बाबा पोलीस खात्यामध्ये थेट फौजदार म्हणून भर्ती झाले होते त्यामुळे त्यांची खाकी वर्दी आणि खांद्यावर असणारे दोन चांदीचे स्टार बघत बघत मोठे होत होतो. सहावित असतानाच बाबांचं प्रमोशन झाल्याने आणखीन एक तिसरा स्टार वाढला. पी एस आय चे इन्स्पेक्टर झाले आणि रिटायर होता होता ए सी पी झाले. त्यांच्या खाकी वर्दीला असणारा रुबाब आणि त्याहीपेक्षा असणारा दरारा इतर कुठल्याही युनिफॉर्मला अजूनपर्यंत तरी बघायला मिळाला नाही. बाबांसारखे खांद्यावर तीन तीन चंदेरी स्टार नाही मिळाले पण बाबां सारखा खाकी युनिफॉर्म आणि खांद्यावर तीन सोनेरी पट्ट्या मात्र मिळाल्या.
शालेय जीवनात असताना तू मोठा होऊन कोण बनणार किंवा दहावी बारावी नंतर पुढे काय असे प्रश्न कोणी फारसे विचारले नाहीत. विचारले असतील तरी त्याच्यावर विचार करावा किंवा महत्व द्यावं असं कोणाला वाटलं नव्हतं. फक्त बाबांची मी डॉक्टर व्हावं अशी इच्छा होती पण ती सुध्दा त्यांनी स्पष्टपणे कधी बोलून दाखवली नव्हती. पण लहानपणापासून इंजिन, मशिनरी, गाड्या, पक्कड आणि पाने यामध्ये इंटरेस्ट होता. मोटारसायकल बंद पडली की मेकॅनिक कडे नेण्यापूर्वी स्वतःच चालू करण्याचा प्रयत्न करायची सवय. ग्रीस किंवा ऑईल मध्ये हात काळे केल्याशिवाय खरं समाधानच मिळत नसायचं. मुंबईच्या के जे सोमैया या नामवंत कॉलेज मधून रडत रखडत डिग्री मिळाल्यावर सुपरमॅक्स कंपनीत प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये ब्लेड बनवायच्या मशीनवर आठ तासांच्या एका शिफ्ट मध्ये दोन लाखांपेक्षा जास्त ब्लेड बनवायला लागलो. कंपनीचे जुने कामगार येवून बडबडत की तुम्ही इंजिनियर नवीन नवीन येता आणि दोन महिन्यातच दोन दोन लाख ब्लेड बनवता. तुमच्यामुळे मॅनेजमेंट आम्हाला सुध्दा प्रोडक्शन वाढवायला सांगते. ब्लेड बनवता बनवता आपल्या अंगावर पांढरा शुभ्र युनिफॉर्म येईल असं स्वप्नात सुध्दा वाटलं नव्हतं. पण ब्लेड कंपनीत सहा महिने काम झाल्यावर बी. ई. मेकॅनिकल इंजिनियर्स ना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या अखत्यारीतील कंपनीत जागा आहेत अशी जाहिरात पेपर वाचता वाचता दिसली. जहाजावर काम करण्याची संधी ब्राईट फ्युचर, ग्रेट करिअर आणि आकर्षक पगार असं बरचसं त्या जाहिरातीत होत. माझा बॅचमेट सुयश कोळी याने सुध्दा योगायोगाने ती जाहिरात पाहिली होती मग दोघांनी ठरवल आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीच्या प्रवेश परीक्षेला बसलो.
पण नेहमी प्रमाणे परीक्षेत येणारे अपयश पदरी आले. सुयश पास झाला पण आता माझे काय असा प्रश्न मला पडला. पण सुयश ने माहिती काढली की जहाजावर नोकरी देण्यासाठी इतर कंपन्या आणि आवश्यक असलेले प्री सी ट्रेनिंग देणारे भरपूर कॉलेज आहेत. मुंबईतील रे रोड येथील मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या कॉलेज मध्ये माहिती काढली एडमिशन साठी बऱ्याच कंपन्यांचे उंबरठे झिजवले त्यात सुद्धा अपयश आले पण शेवटी बाबांच्या बॅचमेट ने एडमिशन साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी एका खाजगी शिपिंग कंपनीला भाग पाडले. सुयश ने सुध्दा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सिलेक्ट होऊनसुद्धा दुसऱ्या प्राइवेट कंपनीकडून एडमिशन घेतली. शेवटी एक वर्षाच्या प्री सी ट्रेनिंग साठी सुयश आणि मी रे रोडच्या कॉलेज ला जॉईन झालो. वर्क शॉप ट्रेनिंग साठी मुंबईच्या इंडियन नेवल डॉकयार्ड मध्ये माझ्यासह सुयश आणि नव्याने ओळख झालेल्या ठाण्याचा अमित विव्हळकर ,पुण्याचा अनिरुद्ध आणि कल्याणचा प्रणव गुप्ते तसेच के जे सोमैयचा आणखीन एक बॅच मेट सोनल बनसोडकर अशा सगळ्यांना एकच बॅच मिळाली. एक वर्षाच्या ट्रेनिंग कोर्सला महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या जवळपास प्रत्येक राज्यातून मोठ्या शहरातून तसेच खेडेगावातून मुलं एडमिशन घेऊन दखल झाली होती. त्यामध्ये कोणी जागा जमिनी विकून कोणी लोन काढून कोर्स ची फी भरली होती. आर्मीच्या ब्रिगेडियर च्या मुलासह उद्योगपती, सामान्य नोकरदार आणि शेतकऱ्यांची मुलं सुध्दा आमच्या बॅच मध्ये दाखल झाली होती जवळपास ११० जणांची बॅच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. हॉस्टेल मध्ये कोणाला ट्रिपल शेअरिंग तर कोणाला सिंगल रूम मिळाल्या. रे रोडच्या समुद्र किनाऱ्याला लागून असणाऱ्या निसर्गरम्य कॉलेज मध्ये आपण मुंबईत राहतोय असं वाटतंच नव्हतं. प्री सी ट्रेनिंग म्हणजे जहाजावरील जीवनाचं आणि कामाची माहिती होण्यासाठीचा कोर्स. भाऊच्या धक्क्यावरून रेवस मार्गे मांडव्याला जाताना मोठ मोठी जहाज लहानपणापासून बघायला मिळायची पण एक दिवस त्या जहाजांवर काम करायला मिळेल हे सुध्दा कधी स्वप्नात वाटलं नव्हत. मात्र एक नक्की होत, प्रचंड मोठी आणि एखाद्या टेकडी सारखी भासणाऱ्या जहाजांबद्दल आणि त्याच्यावर काम करणाऱ्या खलाशांबद्दल नेहमी कुतूहल वाटायचं. जहाजं एका देशातून दुसऱ्या देशात जातात संपूर्ण जग फिरतात एवढंच जुजबी ज्ञान असताना शिपिंग कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळाली होती. पण जहाजावर प्रत्यक्ष काम करण्यापूर्वीचा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी एक वर्ष हॉस्टेल वर काढणे जरुरी होते. मरीन इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्सटिट्यूट (MERI) म्हणजेच मेरी मध्ये सोमैया कॉलेजचे आणि संपूर्ण भारतातल्या विविध प्रांतातील जाती धर्मातील तसेच आर्थिक स्तरातील नवीन मित्रांसह डेरे दाखल झालो होतो. तस पाहिलं तर नॉर्थ वाले, साऊथ वाले आणि महाराष्ट्रीयन असे ग्रुप आठ दिवसातच पडले होते. पण या ग्रुपमध्ये असणारे सगळे जण हॉस्टेलच्या वेगवेगळ्या इमारती किंवा मजल्यांवर इतरांसोबत विभागले होते. जहाजावर कोणासोबत ही काम करण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठीचा पाया ट्रेनिंग च्याच सुरवातीला उभारला जात होता. भल्या मोठ्या मेस रूम मध्ये सुमारे १५० मुलं एका वेळेस जेवतील अशी व्यवस्था होती. मुंबईत असूनसुद्धा घरात न राहता हॉस्टेल वर राहण्याची पहिलीच वेळ आली होती. घरी आईजवळ खाण्यापिण्याची जी मिजास चालायची ती आता बंद होणार होती निदान सात दिवस तरी कारण प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत कॅम्पस बाहेर जायची सगळ्यांना परवानगी होती. बाबा रिटायर होईपर्यंत म्हणजेच जून पर्यंत दादरला असणाऱ्या सरकारी घरात आणि त्यानंतर कल्याण जवळच्या आमच्या कोन गावात रविवारी जाऊन पुन्हा परत येणं सहज शक्य होत. मुंबई बाहेरील मुलांना घरी जाण्याची सोय नव्हती पण मुंबईतील बहुतेक सर्व जण दर रविवारी घरी जाऊन येत. प्रणव, सोनल आणि मी शनिवारी रात्री रोल कॉल झाल्यावर, वॉर्डन निघून गेल्यानंतर रात्रीच पळून जायचो. सकाळी सहा वाजता पहिला रोल कॉल मग तासभर एक्सरसाइज केल्यावर एक तासात आंघोळ ब्रेकफास्ट करून पुन्हा आठ वाजता रोल कॉल मग आठवड्यातले तीन दिवस नेव्हल डॉकयार्ड आणि तीन दिवस कॉलेज मध्येच थियरी लेक्चर अटेंड करावे लागत, पुन्हा मग संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री नऊ वाजता रोल कॉल.
रोल कॉल हा आमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा आणि गमतीदार विषय होता. सगळे ११० जण परेडसाठी जसे लाईन मध्ये उभे असतात तसे उभे राहून एकामागोमाग एक स्वतःचा नंबर पुकारत असतं त्यावेळेस वॉर्डन सगळे हजर आहेत की नाहीत याची स्वतः खात्री करून घेत असे. हळू हळू वॉर्डन ला शेंडी लावायला बहुतेक जण शिकले. वॉर्डनच्या पण लक्षात हा प्रकार यायचा पण ते पण समजलं नाही असं करून थोडफार दुर्लक्ष करायचे. मेरी मध्ये सकाळचा नाश्ता आणि दोन्ही वेळेचं जेवण तसच दुपारी चहासोबत स्नॅक्स म्हणून अत्यंत दर्जेदार पदार्थ मिळायचे. भरपूर दूध आणि फळं असल्याने आणि चविष्ट तसेच ताजे व गरम गरम जेवण आणि इतर पदार्थ असल्याने सगळेचजण पोट भरून खायचे. हॉस्टेल ला मिळणारे जेवण किंवा त्यांचा दर्जा जो इतरांकडून ऐकायचो त्या बाबतीत मेरी मध्ये नाव ठेवण्यासारखी परिस्थिती तर नव्हतीच उलट अजूनही दहा वर्षानंतर मेरीच्या मेस मधील जेवणाची आठवण येते. मेस मध्ये सगळे एकत्र जेवायला जमल्यावर होणारी थट्टामस्करी यामुळे तर प्रत्येक जण जेवणाचा मनसोक्त आनंद घेत असे त्यामुळेही कदाचित सर्व पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट लागत असावेत. मेरी मध्ये आठवड्यातून एक ते दोन दिवस परेड व्हायची आमच्यापैकी काही जण बँड मध्ये होते मग बँडच्या तालावर होणारी परेड ची प्रॅक्टिस करताना सगळ्यांना आवडायचं. बहुतेक सर्वांकडे मोबाईल फोन तर होतेच पण दहा वर्षांपूर्वी फोन हल्ली जेव्हढे स्मार्ट आहेत तेव्हढे नसल्याने तसेच ३ जी किंवा ४ जी नसल्याने आम्ही सगळे जण संध्याकाळी मैदानी खेळ खेळायला जायचो. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या मालकीच्या विशाल मैदानावर रोज कमीत कमी दीड दोन तास फुटबॉल आणि क्रिकेट खेळून माझ्यासह काही जण जिम मध्ये सुध्दा वेळ घालवायचे. त्यामुळे संपूर्ण दिवस बिझी असायचो. सकाळी सहाच्या आत उठल्याने आणि मैदानी खेळ खेळल्याने थकले भागलेले सगळेजण रात्री लवकरच झोपायचे. जे खेळायला येत नसत ते फोनला चिकटलेले असायचे. पूर्वी जर आता सारखे स्मार्ट फोन असते तर मैदानी खेळ खेळणारे किंवा एकमेकांसोबत बोलून मन मोकळे करणारे मित्र कदाचित लाभले नसते. मेरीमधील एक वर्षाच्या ट्रेनिंग मधील सगळ्यांसोबत एकत्र राहून एकमेकांना सांभाळून घेण्याची सवय जहाजावर खूप उपयोगी पडली. मेरी मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या विविध आर्थिक स्तरातील व जाती धर्मातील मुलांसोबत एकत्र राहिल्याने, खाल्ल्याने व खेळल्याने जहाजावर काम करताना सुध्दा सगळ्यांसोबत जुळवून घेऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची सवय लागली.
भारतीय नौदलातील आय एन एस विक्रांत, विराट, मुंबई , बेतवा, आदित्य यासारख्या युद्धनौका आणि पाणबुड्या आतून व बाहेरून व्यवस्थितपणे बघता आल्या. भारतीय नौसेना आणि नौसैनिक ज्याप्रकारे जुन्या झालेल्या युद्ध नौका अजूनही देखभाल करून चालवतात हे पाहून आश्चर्य वाटायचं. सुरवातीला कंपनीच्या नवीन जहाजांवर काम करायला मिळाल्याने ऑटोमेशन आणि कॉम्प्युटराईज्ड उपकरणांमुळे इंजिन कंट्रोल रूम मध्ये बसल्या बसल्या इंजिन आणि इतर मशिनरी बद्दल माहिती मिळायची. पण जेव्हा ३५ वर्षापेक्षा जास्त जुन्या जहाजावर काम करावं लागलं तेव्हा मात्र काम करताना रोज एक एक नवीन अनुभव गाठीशी पडू लागला. थेयरोटिकल नॉलेज आणि प्रॅक्टीकल नॉलेज या दोघांचा वापर केल्याशिवाय काम पूर्णच होत नसल्याचा अनुभव येऊ लागला. पण मेरी मध्ये एक वर्ष प्री सी ट्रेनिंग मध्ये मित्रांसोबत घालवलेल्या ट्रेनिंग पेक्षा जहाजावरील काम आणि शिस्त अत्यंत कडक असल्याची जाणीव जहाजावर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर काम करण्याकरिता पहिल्यांदा पाऊल ठेवल्या ठेवल्या जाणवली. मरीन इंजिनीअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच आमच्या मेरी मधील सर्व सर्व ११० मित्र जे वेगवेगळ्या जाती धर्मातले आणि आर्थिक परिस्थितीतिल असूनसुद्धा वर्षभर ज्या खेळीमेळीने ट्रेनिंग साठी एकत्र राहिलो आणि जहाजावरील जीवनासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊन मेरीमधून पास आऊट झालो. दहा वर्षांच्या काळात पांढरा आणि खाकी दोन्ही युनिफॉर्म घालावे लागले. एकदा टर्किश कंपनीच्या मालकीच्या जहाजावर काम केल्यामुळे खाकी युनिफॉर्म घालावा लागला. मेरी पासून पांढऱ्या शुभ्र युनिफॉर्मसह जशी खांद्यावर एक एक सोनेरी पट्टी वाढत गेली तशीच त्याच खांद्यांवर जवाबदारी सुध्दा वाढत गेली.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply