विठ्ठल नामाचा गजर
चला जाऊ बेगी बेगी
चला चालू पायी पायी
आतुरले भेटीसाठी
मायबाप विठू रखमाई
मुखी नाम विठोबाचे
चित्ती स्वरूप तयाचे
ध्यानी मनी नाचतो हा
तृप्त तृप्त झाले डोळे
टाळ मृदंग बोलती
विठ्ठल विठ्ठल महिमा
काया झाली पंढरी ही
आत्मा विठ्ठल श्रीहरी हा
चला जाऊ वेगी वेगी
चला जाऊ पंढरेसी
माथा लावू चरणा
विठ्ठलच होऊ माझे मना…
विठू भक्तीचा डांगोरा पिटत वारकरी निघाले आहे पंढरीला. ना रिमझिमत्या पावसाची चिंता. ना थंडी वार्याची तमा. भक्त चालतच आहे पंढरीच्या दिशेने. पाऊस कोसळतोय. अंगाला झोंबतोय. सरीवर सरी अंगांवर झेलीत मायमाऊली विठूरायाच्या दर्शनाला निघालाय प्रेमळ भक्त. जणू हा पाऊस त्याच ओढीने भक्ताला आनंदाचे सुखाचे प्रेमजल शिंपीत तोही त्यांच्या बरोबरीनेच चाललाय. काय अलौकिक असा भक्तीचा हा ओलावा. एकीकडे गावागावातून निघालीय वारी पंढरीला तर दुसरीकडे गावागावातील देवळं मंदिरांमध्ये भक्तीपंथांचे मेळे भरू लागलेय. गोव्याहून तर शेकडो वारकरी पंढरीच्या दिशेने पायी चालत आहेत. विठू भक्तीचा हा देखावा पाहाताना मन तृप्त होतेच. शिवाय वारकरी भजने आपल्या मनाला सुखावून जातात. गोव्यात भजनाची अखंड परंपरा आहे. याचा अनुभव घ्यायचा असेल तर आषाढ श्रावणात गोव्याला भेट देऊन चला. कला अकादमीच्या अखिल गोवा भजन स्पर्धेचे अप्रूप पाहायचे असेल तर नक्कीच एकदा अनुभवून चला.
ग्रीष्माच्या झळा अंगाची लाही लाही करतात. तरीही त्याची कुठलीच पर्वा न करता भजनी कलाकार स्पर्धेच्या तयारीला लागतो. अंतिम भजन स्पर्धा असते ती श्रावणात अर्थात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी. परंतु कार्यशाळांना आधीच सुरूवात होत असते. शेकडो पथके या स्पर्धेत सहभागी होत असल्याने अंतिम स्पर्धेआधी गावागावात विविध केंद्रांवर विभागीय स्पर्धा घेतल्या जातात. आणि मग त्यातील निवडक पथकांची अंतिम फेरी होते. बाल विभाग, महिला विभाग आणि पुरूष विभाग. अशा तीन विभागांमध्ये घेण्यात येणार्या या स्पर्धेत शेकडो भजनी कलाकार भक्तीरसाचा आस्वाद गोवेकरांना देतात. यंदा महिला विभागात जवळ जवळ 130 पथके, बाल विभागात जवळ जवळ 40 पथके, तर पुरूष गटात जवळ जवळ 100 पथके सहभागी झली आहेत. नवीन पिढीला भक्ती संस्कृती, भजन संस्कृती, गोव्याची भजन परंपरा समजावी, यातून नवीन कलाकार घडावेत या उद्देशाने ही अखंड परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. गोव्यातील भजन परंपरेला शास्त्रीय संगीताची बैठक आहे. इतर राज्याहून गोव्याची भजन परंपरा वेगळी आहे. गोव्यात महान भजनी कलाकार, भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांनी आखून दिलेल्या भजन बैठकीतच गोव्यात भजनाचे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ काही वर्षांपूर्वी कला अकादमीने या स्पर्धेचे आयोजन केले.
गोमंतकीय भजन परंपरेचे प्रणेते म्हणून संतकवी कृष्णंभट्ट बांदकर, भजनी सप्ताहाचे आद्य प्रवर्तक जगन्नाथबुवा बोरीकर व संतकवी सोहिरोबानाथ आंबिये यांचे नाव अग्रणी आहे.
कृष्णंभट्ट बांदकर हे गोव्यातील भजनाचे स्फूर्तिस्थान. ते रामभक्त होते. त्यांनी अनेक भजनेही रचली आहेत.
विश्वाचा विश्राम रे
स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याते
गाऊ वाचे नाम रे…
हा पंडित जितेंद्र अभिषेकीबुवांनी संगीतबध्द आणि गायिलेला अभंग. जनमानसात रूढ झालेल्या अशा त्यांच्या कितीतरी रचना आहेत. जगन्नाथबुवा बोरीकरांनी गोव्यात अखंड भजनी सप्ताहाचा पाया रचला. पोर्तुगिजांना न जुमानता आपली भजन परंपरा त्यांनी जपली. एवढेच नव्हे तर गावागावात ही परंपरा रूजवून ती रूढ केली. आजही गोव्यातील गावागावांमध्ये आषाढ महिन्यात अखंड भजनी सप्ताह होतात. काही ठिकाणी चोविस तासांचा तर काही ठिकाणी सात दिवसांचा सप्ताह होतो. या काळात गावातील लोक अखंड भजनं चालू ठेवतात. न थांबता न थकता विठू नामाचा गजर करीत गावातील भजनी मेळे या अखंड सप्ताहात सहभागी होतात. आपल्या गोव्याचे संत सोहिरोबानाथ आंबिये यांचे नाव तर भारतीय संतांमध्ये घेतले जाते. अशा अखंड भजन परंपरेचे संवर्धन आजही गोव्यात होते. कला अकादमीची भव्य अशी स्पर्धा तर होतेच. त्याशिवाय गोव्यातील काही प्रमुख देवस्थाने तसेच गावातील देवस्थानांमध्येही स्पर्धा घेतल्या जातात. आषाढ श्रावणात गावागावातील मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे चतुर्थीपर्यंत गोव्यात उत्सवी वातावरण असते.
वर म्हटल्याप्रमाणेच कला अकादमीची अखिल गोवा भजनी स्पर्धा ही भजनसम्राट मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केली जाते. 1979 साली मनोहरबुवा शिरगावकर कैलासवासी झाले. मनोहरबुवांच्या स्मरणार्थ कला अकादमीचे तत्कालीन अध्यक्ष व गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या सूचनेवरून कला अकादमीने भजन स्पर्धा गोव्यात सुरू केली. 1979-80 या वर्षी झालेल्या या प्रथम स्पर्धेत केवळ 35 ते 40 भजनी पथकांचा समावेश होता. सुरुवातीला वृद्धत्वाकडे झुकू लागलेले ज्येष्ठ कलाकारच या स्पर्धेत सहभागी होत. परंतु जशीतशी स्पर्धा वृद्धिंगत होऊ लागली तसतशी तरूण मंडळीही स्पर्धेत सहभागी होऊ लागली. आधी ही स्पर्धा केवळ पुरुष कलाकारांपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे एखाद दुसर्या पथकात महिला अथवा बालकलाकार पुरुषांच्या पथकातूनच सहभागी होऊन आपले भजन कलेतील कौशल्य दाखवत. त्यामुळे अकादमीने 2000-2001 या वर्षी महिला कलाकारांसाठी तर 2001-2002 वर्षी बालकलाकारांसाठी स्वतंत्र स्पर्धा सुरू केली. आज या स्पर्धेचे व्यापक स्वरूप पाहाता, कला अकादमीचे यश दिसते. ही स्पर्धा केवळ नावापुरती, एकमेकांशी चुरस करण्यासाठी किंवा केवळ बक्षीसे मिळवण्यापुरती नव्हे तर कलाकारांना दिलेले हे भव्य व्यासपीठ आहे. हा भक्ती महोत्सव यशस्वी करण्यासाठी गोवाभरातील भजनी कलाकार या स्पर्धेत सहभागी होतात. शेकडो पथके हजारो गायक कलाकार, वादक यात सहभागी होऊन हा भक्तीमहोत्सव साजरा करतात. काय आहे मनोहारी भजन परंपरा हे गोवेकरांना माहित आहे. गोव्याबाहेरील लोकांना कळावे यासाठी थोडक्यात. पूर्वी गोव्यातही वारकरी भजन परंपराच होती. परंतु शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेल्या मनोहरबुवांनी भजनाची शास्त्रीय बैठकीत संरचना केली. यात सर्वात आधी रामकृष्णाच्या अनेक नावांची आळवणी करून भजनाची वातावरण निर्मिती केली जाते.
श्रीरामा पुरूषोत्तमा नरहरी नारायणा केशवा
गोविंदा गरूडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा
श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते
वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम
अलंकापूरी पुण्यभूमी पवित्र
तिथे नांदती ज्ञानराजे सुपात्र
तया आठविता महापुण्यराशी
नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरासी
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय…
अशी आळवणी झाल्यावर गजर करीत “रूप पाहता लोचनी ” हा रूपपर आणि “सुंदर ते ध्यान” ही ध्यानपर भक्ती रचना आळवीत गजर केला जातो. त्यानंतर भजनाचा उत्तरार्ध. यात अभंग गायन केले जाते. यात नामपर अभंग, त्यानंतर उपदेशपर अभंग, स्तुतीपर अभंग, स्थितीपर अभंग, विनवणीपर अभंग गायिले जातात. त्यानंतर अंतिम टप्प्यात गवळण गायल्यानंतर भैरवी झाल्यावर मागणीपर श्लोक, द्रुत गजर व प्रार्थनेेने भजनाची सांगता होते. मनोहरबुवांनी सुरू केलेले हे बैठकीचे भजन त्याकाळी लोकांना आवडायचे. पुढे हेच शास्त्रीय बैठकीतले भजन सर्वाथाने गोमंतकीय भजन परंपरेत रूढ झाले. बिदागी देऊन लोकं मनोहरबुवांना भजनाच्या कार्यक्रमांना बोलवायचे. अशा या भजनाला गोवेकर “मनोहारी भजन” म्हणून ओळखू लागले. टाळ, मृदंग आणि संवादिनी या संगीत वाद्यांच्या साथीने हे भजन सादर केले जायचे. मनोहरबुवांनी गोवाभरात भजनाच्या अनेक मैफली केल्या. तसे शिष्यही तयार केले. यात मनोहरबुवांचे सुपुत्र नाना शिरगावकर, नरहरीबुवा वळवईकर, दत्ताराम वळवईकर, सोमनाथ च्यारी, कमलाकांत आरोंदेकर, वामनराव पिळगावकर, मुुंकुंद शेट मडकईकर, नंदकुमार पर्वतकर आदी भजनी कलाकारांचा समावेश आहे. त्यांच्या शिष्यगणांनी ही भजनपरंपरा गोव्यात रूजवली. म्हणूनच आज मनोहारी भजनाची परंपरा गोव्यातील तरूणाई आवडीने जोपासतात. खरंच भावार्थाने भक्ती महोत्सव अनुभवायचा तर तो गोव्यातच. एकीकडे वारकरी मंडळी पंढरीला पायी पायी जातात. तर गोव्यात गावागावात टाळ मृदंगाचा नाद घुमत असतो. भक्तीरसाची ही गोडी सुटे ना कुणाला असेच या संतांच्या अभंग रचना. आणि असा हा कला अकादमीचा भक्तीमहोत्सव. कला अकादमीचे तत्कालिन अध्यक्ष प्रतापसिंह राणे यांच्या कारकिर्दीत सुरू झालेला हा महोत्सव अखंडपणे चालू आहे. विद्यमान अध्यक्ष गोव्याचे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हे कलाकार असल्याने अकादमीच्या सर्व उपक्रमांमध्ये ते उत्साहाने लक्ष देतात.
— कालिका बापट
Leave a Reply