निनाद त्याच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.
निनाद भीतीने थरथरत होता. तो दचकून उठून बसला! तो घामाने पुरता भिजून गेला होता!
“काय झालं, निनाद?” स्वरालीने झोपाळू स्वरात विचारले.
“पुन्हा तेच स्वप्न! वटवाघुळीचं!”
शकी जवळच कोठे तरी असल्याचे निनादला जाणवतच होते, पण ती दिसत नव्हती!
त्याच्या बेडरूमच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने उलटे लटकलेले, ते लालभडक डोळ्यांचे वटवाघूळ अंधारात उडून गेले!
०००
“काल नेमकं काय झालं?” डॉ. मुकुलनी विचारलं. डॉ. मुकुल. सायकॉलॉजिचे प्रख्यात तज्ञ! त्यांच्या समोर निनाद आणि स्वराली, हे तरुण जोडपे बसले होते.
“तसे फारसे काही नाही. पण हि स्वराली खूप घाबरते. नको त्या गोष्टीचे टेन्शन घेते. बाब किरकोळच आहे. तुम्ही ऐकाल तर पोरकटपणाच वाटेल तुम्हाला.” निनाद म्हणाला. हे मानसशात्राचं खूळ हल्ली उगाच फोफावतय, असे निनादचे मत होते.
“फारसे कसे नाही? अन हे ठरवणारा, तू कोण? डॉक्टरांना ते ठरवू देत ना!” स्वराली हिरीरीने म्हणाली.
” हो. हो. असे भांडू नका प्लिज. निनाद, मला फॅक्ट कळू देत. मग आपण ठरवू, बाब किरकोळ आहे का गंभीर! ओके!” डॉ.मुकुलनी हस्तक्षेप केला.
“तर झालं काय कि”, स्वराली सांगू लागली, ” काल रात्रीआम्ही, म्हणजे मी आणि निनाद, सिनेमा पहात होतो. साधारण रात्री आकाराचा सुमार असावा. सिनेमा चालू असताना, दोन्ही हात कानावर ठेवून हा अचानक ओरडला, ओरडला कसला? किंचाळलाच! भयंकर भीती वाटल्यासारखा चेहरा झाला होता तेव्हा याचा !”
“मग?”
“मग? मी डॉ. दीक्षितांना फोन करून बोलावले. निनादचा बीपी खूप वाढला होता. आणि पल्स पण. डॉक्टरांनी एक इंजक्शन दिले. ते दोन तास त्याचा जवळच थांबले. कारण इमर्जन्सीची उद्भवण्याची त्यांना शंका होती. पण गॉड थँक्स! तसे काही झाले नाही. त्यांनी तुम्हास रेफर केलं.”
निनाद खाली मान घालून बसला होता. आपल्या सारखा एक तिशीतला तरुण ‘भित्रा’ सिद्ध होतोय, हे त्याला आवडत नव्हते.
“निनाद, तुम्ही का ओरडलात? काही आठवतंय का?”डॉ. मुकुलांनी विचारले.
“नाही, पण मला अचानक खूप भीती वाटली! कारण नाही सांगता येणार.”
“ओके. बाय द वे, कोणता सिनेमा पहात होता तुम्ही?”
“बॅटमन सिरीज मधला तो कोणता तरी सिनेमा होता!”
“तुमच्या घरात होम थेटर आहे?”
“हो, मला आणि स्वराला सिनेमाचे वेड आहे. ”
“टीव्ही स्पीकरवर होता का हेडफोन वापरता?”
“शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून, आम्ही हेडफोनचं वापरतो.”
त्या मुळे सिनेमाच्या दृश्याची परिणामकता वाढली होती. आणि त्या दृश्यात निनादच्या ‘भीती’ संबंधी काहीतरी होते. याची डॉ. मुकुलला कल्पना आली.
“अचानक भीती वाटण्याचे कारण आपण शोधून काढू. त्यात तथ्य असेल तर, ती भीती घालवण्यासाठी उपाय योजना करता येतील. निनाद, तुमची संमती असेल तर, मी तुम्हास संमोहित करून, ती ‘भीती’ कोणती?, हे,मी तुमच्या अंतर्मनातून हुडकून काढू शकेन! पण या साठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे. तुम्ही लहानपणी कशाला भीत होता का?”
“नाही. तसा मी धीट मुलगा होतो!” या डॉक्टरला त्या स्वप्नांचं सांगावं का? पण त्याचा या ओरडण्याशी काय संबंध? उगाच कशाला सांगायचं. विचारलंतर बघू. निनादने असे ठरवून टाकले.
” साधारण वीसेक मिनिटे लागतील, संमोहनाच्या एका सीटिंग साठी. चालेल ना? काय, निनाद ?”
” ठीक. मी तयार आहे.” निनाद म्हणाला.
स्वरालीने पर्समधून आपला मोबाईल काढला. डॉ. गालातल्या गालात हसले, आता तासभर लागलातरी हरकत नव्हती!
०००
डॉ. मुकुल निनादला घेऊन संमोहन कक्षात आले. तो छोटासा कक्ष, फिकट निळ्या रंगात न्हावून निघाला होता. अगदी छत आणि जमीनसुद्धा निळसरच होती. त्या कक्षाच्या मध्यभागी, स्पा मध्ये असते तशी आरामदायी, पाय लांब करून झोपतायेण्या जोगी खुर्ची होती. डॉक्टरांनी निनादला त्या खुर्चीत झोपवले. संपूर्ण कक्षाच्या सुखद गारव्यात एक अनोखा सुगंध होता. डॉक्टरांनी एक हेडफोन निनादच्या कानावर लावला. दुसरा हेडफोन त्यांनी आपल्या कानावर लावला. आणि ते काचेच्या पार्टीशन मागे असलेल्या त्यांच्या टेबलवर जाऊन बसले.
निनादला मंद संगीत त्या हेडफोन मधून ऐकू येत होते. नदी काठचा परिसर, हिरवा गारवा, मधेच पाण्याचा खळखळाट असे काही काही त्या संगीतात होते. आपण नदी काठच्या झाडाला टेकून बसल्याचा निनादला फील येत होता.
“निनाद, माझा आवाज ऐकू येतोय का?”
“हो.” निनादला संगीताच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनाच आवाज ऐकू येत होता.
“रिलॅक्स व्हा. शरीर सैल सोडा. कुठलाही ताण तुमच्या शरीरावर आणि मनावर नाही. चिंता मुक्त आहेत.”
निनाद सैलावला.
“निनाद, तुम्हास समोर लाल ठिपका दिसतोय का? अगदी नजरे समोरच्या भिंतीवर.”
“हो.” समोरच्या भिंतीवर तळहाताच्या आकाराचा लाल रंगाचा ठिपका अवतरत होता.
“त्याचा कडे एक टक पहात रहा. त्याचा रंग बदलत जाईल. तो बदल मला सांगत रहा. ”
” तो लाल ठिपका आता अधिक गडद होतोय, तो ब्राऊन झालाय, अजून गडद होत, तो काळा ठिक्कर पडलाय! तो जागेवरच फिरत असल्याचा भास होतोय.”
” हू, पुढे?”
“आता त्यातून काळी वलय बाहेर पडत आहेत!”
” ओके. त्यातले एखादे वलय नजरेने फालो करा. पहा कोठवर जातंय ते वलय.”
“ते वलय केंद्रातून निघतंय, फिकट होत छ्ता पर्यंत जातंय आणि —- पुन्हा—- ग-ड -द —हो–त —-कें–द्रा–क–डे —- डोळे ज —ड.” निनादचा आवाज ग्लानीत असल्या सारखा येत होता.
” निनाद, रिलॅक्स, तुम्हाला खूप झोप येतीयय. झोपा. डोळे मिटून घ्या. खूप खोल गेल्याचा भास होईल. लहानपणीच्या काळात जात रहा.!”
” हो, खूप तळाला जातोय!”
काही क्षण डॉक्टर थांबले.
“निनाद बेटा, माझा आवाज ऐकू येतोय?” एखाद्या लहान मुलाची चौकशी करावी, अश्या सुरात डॉक्टर बोलत होते.
“हो, तल, तू बोल!”
“तुझ्या सारख्या लहान मुलांनी असं रात्रीच्या वेळी घराबाहेर भटकू नये!”
“कोन लहान? मी आता मोठा झालोय! तिसरीत गेलोय! आजी म्हनती, मला आठव लागलंय!”
“अरे,वा! तुला अंधारात फिरताना भीती नाही वाटत?”
“छट!, मी नाय भीत आंदाराला! मी शूर मुलगाय!”
“मग, कशाची भीती वाटते?”
“कशाचीच नाय! ”
” वा!वा! लहान मुलांनी असच असायला हवं. मग, काल तू का ओरडलंस?”
“काल न? मी अन शकी वडाच्या झाडाच्या पारंब्याला धरून झोका-झोका खेलत होतो. अंधार झाला तरी आमी खेलतच होतो. मग एक पकोली गर्र-गर्र फिलत आली. अन माज्या गालावर चापट मालून गेली! मी पण तिला हातानं जोलात झटकल! गालातुन लक्त आलं माज्या! मग मी रडलो!”
“का? खूप दुखलं म्हणून ?”
“नाय!”
“मग?’
“आले, ती पकोली आता माझा बदला घेनार! माझ्या मागे लागनार!”
“असे कोण म्हणत?”
“शकी! ती मनते कि, मी पकोलीला हाताने झटकल ना! मग ती माझा बदला घेनाल! मला चावून चावून मालून टाकणार! माज लक्त पिऊन टाकनाल! मग मला पकोलीची भीती वाटती! खुप्प भीती वाटती!”
“अरे, बाळा असं काही नसत!”
“असच असत! शकी, खोत नाय सांगत! तूच खोतार्डा आहेस! जा तुझी कट्टी!” मग निनाद एकदम गप्प झाला. तो या पुढे काही बोलणार नाही, याची डॉक्टरांना कल्पना आली. त्यांनी तो संमोहनाचा सेशन आटोपता घेतला.
” बाय, तुला पुन्हा फोन करते.” डॉक्टरांची चाहूल लागल्याने स्वरालीने फोन बंद केला. हिप्नॉटिझम रूम मध्ये जाताना निनाद टेन्स दिसत होता आणि डॉक्टर रिलॅक्स होते. आता डॉक्टर टेन्स आणि निनाद फ्रेश दिसत होता.
“Thanks for Co -opretion निनाद!, दोन दिवसांनी आपण पुन्हा भेटू. तोवर मी आत्ताच्या तुमच्या टेस्टचा अभ्यास करून ठेवतो. ”
स्वराली आणि निनाद डॉ. मुकुलच्या क्लीनिक मधून बाहेर पडले, तेव्हा निनाद शीळ वाजवत होता! सर्पराईज! कॉलेजतला निनाद स्वरालीला दिसत होता.
तिने चुकून जरी वर पहिले असते, तर तिला ते दिसले असते! एक वटवाघूळ आपले पंख पूर्ण ताणून निनादच्या डोक्यावर घिरट्या घालत होते!
०००
“स्वराली, मी तुम्हाला मुद्दाम एकटीला बोलावलंय. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आणि निनादच्या मानसिक अवस्थे संबंधी तुमच्याशी चर्च्या करायची आहे.” डॉ. मुकुल निनादचे केस पेपर पाहत म्हणाले.
“बोला डॉक्टर.” स्वराली डॉक्टरांचा गंभीर टोन एकून अस्वस्थ झाली होती.
“प्रत्यक माणसाला कशाची ना कशाची भीती वाटतच असते. त्यात काही वावगं नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत ‘भीती’ हे नैसर्गिक कवच असते. कारण ते धोक्याची सूचना देत असते. पण हीच भीती जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा, तो ‘फोबिया’ होतो. ”
“डॉ. मला तुमच्या शास्त्रातलं काही कळत नाही! मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा!” स्वरालीला डॉक्टरांच्या प्रस्तावनेत काही रस नव्हता.
“निनादला ‘चिरोपट्ट फोबिया ‘ झाला असावा असा माझा अंदाज आहे!”
“म्हणजे?”
“म्हणजे, वटवाघूळांची जीवघेणी भीती!”
“यावर उपाय?”
” उपाय आहेच! तो आपण करूच. त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.”
” किती वेळ लागेल?”
“तसे नक्की नाही सांगता येणार. कारण आमच्या उपायात पेशंटच्या मनाचे सहकार्य खूप महत्वाचे असते. आणि या केस मध्ये ते माझ्या आणि काही औशी निनादच्याही हाती नाही. त्याच्या मानसिक जडणघडणावर ते अवलूंबून असेल!”
“तरी? साधारण चार- पाच महिने?”
“नाही! किमान एक वर्ष! किंवा अधिक हि लागतील!”
” मला तो ‘भीती’मुक्त झालेला हवाय! पण इतका वेळ म्हणजे खर्च पण खूप येईल ना?” स्वरालीला आर्थिक बाजू समजून घ्यावयाची होती, म्हणून तिने विचारले.
” हो, त्या साठी बराच खर्च येतो. पण मी या केसचे पैसे घेणार नाही! माझ्या संशोधनासाठी, मी हि केस हाताळणार आहे. औषधा साठी लागतील तितकेच पैसे. फक्त इतका काळ उपचार करून घेण्यासाठी निनाद तयार झाले पाहिजेत.”
न पैसे खर्च करता उपाय होणार असेल, तर स्वरालीची हरकत नव्हती. प्रश्न होता तो निनादचा. आपल्याला काही झालाय, यावरच त्याचा विश्वास नव्हता. त्याला तयार करावं लागणार होत. आणि स्वराली साठी ते फारसे कठीण नव्हते.
” करीन मी त्याला तयार. तो माझे ऐकतो!” स्वराली आत्मविश्वासाने म्हणाली.
“ओके. निनाद आस्तिक आहेत का नास्तिक?”
” तो देवभोळा आहे.”
‘देवभोळा’ म्हणजे अंधश्रद्धेकडे कल असणारी मानिसिकता. डॉक्टरांच्या मनाने नोंद घेतली.
“मला जरा त्यांच्या आई-बाबा बद्दल सांगा. ”
” त्याला बाबा नाहीत. आई नाशकात असते. ”
“त्यांचा कॉन्टॅकट नंबर तुमच्या कडे असेलच, मला त्यांच्याशी बोलायचंय!”
स्वरालीने नाशिकला, आपल्या सासूला फोन लावला.
“आई, डॉक्टर मुकुल तुमच्याशी बोलू इच्छितात. परवा सिनेमा बघताना निनाद भिले होते ना, त्यावर उपाय योजना करावची आहे. घ्या डॉक्टरांशी बोला.” स्वरालीने मोबाईल डॉक्टरकडे दिला.
“नमस्कार आई, मी डॉ. मुकुल. मला निनादच्या एकदोन गोष्टीन बद्दल माहिती हवी होती.”
“विचारा. ”
“निनाद लहानपणी कशाला भिले होते का? किंवा कशाला भीत असत?”
“नाही! तो लहानपणा पासून धीट आहे.”
“साधारण सात-आठ वर्षाचे असताना काही विशेष घटना घडली होती का?”
“आं –धडपड्या होता. त्यामुळे पडणं-झडणे, गुढगे-कोपरे फुटणे, कपाळाला टेंगळ हे नेहमीचेच! पण कधी रडारड नव्हती. अरे, हो —- एकदा तो घरामागच्या वडाच्या पारंब्याचा झोका झोका खेळताना रडत आला होता! ‘काय झालं?’ म्हणून विचारलं तर म्हणाला, ‘ पाकोळीन मला थोबाडीत मारली!’ त्या रात्री त्याला खूप ताप भरला होता. त्या नंतर तो झोपेत दचकून उठायचा. आताशा ते कमी झाल्याचं स्वराली सांगत होती!”
“धन्यवाद!” डॉ. मुकुल फोन कट करण्याच्या बेतात होते, तेव्हड्यात त्यांना काहीतरी आठवलं.
“हॅल्लो, आई एक मिनिट. निनादला कोणी, ‘शकू’, ‘शकुंतला’ किंवा ‘शकी ‘ नावाची कोणी बालमैत्रीण होती का?”
“नाही! तो एकटाच खेळायचा! एक्कलकोंडा होता आणि अजूनही तसाच आहे!”
“काय? नव्हती?” डॉक्टरानी आश्चर्याने विचारले.
” नाही! स्वराली त्याची पहिली आणि शेवटची मैत्रीण!” आईनी फोन कट केला.
“ओके, स्वराली, आपण येत्या गुरुवार पासून निनादची ट्रीटमेंट सुरु करू. ”
“नको! शनिवार पासून करा. आम्हास सुट्टी असते.”
” ओके! शनिवारी अकराला जमेल?”
“येते. ”
हि ‘शकुंतला’ कोण? निनाद कधी बोलला नाही! स्वराली या विचारात निघून गेली. डॉ. मुकुल गंभीर झाले. निनादची केस त्यांना वाटत होती, त्यापेक्ष खूप कॉम्प्लिकेटेड होती. लहानपणचा तो ‘पाकोळीचा ‘ प्रसंग एक सत्य घटना होती. त्याची पुष्टी आईनी केली होती. पण ‘शकी’ हे एक काल्पनिक अस्तित्व निनादच्या मनाने साकारलं होत! आणि ते अजूनही तसेच असण्याची शक्यता होती! त्यामुळे गुंता वाढत जाणार होता!
०००
स्वरालीचा हा हेकेखोर स्वभाव सोडला तर, तिच्या सारखी स्त्री जगात नाही, हे निनादचे मत होते. सुंदर, समजदार, आणि बुद्धिमान बायको हवी असेल तर, तिचा हेका स्वीकारावा लागतो, हे ज्ञान त्याला गेल्या चार वर्षात झाले होते. आत्ताही तिच्या समाधानासाठी तो, त्या बोकूडदाढी मुकुल कडे गेला होता. आणि ते सायकॉलॉजिचे झेंगट मागे लागले होते. काय झालाय, त म्हणे ‘चिरपटोफोबिया’! पैसे उकळण्याचे धंदे! पण काही असो तो हिप्नॉटिझमचा सेशन मात्र झकास होता. कसली मस्त झोप लागली! ती नेहमीची झोप नव्हती, जागा नव्हतो हे मात्र नक्की! काही तरी पुन्हा गवसल्यासारखं वाटत होत.का कोण जाणे,शकीची आठवण प्रखरतेने होत होती. ती जवळपास घुटमळत असल्याचा भास पण झाला होता! साल, या सायकियाट्रीस लोकांपासून सावध रहायला हवं. आपल्या मनातून काय काय काढून घेतील, आणि काय काय नवीन भरवतील याचा याचा नेम नाही! आपल्या त्या नेहमी पडणाऱ्या स्वप्नच गुपित तर त्यांनी काढून घेतलं नसेल? आणि शकी! तिच्याबद्दल? शकीच ‘सिक्रेट’ तर, आपण स्वरालीला पण सांगितलेलं नाही! निनाद आपल्या विचारात इतका गढून गेला होता कि, स्वरालीने आणून ठेवलेला चहा गार होऊन गेला होता.
” हे काय निनाद? कसल्या विचारात गुरफटला आहेस? चहा गार होऊन गेलाय! थांब मी गरम करून आणते.” स्वरालीने तो चहाचा कप किचन मध्ये नेला.
“निनाद, आज अकराला डॉक्टरकडे जायचंय! लक्षात आहे ना?” गरम चहाचा कप निनादच्या हाती देत स्वरालीने आठवण करून दिली.
“हो ग आहे! पण खरच त्या डॉक्टरच्या म्हणण्यात काही तथ्य आहे का?”
“हो, आहे! आणि तुझी एखादी ‘भीती’ तो फुकटात काढून देणार असेल तर तुझी काय हरकत आहे?”
” अग, तस नाही. पण हा माझ्या मनातून काय काय काढून घेतो कोणास ठाऊक? मला त्याचीच भीती वाटती आहे!”
“तो फक्त तुझ्या मनातली ती ‘वटवाघूळांची भीती’ काढून घेणार आहे! त्या साठी उपचार गरजेचे आहेत!आणि ते तू करून घेणार आहेस! मला यावर अधिक वाद नकोय!” स्वरालीने निक्षून सांगितले आणि ती तरातरा किचनमध्ये निघून गेली. शकी यावेळी जवळ असायला हवी होती! असती तर तो तिला विचारणार होता ‘खरच हे उपचार गरजेचे आहेत का?’
‘मुळीच नाही!’ असे म्हणत शकी गोड हसत दूर पळून जातीयय, असे त्याला वाटले.
खिडकीच्या तावदानावर हलकासा पंखाचा फटका मारून एक वटवाघूळ उडून गेलं!
०००
डॉ. मुकुलनी भडक रंगाच्या वटवाघूळीच्या चित्राचे पुस्तक निनाद आणि स्वराली समोर टाकले.
“हे वटवाघूळीच्या लाईफ सायकलवरचे पुस्तक आहे. निसर्गात अनेक प्राणी असतात त्यातलाच हा एक. हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे आपले भक्ष रात्री शोधतो. त्यात घाबरण्या सारखं काहीच नाही. घोडा, कुत्रा, मांजर असते तसाच हा हि एक प्राणी आहे!” डॉ. मुकुल एकी कडे माहिती सांगत होते, तर दुसरीकडे त्यांचे लक्ष निनाद बसला होता त्याच्या मागच्या भिंतीवरील मॉनिटरवर होते. निनादच्या तर्जनीला लावलेल्या सेन्सरमुळे त्याचे बीपी, प्लस, ईसीजी डॉ. मुकुलना दिसत होते.
डॉक्टरांनी वटवाघुळीनची संपूर्ण लाईफ सायकल समजावून सांगितली. बीपी -प्लसमध्ये धोकादायक फरक पडला नव्हता. डॉक्टरांसाठी तो सकारात्मक संकेत होता.
मग त्यांनी लॅपटॉपवर लाईव्ह वटवाघुळे, त्यांची पिलं, उलट टांगून घेऊन झोपण्याची किंवा विसावा घेण्याची पद्धत, त्यांची भक्ष्य शोधन पध्द्त, निवासस स्थाने. सगळा जीवनक्रम दाखवला. निनादने तो शांतपणे पहिला.
” निनाद, पहा किती सामान्य प्राणी आहे हा! तुम्ही उगाच याला भिता! आता हेच पहा आपण हि वटवाघूळांची चित्रे गेली तासभर पहातोय, तुम्हास काही वाटले का?”
“नाही! तस काही वाटलं नाही. कारण, तुम्ही आणि स्वराली सोबत होताना! म्हणून मला सेफ वाटत होत!”
क्षणभर डॉ. मुकुल विचार मग्न झाले.
” ओके. निनाद, आम्ही बाहेर बसतो. आता पाहिलेली व्हिडीओ क्लिप तुम्ही एकटे पहा! मला खात्री आहे, तुम्ही ती पाहू शकाल. फक्त ती आता तुम्हास समोरच्या लार्ज टीव्हीस्क्रीन वर दिसेल! घाबरू नका, आम्ही खूप जवळ आहोत!”
निनादने धडधडत्या अंतकरणाने ती क्लिप पहिली. त्याचा बीपी आणि प्लस शूट झालं होत. पण ते अपेक्षितच होत. त्याच्या मनाने आणि शरीराने हा प्रयोग चांगलाच पेलला होता. डॉ. मुकुल समाधानी होते.
“ओके निनाद! ब्रेव्ह! हा तुमचा गृहपाठ समजून हि क्लिप तुम्ही घरी जमेल त्या वेळेला, जमेल तितके वेळा पहात जा. पहाण्याच्या वेळेत बदल करत रहा. कधी सकाळी, कधी मध्यरात्री, कधी पहाटे. त्याने तुमची भीती कमी होत जाईल! जेव्हा तुम्हास असे वाटेल कि यात भिण्यासारखे काही नाही, तेव्हा माझ्या कडे या. रोजचे औषध मात्र चुकू देऊ नका!”
ती व्हिडीओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह घेऊन स्वराली आणि निनाद क्लीनिक बाहेर पडले. आपण उगाच त्या वटवाघळींना भीत होतो! बेसलेस! बरे झाले स्वरालीचे ऐकले ते. शी इज आलवेज राईट! मग –शकी म्हणते ते कसे खोटं असेल? ती आपल्याला कधीच खोटं बोलत नाही! खूप दिवस झाले शकी भेटली नाही. भेटली तर या बाबतीत तिच्याशी चर्च्या करता येईल. निनादने आपल्याच विचारात असताना त्याने कारचे ड्राइव्हिंग व्हील जवळचे दार उघडले. स्टियरिंगवर बसलेले काहीतरी पंख, फडफडत उघड्या दारातून बाहेर आकाशात झेपावले! बेसावध निनाद भीतीने दचकला!
“मम्मी, ते बघ त्या समोरच्या कारच्या नंबर प्लेटवर एक बॅट, खाली डोकं वर पाय करून लोंबकळतींयय! आणि तिचे डोळे टेललाईट सारखे डार्क रेड आहेत!” निनादच्या मागल्या कारमधील ती चुणचुणीत मुलगी आपल्या आईला काहीतरी दाखवत होती, पण मम्मा मोबाईल मध्ये गुंतली होती.
०००
हवेत गारवा चांगलाच जाणवत होता.मध्य रात्र उलटून गेली होती. जाड रजईत लपेटून निनाद गाढ झोपला होता. खोलीत गच्च अंधार दाटला होता. पण तो निर्जीव नव्हता. त्यातली वळवळ जाणवत होती. काहीतरी तरी तेथे दाटीवाटीने बसले होते. इतका अंधार असूनही निनादला ते भिंतीवरचे घड्याळ आणि त्यात रात्रीचे दोन वाजून काही मिनिटे झाल्याचे दिसत होते. अंधारातली हि वळवळ, असंख्य लाल भडक डोळ्यांच्या वटवाघुळीची असल्याची, निनादला खात्री होती! पंखांची फडफड राहून राहून त्याच्या कानात धडका मारत होती. खोलीतला सारा आसमंत त्यांनीच व्यापला असावा! कुठल्याही क्षणी हि धाड आपल्यावर हल्ला करणार, आधी रक्त पिऊन टाकणार, म्हणजे रक्ताचा थेंबही कोणास दिसणार नाही! मग मांसासाठी लचके तोडणार, शेवटच्या कणा पर्यंत! सकाळी फक्त पांढरा फेक हाडानचा, कोरडा सांगाडा लोकांच्या हाती लागणार! हि –हि सगळी वटवाघूळ, त्या लहानपणी आपल्या हाताने जखमी झालेल्या वटवाघुळीचे अनुयायी आहेत! ते असाच बदला घेणार!! शकी नेहमी हेच सांगते. निनादच्या मनात अशा विचारांचे काहूर माजले असतानाच, खाड्कन खोलीचे दार उघडले. त्या आवाजाने त्याची विचार शृंखला तुटली. उघड्या दारात एक मानवी आकृती त्याला स्पष्ट दिसत होती. तिच्या हाताच्या जागी पंख होते, फोल्ड केलेले, वटवाघुळी सारखे! आणि ती एका स्त्रीची आकृती होती! तिने निनादकडे पहिले पाऊल टाकले. भीतीने निनादच्या तनामनावर केव्हाच अंमल सुरु केला होता!
निनादच्या घशाला कोरड पडली होती. मदतीसाठी ओरडण्याची त्याची इच्छा होती, पण घशातून आवाज निघत नव्हता! त्या स्त्रीची काळी आकृती, डौलदार पावले टाकत सावकाश त्याच्या दिशेने येत होती!
आणि अचानक लक्ख उजेड पडला!
“निनाद! जागा हो! काय होतंय?” स्वराली त्याला हलवून जागे करत होती.
निनाद जागा झाला. स्वरालीने दिलेले पाणी पिल्यावर त्याला बरे वाटले.
” काय झालं, निनाद?”
” पुन्हा तेच स्वप्न?”
“निनाद, तुझ्या मनातल्या भीतीने हे स्वप्न पडतंय. आपण खरेतर हि बाब डॉक्टरांना सांगायला हवी होती. ”
“पण अशात या स्वप्नाचा त्रास होत नव्हता! त्या हिप्नॉटिझमच्या सेशन पासून पुन्हा सुरु झालाय! आणि हे त्या मुकुलमुळे झालाय! आताशा ते स्वप्न दिवसेन दिवस भयानक होत चालयय! “निनाद स्वरालीवरच चिडला.
“स्टुपिड! डॉ. मुकुल यातला तज्ज्ञ माणूस आहे! त्याच्या मुळे काहीही झालेले नाही!”
“स्वरा, मला या वटवाघुळीची दहशत वाटायला लागली आहे! ती मला नकोय! सांग तुझ्या त्या बोकूड दाढीला!”
“सांगणारच आहे!”
०००
निनाद एकटाच त्या सिसिडेच्या कोपऱ्यातल्या सोफ्यावर कोल्डकॉफ़ीचा ग्लास घेऊन बसला होता. हे स्वप्न असच पडत राहील तर? तीन शक्यता होत्या. एक तर आपल्याला वेड लागेल! दोन भीतीने हार्टअट्याक येईल! किंवा आपणच आत्महत्या करू! निनाद आपल्या विचारात असताना कोणीतरी आल्याचे त्याला जाणवले.
“वाव! सर्पराईज! तू पुन्हा भेटशी असे वाटले नव्हते! आणि अजून एक, कसली सुंदर दिसतीयस या ब्लॅक आऊट फिट मध्ये, शके!?”
“निन्या! नुसताच वयाने वाढलास, अजून तसाच ठोंब्या आहेस! कस त्या पांढऱ्या पालीन तुला पसंत केलं कोणास ठाऊक? तुझ्या सारखी मीही वयाने वाढली आहे! आणि मला माझ्या फिगरचा मला अभिमान आहे!”
“शके, तू आपल्यात स्वरालीला आणू नकोस!”
“निन्या, मलाही ती आपल्या दोघात नकोच आहे!”
“इतके दिवस कोठे होतीस? अन आज कशी अचानक उगवलीस?”
“तुमने पुकारा और हम चले आये!”
“हे मात्र खरय! तुझी आठवण येत होती!”
“का रे?”
” अग, ते लहानपणच वटवाघुळंच स्वप्न! स्वराली म्हणते ते सायकिक आहे! या हि पुढे, ती मला त्या बोकूडदाढी मुकुल कडे उपचारासाठी नेतीयय! काय करू?”
“निन्या, एक गोष्ट लक्षात ठेव! ते वटवाघूळ खरं होत! त्याचा तो बदला घेणारच! हेही खरय! ”
“म्हणजे मी मरणार?”
“नाही! मी तुला मरू देणार नाही! तू मला हवा आहेस!”
“माझ्या स्वप्नात कशी येशील?”
“नाही! मी तुझ्या जागेपणी येत जाईन!”
“अन स्वरालीला कळलं तर?”
“मी नाही कळू देणार!”
“उपचारच काय करू?”
“नको! त्याचा उपयोग होणार नाही!”
“तुला काय माहित?”
“मला ती ‘वटवाघूळ’ कानात सांगून गेलीयय! निन्या, माझ्यासाठी पण कॉफी आण मी वॉश रूम मधून येतेतोवर!”
निनादने अजून एक कॉफी घेताना पाहून तो काऊन्टरवरील पोरगी विचित्र नजरेने पहात होती. अजून कॉफी शिल्लक असताना, हा वेडा दुसरी कॉफी का घेतोय, हे तिला कळत नव्हते. काही का असेना, पैसे देतोय ना, मग झाले तर.
निनाद कॉफी घेऊन आला आणि शकीची वाट पहात होता. आणि मेन एंट्रीतून स्वराली येताना दिसली!
“निनाद तू इथे? होऊ स्वीट? माझ्या साठी कॉफि घेऊन ठेवलीस? पण तुला कसे माहित मी येणार म्हणून?” स्वरालीने जवळ येत विचारले.
” तुझी गाडी पार्किंग लॉट मध्ये जाताना पहिली. आणि कॉफी घेऊन आलो! आता तुला फोन करून सांगणारच होतो, कि तुझ्या साठी कॉफी आणली आहे म्हणून!”
“बरे झाले तू प्रत्यक्षच भेटलास ते, मी तुझ्या स्वप्नाबद्दल डॉ. मुकुलला फोनवर बोलले. त्यांनी आपल्याला भेटी साठी बोलावलंय! आता चार वाजलेत, पाच नंतर केव्हाही या, म्हणालेत. आपण जरा फोरम मॉल मध्ये खरेदी करू आणि मग क्लिनिकला जावूत! चालेल ना?” स्वराली आधीच निर्णय घेऊन टाकते. तेथे जाण्यात काहीच अर्थ नाही. ‘उपयोग होणार नाही!’ म्हणून आत्ताच शकी म्हणाली होती! अरे बापरे, कुठल्याही क्षणी शकी येण्याची शक्यता होती! तशी काळजी नव्हती म्हणा! कारण स्वराली शकीला ओळखत नव्हती, आणि शकी ओळख दाखवणार नव्हती!
कॉफी संपवून निनाद आणि स्वराली निघून गेले. शकी कोठेच दिसत नव्हती. पण शकीची फिगर निनादच्या नजरेसमोरून जात नव्हती! आज पहिल्यांदा त्याला तिच्यातल्या सेक्स आपीलची जणीव झाली होती!
सिसिडेच्या पोर्चच्या कोपऱ्यात छताला एक लाल भडक डोळ्याचे वटवाघूळ लटकत होते!
०००
“निनाद, तुम्हाला ‘शकू’ नावाची कोणी बाल मैत्रीण होती का?” डॉ. मुकुलनी सरळ मुद्यालाच हात घातला. या प्रश्नाने निनाद सटपटला. म्हणजे याला ‘शकी’ समजली तर?
“हो! पण शाळेतली! का?”
“अशात ती तुम्हास भेटते का?”
“नाही! गाव सुटले तशी ती पुन्हा भेटली नाही!” डॉक्टरांचा आय कॉन्टॅक्ट टाळत निनाद म्हणाला. डॉ. मुकुलनी तो खोटं बोलत असल्याचे तात्काळ ओळखले. खरे तर स्वरालीचं शकीबद्दल त्याला विचारणार होती. पण ज्या अर्थी तो हुन सांगत नाही त्या अर्थी ते फारसे महत्वाचे नसावे, असे तिला वाटले.
” तुम्हाला म्हणे एकच स्वप्न वारंवार पडत! असे स्वराली म्हणत होत्या!”
“तस ते फारस विशेष नाही! फार लहानपणा पसन ते कधीतरी पडतंय!” निनाद पुन्हा खोटं सांगत होता! स्वरालीनी दिलेल्या माहितीनुसार ते स्वप्न नेहमीच पडत होत.
“तरी हि तुम्ही ते मला सांगायला हवं होत. असो. स्वप्नात काय दिसत?”
” रात्रीचा दोनचा सुमार असल्याचं दाखवणार भिंतीवरलं घड्याळ दिसत. नंतर असा भास होतो कि घराच्या अंधारात हजारो वटवाघूळ दाटी करताहेत. ती माझ्यावर लवकरच तुटून पडणार आहेत असं वाटत. ती माझा बदला घेणार आहेत! अंधारात खाड्कन, एक दार उघडत! दाराच्या चौकटीत कोणीतरी उभं असत! मला खूप भीती वाटू लागते. मी जागा होतो!”
“पहिलं स्वप्न कधी पडलं?”
“लहानपणी.”
“शेवटचं असं स्वप्न केव्हा पडलं होत?”
“काल!”
” ओके. पहिल्या आणि कालच्या स्वप्नात काही फरक होता का?”
” सुरवातीला फक्त भिंतीवरील घड्याळ दिसायचं, आणि भीती वाटायची! मग घड्याळाबरोबर अंधारात वटवाघुळे असल्याचा भास होऊ लागला! त्यानंतर ते स्वप्न अधिक स्पष्ट आणि भीतीदायक वाटू लागलं! वटवाघुळासोबत अंधारात एक दार उघडू लागलं! आणि त्या दारात, हाताच्या जागी वटवाघुळासारखी फोल्ड केलेली पंख असलेली मानवी आकृती दिसू लागली! काल तर कहरच झाला, ती आकृती एक मोकळे केस सोडलेली तरुणी असल्याचे स्पष्ट दिसले! आणि ती माझ्याकडेच येत होती!”
” ओके निनाद. हे वरचेवर स्पष्ट होत जाणारे स्वप्न म्हणजे, तुमचे अंतर्मन तुम्हास भीतीवर मात करत असल्याचे संकेत देत आहे! ती आंधारातली तरुणी कोण होती?”
” तिचाचेहरा स्पष्ट दिसत नव्हता! ”
” दिसेल! कदाचित ती तुमच्या परिचयातली पण असेल! आणि ती दिसली कि तुमची भीती कुठल्या कुठे पाळूनही जाईल! अर्थात हा माझा अंदाज आहे. प्रत्यक्षात काय घडत ते पाहू! तेव्हा लक्षात ठेवा, प्रोग्रेसिव्हली स्पष्ट होणारे स्वप्न धीराने फेस करा! प्रत्यक्षात सोडाच, स्वप्नातही काही होणार नाही!”
” मलाही हेच हवंय! मला ती वटवाघूळांच्या दहशती पासून सुटका हवी आहे!” निनाद प्रथमच डॉक्टरांशी मनःपूर्वक बोलला.
“आपण हेच करणार आहोत!” डॉ. मुकुल शांत आवाजात म्हणाले.
०००
‘पाकोळी पाडा ‘ समुद्रालगदच्या डोंगर कपारीत वसलेले, चार-पाचशे उंबऱ्याचे खेडे. डॉ. मुकुलच्या उपचाराने म्हणा, स्वरालीच्या सपोर्टने म्हणा, कि निनादच्या गृहपाठाने म्हणा निनादची भीती कमी होत होती. रात्री स्वप्न पडल्याचे तो सकाळी, स्वरालीला सांगू लागला. तरी डॉ. मुकुलनी शेवटची परीक्षा म्हणून निनाद आणि स्वरालीला दोन महिन्यासाठी या पाड्यावर रहाण्यासाठी पाठवले होते. या गावालगतच्या डोंगर कपारीत असंख्य वटवाघुळीची निवासस स्थाने होती!
डॉ. मुकुलच्या उपचाराची दिशा योग्य असल्याची निनादला खात्री पटूलागली होती. दोन किलोमीटरवर असलेल्या समुद्रकिनारी, तो स्वरालीला घेऊन रोज सकाळ, संध्याकाळ फिरायला जाऊ लागला. संध्याकाळच्या संधीप्रकाशात वटवाघुळांचे थवे आकाशात झेपावताना तो आनंदाने पहात होता. भीतीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नसे. स्वराली खुश होती.
असेच एक दिवस संध्याकाळी निनाद आणि स्वराली समुद्रकिनाऱ्यावरून घरी परतत असताना स्वरालीचा फोन वाजला. थोडे थांबून तिने तिने तो घेतला. डॉ. मुकुलचा फोनवर होते. निनाद आकाशातले वटवाघुळीचे थवे पहात पुढे चालत होता.
“बोला डॉक्टर.”
” स्वराली, निनाद कसे आहेत? एनी प्रॉब्लेम ?”
” नो प्रॉब्लेम! निनाद मजेत आहे. परवा तर ‘कायमच येथेच राहू म्हणत होता!’ ”
“अरे,वा! खूप छान प्रतिसाद मिळतोय कि आपल्या ट्रीटमेंटला. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार निनाद एकोणतीस – तीस दिवसांनी ते झोपेत भितात. आणि ती वारंवारता आज उद्याच्या येतियय! सजग राहावे लागेल तुम्हाला. हेच सांगण्यासाठी फोन केला होता.”
” बरे झाले, आठवण करून दिलीत ते! थँक्स!”
” काळजी घ्या! बाय!” डॉक्टरांनी फोन कट केला. स्वरालीने मोबाईल पर्स मध्ये टाकला. तिचे समोर चालणाऱ्या निनादच्या पाठमोऱ्या आकृतीकडे लक्ष्य गेले. त्याच्या डोक्यावर उंच आकाशात, घरट्या मारणाऱ्या त्या वटवाघुळाने, तीरासारखी निनादच्या टाळूच्या दिशेने झेप घेतली होती!
“नीनाSSS द!” स्वराली ओरडली! त्या आवाजासरशी ते वटवाघूळ हवेतूनच परत फिरले!
०००
स्वराली आपल्या विचारात गढून गेली होती. विज्ञाननिष्ठ स्वरालीच्या मनाची चलबिचल होती. हे प्रकरण ‘सायकॉलॉजि ‘च्या कक्षेबाहेर जात असल्याचे तिला जाणवू लागले होते. स्वप्ना पुरत्या वटवाघुळी ठीक होत्या, पण प्रत्यक्षात सुद्धा निनादच्या आसपास आताशा त्या दिसत होत्या. त्यादिवशी सिसिडेच्या पोर्चत, मुंबईला खिडकीच्या काचेवर, एकदा कारच्या टपावर, ते तिला दिसलेच होते! आज तर निनादच्या डोक्याच्या रोखाने झेपावले होते! वटवाघुळीच्या बऱ्याच वंदता, येथे आल्यावर तिच्या कानावर आल्या होत्या. त्या नुसार रक्तपिपासू पिशाच्य वटवाघुळीच्या रूपाने, आमोशाच्या रात्री फिरत असतात. आणि संधी साधून त्यांनी निवडलेल्या प्राण्याचे, आधी रक्त पितात, आणि मग सगळे मास खाऊन टाकतात! शिल्लक फक्त हाडाचा सांगाडा उरतो! शेजारच्या डिकॉस्टा अंकलच्या शेळ्यांचे, एका सकाळी सांगाडे झाल्याचे निदर्शनास आले होते! तिने समोरच्या भिंतीवरील कालनिर्णय कॅलेंडरवर नजर टाकली. उद्याच्या तारखेस, त्यावर आमावस्या दिसत होती! आज रात्री ती दोन वाजून दहा मिनिटांनी लागणार होती! तिने भराभर आपल्या बॅगेतले कपडे बाहेर काढून टाकले, आणि तळाशी असलेली एक डायरी बाहेर काढली, त्यात तिने निनाद झोपेत भिल्याच्या तारखा होत्या. त्याच तिने डॉक्टरांना दिल्या होत्या. तिने त्या कॅलेंडरवर ताडून पहिल्या, सर्व तारखांच्या आसपास अमोश्या होती!
तिने लगेच डॉ. मुकुलला फोन लावला. त्यांच्याशी ‘पिशाच्य’ थेयरीवर चर्चा केली. त्यांच्या मताप्रमाणे,हे सगळं थोतांड आहे. पिशाच्य -वटवाघूळ काही सम्बन्ध नाही. भूत असत नाही. इतके विज्ञान कोकलून सांगतंय तरी का आपण विश्वास ठेवायचा? मग ती वटवाघूळ निनादच्या आसपास दिसली ते? तो एक योगायोग होता. तिने मनातून ती ‘पिशाच्य’ कल्पना काढून टाकली.
०००
मध्य रात्र उलटून गेली असावी. सर्वत्र निरव शांतता नांदत होती. मधेच एखाद कुत्रा वर तोंडकरून रडत होत. निनाद आणि स्वराली झोपले होते, त्या बेडरूमच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने एक वटवाघूळ उलटे लटकलेले होते. जळत्या सिगारेटच्या टोकासारखे त्याचे लालभडक रसरशीत डोळे खिडकीच्या काचेच्या तावदानातून आत पहात होते. काही क्षणांनी ते पेटते डोळे मिटले गेले!
स्वरालीला जाग आली. शेजारी निरागस चेहऱ्याचा निनाद गाढ झोपला होता. तो असाच सकाळपर्यंत न भिता झोपून रहावा असे तिला वाटून गेले. ती उठून बाथरूमकडे गेली.
घट्ट अंधार असूनही निनादला भिंतीवरील घड्याळात दोन वाजून दहा मिनिटे झाल्याचे दिसत होते. झोपताना स्वरालीने नाईट लॅम्प लावला होता. मग हा अंधार कसा? बरोबर! काल रात्रीच्या पावसाने बहुदा लाईट गेले असतील. तो उठून बसला. डोळे मोठे करून, त्या अंधारात त्याने अदमास घेतला. त्याला पाण्याचा तांब्या कोठे आहे कळेना. अंधाराने दिशाच कळत नव्हती. कानाला काहीतरी वळवळ जाणवत होती. त्या शिवाय अजून एक आवाज येत होता. त्याने तो ओळखला, ती पंखांची मंद फडफड होती! पुन्हा ती ‘फैज’ घरात घुसली होती! मनात भीतीने डोके वर काढण्यास सुरवात केली. तेव्हड्यात खाड्कन दार उघडल्याचा आवाज झाला. तो त्या आवाजाने दचकला! आठवणीने बंद केलेले दार कसे उघडले? समोरच्या बाजूस चौकटी पुरता उजेड दिसत होता. त्या अंधुक उजेडाने सुद्धा त्याला धीर वाटला.त्या चौकटीत कोणीतरी उभे होते, हाताची घडी घालून. बघता बघता त्या उजेडात, एक केस मोकळे सोडलेली तरुणी आवतरली. डौलदार पावले टाकत ती निनादकडे सरकत होती. आता निनादच्या भीतीची जागा कुतूहलाने घेतली होती. तो टक लावून तिच्या लयीत हेलकावणाऱ्या नितंबाकडे पहात होता. ती जशी जशी जवळ जेवू लागली, तशे तशे त्याचे हृदय ज्यास्त जोराने धडधडू लागले. कारण तिच्या कमनीय देहावर, टिचभरही वस्त्र नसल्याचे स्पष्ट दिसत होते! कुठल्याही वयाच्या पुरुषास हवे हवेसे वाटावी अशी तिची फिगर होती. निनादच्या वासनेला उधाण आले होते. त्याचा समोर उभी होती, नखशिखान्त नग्न! मदनिका! क्षणभर त्याला तिचा चेहरा दिसला. त्याने तिला ओळखले! डॉ. मुकुल म्हणाला होता, ती स्त्री तुमच्या परिचयातली असेल म्हणून!
“शके? तू?”
“निन्या, अरे केव्हाची मी या क्षणाची वाट पाहतियय! पण तुझी ती पांढरी पाल, स्वराली, तुला एकटं सोडतच नाही!” निनादच्या बाहुपाशात ती शिरत म्हणाली.
निनाद धुंद झाला. तो तिचा कोमट देह, मुक्त केसांचा मादक गंध! त्याने तिला घट्ट छातीशी आवळून धरली! डोळे मिटून तो, ते सुख अनुभवत होता. त्याला जगाचा विसर पडला होता.
“निन्या, मला अजून घट्ट धरून ठेव! इतकं घट्ट कि, कोणीच आपल्याला वेगळं करू शकू नये!”
” शके, मला माहित नव्हतं तू इतकी सेक्सी असशील ते!” तिला अधिक जवळ घेत म्हणाला. तो तिच्या ओठावर आपले टेकवण्यासाठी झुकला. पण —- तिने त्याचा चेहरा हाताने बाजूला सारला आणि समोर आलेल्या त्याच्या मानेवर आपले ओठ टेकवले! दोन सुळे त्याच्या मानेतील रक्त वाहिनेत कधी घुसले हे त्यालाही कळले नाही! त्याला तिच्या पुष्ट अवयवाचा स्पर्श सुखावत होता, तोच स्पर्श त्याची हृदय गती वाढवून, सुळ्याना रक्त पुरवठ्याचे सातत्य कायम ठेवत होता! पण त्याच्या कानाला पाणी पिताना घश्याचा जसा आवाज होतो तसा ऐकू येऊ लागला! हा आवाज कसला? कोण अधाश्या सारखं, काय पितंय? त्याने डोळे उघडले. मानेत काहीतरी टोचत होत. त्याने शकीचे डोके बाजूला करण्याचा प्रयत्न केला. ती सोडेना! त्याने अधिक जोर लावून तिला बाजूला केले. तिचे तोंड आणि तोंडातून डोकावणारे सुळे रक्ताने माखले होते! ती शकी नव्हती, तिचे डोके वटवाघुळी सारखे होते! तो भीतीने गारठला! घामानं तो निथळत होता!
खाड्कन त्याने डोळे उघडले! घरभर लाईट लॅम्पचा उजेड पसरला होता! रात्री झोपताना स्वरालीने लावलेला तो दिवा, तसाच जळत होता! म्हणजे आत्ताचे प्रत्यंकारी असले तरी, ते एक स्वप्नच होते तर! आजवरचे सर्वात स्पष्ट स्वप्न! त्याने घाम पुसला. स्टूलवर ठेवलेल्या भांड्यातले पाणी पिल्यावर त्याला बरे वाटले. शेजारी नजर टाकली, स्वराली तेथे नव्हती. पण बाथरूम मध्ये लाईट दिसत होता. ती तेथे गेली असावी, असा त्याने अंदाज केला. सहज त्याची नजर समोरच्या घड्याळावर गेली. आणि तो वेड्या सारखा त्याच्याकडे पहातच राहिला! एक टक! त्या घड्याळात दोन वाजून आठ मिनिटे झाली होती. स्वप्नातली घटना बरोबर दोन वाजून दहा मिनिटांनी घडली होती!
दोन वाजून नऊ मिनिटे! सेकंड काटा टक – टक करत पुढे झेपावत होता. अठ्ठावन सेकंड, एकोणसाठ, साठ! त्या क्षणी फटकन लाईट्स गेले! घरभर अंधार दाटला! तीच पंखांची मंद फडफड! आठवणीने बंद केलेले बेडरूमचे दार खाड्कन उघडले! दारात कोणीतरी उभे होते! ती मोकळ्या केसांची,नग्न शकी निनादकडे सरकू लागली!
“निन्या, असा काय वेड्या सारखा माझ्याकडे पाहतोयस? अरे, केव्हाची मी या क्षणाची वाट पाहतियय!”
स्वप्नाची पुनरावृती होत होती! पण आता निनाद जागाच होता. तो तिला जवळ घेण्यास कचरत होता. तरी ती बळेच त्याला बिलगली! त्याला आता मात्र खात्री पटली, पुन्हा तेच होणार! स्वप्न खरे होणार! त्याच्या हृदयाचे ठोके गतिमान झाले! तो तिला आपले सर्व बळ एकवटून दूर लोटू पहात होता, आणि ती त्याच्या मानेपर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करत होती! त्या अमानवी शक्ती पुढे निनादची शक्ती कमी पडत होती! त्याची शुद्ध हरवू लागली.
“अवसान घातकी! हृदय जोरात धडकततोवर मानेतल्या रक्तवाहिन्यातलं रक्त पिता येत! शुद्ध, मेंदूसाठी जाणार रक्त! हा मोक्याच्या क्षणी शुद्ध हरवून बसलाय! पण हा विरोध कसा करतोय? याला पुढे काय होणार आहे, हे कळलेले दिसतंय! हा असाच विरोध करणार! ह्या माकडाला याच्या लहानपणा पासून माझ्या आधीन होण्यासाठी तयार करत होते! माझी इतक्या काळाची मेहनत वाया गेली! कोण याला सावध केलं असेल? मी त्या व्यक्तीला सोडणार नाही! आणि मला ती कोण आहे माहित आहे!” स्वतःशी पुटपुटत शकी धुरसर होत खिडकीच्या फटीतून झिरपून गेली!
खिडकीच्या तावदानावर उलट्या लटकलेल्या वटवाघुळाचे डोळे पुन्हा अंगारा सारखे पेटले आणि ते एक हलकासा फटका खिडकीवर मारून अंधारात नाहीसे झाले! तेव्हा स्वराली ‘निनाद! निनाद!!’ म्हणून त्याच्या तोंडावर पाणी शिंपून त्याला शुद्धीवर आणू पहात होती.
०००
या घटनेला चार महिने उलटून गेले होते. निनादला ते स्वप्न पुन्हा पडले नव्हते. एक फोबिया समूळ बरा केला म्हणून डॉ. मुकुलनी एक छोटीशी सेलिब्रेशन पार्टी अरेंज केली होती. त्या निमित्याने निनाद आणि स्वरालीला हि बोलावले होते. काही तज्ञ डॉक्टर्सपण हजर होते.
“मानवी अंतर्मन एक गूढ आहे. हे निनादच्या केस वरून पुन्हा सिद्ध होतय!” डॉ. मुकुल म्हणाले.
“मग ते स्वप्न?”
” तेच तर सांगतोय! त्या अंतमनाने दाखवलेल्या स्वप्नामुळे निनादाना पुढील धोक्याचा अंदाज आला!”
“म्हणजे डॉक्टर, तुम्ही ‘पिशाच्य’च्या अस्तित्वाला मानता तर!”
“नाही! ते अजून विज्ञानाच्या कक्षेत आलेले नाही! मला वाटते, निनादाचा ‘भूत, पिशाच्य’ या कल्पनांवर विश्वास आहे, म्हणून त्यांच्या मनाने तसा संकेत दिला!”
डॉ. मुकुलचे सर्वानी अभिनंदन केले. निनादला शुभेछया दिल्या. पार्टी संपली.
निनादने कार स्टार्ट केली.
” आई गंSSS !” स्वराली कारमध्ये शिरणार तेव्हड्यात ती ओरडली.
“काय झालं?” निनादने विचारले.
“अरे, डोक्याला टाळूजवळ काहीतरी लागलं!”
निनादने तिच्या डोक्याकडे पहिले. एक वटवाघूळ वर वर उडून जात होते!
— सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.
Leave a Reply