१५ फेब्रुवारी १९५६ ही डेस्मंड हेन्सची जन्मतारिख. कॅरिबिअन बेटांवरिल बार्बडोसमध्ये जन्मलेला हा क्रिकेटमधिल एक प्रसिद्ध कलाकार.
सलामिच्या अनेक सुरस कथा ज्यांच्या नावावर आहेत त्यापैकी एक अत्यंत विख्यात जोडी म्हणजे गॉर्डन ग्रिनिज आणी डेस्मंड हेन्स ही सलामिची जोडी. १९८० च्या दशकात या जोडिने कसोट्यांमध्ये जबरदस्त सलामिच्या भागिदार्यांचा झपाटा सुरू केला होता. एकुण १६ शतकिय भागिदार्या या दोघांनी रचल्या, त्यांपैकी चार २०० हुन अधिक धावांच्या होत्या. ग्रिनिज आणी हेन्स यांनी कसोट्यांमध्ये एकमेकांना साथ देत ६,४८२ धावा भागिदारित जोडल्या होत्या. कसोटी सामन्यांमधिल हा विश्वविक्रम आहे.
आक्रमकतेत मात्र ग्रिनिज केव्हाही डेस्मंडला भारी होता. डेस्मंडला हळुहळू धावा जमविणे आवडे असे त्याच्या सांख्यिकिवरुन जाणवते. ११६ कसोट्यांमधुन ४२.२९ च्या पारंपरिक सरासरिने ७,४८७ धावा हेन्सने काढल्या. त्याच्या कारकिर्दितिल पहिली कसोटी सुरू झाली ३ मार्च १९७८ ला आणी अखेरची कसोटी सुरु झाली १३ एप्रिल १९९४ ला.
डेस्मंड हेन्सचा कसोट्यांमधिल सर्वोच्च धावांचा डाव आला इंग्लंडविरुद्ध १९८४ मध्ये. ३९५ चेंडुंचा सामना करीत त्या डावात त्याने १८४ धावा काढल्या होत्या. कसोट्यांमध्ये फार कमी फलंदाज चेंडू हाताळल्यामुळे बाद झालेले आहेत. डेस्मंड हेन्स त्यांपैकी एक आहे. भारताविरुद्ध मार्च १९७८ मध्ये हे नको असलेले वेगळेपण बाळगणार्यांच्या गटात हेन्स सामिल झाला.
२२ फेब्रुवारी १९७८ रोजी हेन्सचे आंतरराष्ट्रिय पदार्पण झाले. पदार्पणाच्या ह्या एकदिवसिय सामन्यात हेन्सने तडाखेबंद १४८ धावा काढल्या होत्या. “सचिन तेंडुलकरच्या आधी कुणाच्या नावावर एकदिवसिय सामन्यांमधिल बहुतांश फलंदाजिचे विक्रम होते” ह्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर “डेस्मंड हेन्स” हेच आहे. सर्वाधिक धावा आणी सर्वाधिक एदिसा शतकांच्या बाबतित तर हे विशेषकरुन खरे आहे.
१९७९ च्या विश्वचषकात तो खेळला. अर्थातच विश्वविजेत्या चमुचा तो एक खेळाडू होता. त्यानंतरच्या तिन विश्वचषकांमध्येही तो खेळला. विश्वचषकाच्या २५ सामन्यांमधुन ३७.१३ च्या सरासरिने ८५४ धावा एक शतक आणी तिन पन्नाशांसह डेस्मंड हेन्सने जमविलेल्या आहेत.
१९९०-९१ च्या हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मर्व ह्युजेस, इअन हिली, क्रेग मॅक्डरमॉट आणी डेविड बुन प्रभृतिंशी तो शब्दास्त्रे वापरित भिडला. याच पराक्रमांनंतर बुनने त्याचे नामकरण “डेसी” असे केले.
१९९१ मध्ये हेन्सला विज्डेनचा क्रिकेटर ऑफ द इयर हा सन्मान मिळाला.
इतर विंडिज सलामिविरांप्रमाणेच हेन्स वेगवान गोलंदाजी लहान असतानाच मारायला शिकला होता आणी कारकिर्दित आरम्भी तो फिरकिविरुद्ध अडखळला खरा पण नंतर त्याने आपल्या खेळावर मेहनत करुन फिरकी फोडण्याची कलाही शिकुन घेतली. मिडलसेक्स परगण्यातुन इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये डेसी खेळलेला आहे.
डेस्मंड लिओ हेन्स या त्याच्या सम्पुर्ण नावातिल मधल्या शब्दाचा वापर करुन त्याच्या चरित्राचे एक पुस्तक त्याच्या निवृत्तिनंतर बाजारात आले : लायन ऑफ बार्बडोस.
कॅरिबिअन बेटांवरिल बार्बडोसमध्ये जन्मलेला हा क्रिकेटमधिल एक प्रसिद्ध कलाकार.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply