विमान हा शब्द आपण वापरतो हे फार चांगले आहे). आकाशाला निळी छत्री असेही म्हणतात.अंतराळ :पृथ्वीच्या वातावरणापलीकडील आणि पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंतची पोकळी आहे तिला अंतराळ म्हणू या. म्हणजे चंद्रावर अंतराळवीर अुतरले, किंवा अंतराळवीरांनी हबल दुर्बिणीची दुरूस्ती केली किंवा मीर या अंतराळ स्थानकावरून अंतराळशास्त्रज्ञ पृथ्वीवर परतले, हे शब्दप्रयोग सार्थ वाटतील.अंतराळात, पृथ्वीभोवती अुपग्रह फिरतात, संदेश दळणवळणासाठी भूस्थिर अुपग्रह असतात. भूस्थिर अुपग्रहांचे वैशिष्ठ्य म्हणजे, पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा कोनीय वेग आणि या अुपग्रहांचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा कोनीय वेग अगदी सारखा असतो. त्यामुळे पृथ्वीवरून त्या अुपग्रहाचे वेध घेतांना तो स्थिर असल्यासारखा वाटतो. अेकाच दिशेने जाणार्‍या दोन लोकल गाड्यांचा वेग सारखाच झाला की त्या फलाटावर अुभ्या असल्यासारख्या स्थिर वाटतात तसे. या अंतराळ पोकळीत वातावरणाचा अवरोध नसल्यामुळे यानांचा आणि अुपग्रहांचा वेग आणि कक्षा बर्‍याच काळापर्यंत स्थिर राहतात.पृथ्वीपासून चंद्राच्या कक्षेपर्यंत किंवा चंद्रावर झेप घेणार्‍या यानांना अंतराळयाने म्हणता येआील. ‘यान’ हा शब्दप्रयोग फारच चांगला आहे. वातावरणात अुडू शकते ते विमान आणि वातावरणाच्या पलिकडील पोकळीत प्रवास करू शकते ते यान. चंद्राच्या कक्षेपर्यंत प्रवास करतात ती अंतराळयाने. ज्यावर अंतराळवीर नसतो, फक्त अुपकरणेच असतात आणि जो पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घाल
त राहतो तो अुपग्रह. अमेरिकेच्या, डिस्कव्हरी, अटलांटिस आणि अेन्डेव्हर या अंतराळ शटल्सना अंतराळ वाहने म्हणणे

संयुक्तिक होआील कारण त्यात अंतराळवीर असतात आणि ती याने पुन्हा पुन्हा वापरता येतात. चॅलेन्जर आणि कोलंबिया ही अंतराळवाहने अपघाताने नष्ट झाली आहेत.अंतरिक्ष :चंद्रकक्षेपलीकडील, सूर्यमालेतील पोकळी म्हणजे चंद्रकक्षेपासून आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केन्द्र आहे, म्हणून त्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्यमालेच्या परीघापर्यंत अंतरिक्षाची मर्यादा होते. शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांचे, ज्या यानांतून वेध घेतले गेले ती अंतरिक्ष याने, अंतराळ याने नव्हेत. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे अुपग्रह, प्लुटोसारखे बटुग्रह, लघुग्रहांचा पट्टा आणि त्यातील लघुग्रह, अशनी वगैरे वस्तू अंतरिक्षात भ्रमण करतात. पृथ्वीही अंतरिक्षातच भ्रमण करते. परंतू वातावरणापलीकडल्या आणि चंद्रकक्षेपर्यंतच्या भागाला आपण अंतराळ म्हटले आहे. म्हणून अंतराळ हा अंतरिक्षाचाच भाग होतो.अवकाश : आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपलीकडील पोकळी म्हणजे अवकाश, स्पेस. ज्यात फक्त अुपकरणेच असतात आणि जे आपल्या सूर्यमालेतील अेखाद्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालून नंतर अवकाशात प्रवासही करते ते अवकाशयान. आपली आकाशगंगा १ लाख प्रकाशवर्षे अीतक्या व्यासाची आणि मध्यभागी 10 हजार ते 12 हजार प्रकाशवर्षे जाडी असलेली चकती आहे. आकशगंगेत २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेचा विस्तार म्हणजे अवकाश. सूर्यमालिकेपलीकडे प्रवास करणार्‍या पायोनियर सारख्या यानांना अंतराळ किंवा अंतरिक्ष याने न म्हणता अवकाशयाने म्हणणे जास्त संयुक्तिक व्हावे.
दूरस्थ अवकाश :
आपल्या आकाशगंगेच्या पलीकडील, हजारो, किंवा लाखो पकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगा, दीर्घिका आणि तारकापूंज जेथे असतात ते दूरस्थ अवकाश, डीप स्पेस, असे छटाभेद करता येतील.इंग्रजीत मात्र स्काय, स्पेस आणि डीपस्पेस हे तीनच शब्द प्रामुख्याने वापरतात.गजानन वामनाचार्यफेब्रुवारी, 2011

— गजानन वामनाचार्य

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..