सर्व पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे अणू. सर्व सजीवांचा मूलभूत घटक म्हणजे पेशी. तसाच सर्व शर्करामय पदार्थांचा मूलभूत घटक म्हणजे मोनोसॅकराईड. हे दोन प्रकारचे असतात. पहिला ग्लुकोज. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन झाल्यावर आपल्या रक्तात हाच उतरत असतो आणि रक्तातून शरीराच्या निरनिराळ्या अवयवांकडे पोचता होतो. याव्यतिरिक्त दुसराही एक मोनोसॅकराईड आहे. हा आहे फ्रुक्टोज. दोन्हीमध्ये कार्बन आणि पाणी यांच्या रेणूंची संख्या सारखीच असली तरी त्यांची रचना वेगवेगळी असते.
समजा आपल्याकडे सहा फुलं आहेत. तीन शेवंतीची आणि तीन गुलाबाची. तर ही सहा फुलं गुंफून आपण हार बनवले तर सगळे हार काही सारखेच होणार नाहीत. पहिल्या हारात ओळीनं पहिली तीन फुलं गुलाबाची आणि नंतरची तीन शेवंतीची असतील. दुसर्यात एकाआड एक शेवंतीची आणि गुलाबाची असतील. तिसर्यात पहिली दोन शेवंतीची नंतर दोन गुलाबाची नंतर परत एक शेवंतीचं आणि शेवटचं गुलाबाचं अशी रचना असेल. यापैकी प्रत्येक हारात फुलांची संख्या सारखीच असेल. तरीही हे हार वेगवेगळे असतील. या हारांना आता मध्येच आडव्या जाणार्या काही फांद्या फुटल्या तर आणखीही किती तरी प्रकारच्या रचना संभवतील. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्यामध्ये असाच फरक असतो. दोन्हींचा रचनाबंध वेगवेगळा असतो. आणि त्यामुळं त्यांचे काही गुणधर्मही वेगवेगळे असतात. पिकलेल्या फळांमध्ये, मधामध्ये तसंच काही भाज्यांमध्ये असलेली साखर फ्रुक्टोज प्रकारची असते.
आपण नेहमी वापरतो ती साखर म्हणजे सुक्रोज. ग्लुकोजचा एक रेणू आणि फ्रुक्टोजचा एक रेणू मिळून सुक्रोजचा रेणू तयार होतो. म्हणजे त्यातल्या मूलभूत घटकांची संख्या होते दोन. म्हणून त्याला डायसॅकराईड म्हणतात. इतर शर्करामय पदार्थांमध्ये असलेल्या घटकांची सख्या त्याहूनही अधिक असते. शिवाय त्या माळांची रचनाही अधिक गुंतागुंतीची असते. ही झाली पॉलीसॅकराईड. पण कितीही लांबलचक आणि गुंतागुंतीची माळ असली तरी तिचे तुकडे करत राहिल ंतर शेवटी हातात येईल तो ग्लुकोजच. किंवा फ्रुक्टोज.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply