श्री गणेश अवतारलीला ११ – श्री वल्लभेश अवतार
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार.
या अनंत कोटी ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्याची इच्छा झालेल्या भगवंतांनी आपल्या योगमायेला साकार केले. गाणपत्य संप्रदायात या आदिमायेला वल्लभा असे म्हणतात. या वल्लभे सह विराजमान भगवंतांना वल्लभेश असे म्हणतात.
अद्वैत वेदांतात ज्या स्थितीला सगुण-साकार, मायाशबलित ब्रह्म असे म्हणतात त्याच अवस्थेला गाणपत्य संप्रदाय वल्लभेश असे म्हणतो. यासाठी हा आद्यतम अवतार.
ही मूळमाया त्रिगुणात्मिका असते. सत्व,रज आणि तम तीन गुणांनी युक्त असणारी मूळमायाच वल्लभा नावाने ओळखली जाते. तिचे चालक असल्यामुळे, त्या तीन गुणांचे स्वामी या अर्थानी श्रीवल्लभेशांना श्री गुणेश असे पण संबोधतात.
हे वल्लभेश स्वरूप दशभुज अर्थात दहा हातांचे वर्णिले असते.
या गुणेशां पासूनच पुढे श्री ब्रह्मदेव, श्रीविष्णु, श्री शंकर, श्रीदेवी, आणि श्री सूर्य हे पंचेश्वर वेगवेगळ्या रूपात प्रकट होत असतात. वेगळ्या शब्दात गाणपत्य संप्रदायाच्या धारणेनुसार हे श्री गुणेशरूप या पंचेश्वरांचे जनक असते. या पंचेश्वरांच्या सर्व शक्ती मूलतः श्री गुणेशांच्या आहेत, हे दाखविण्यासाठी श्री गुणेश दहा हातांचे वर्णिले असतात तथा पंचेश्वरांची सर्व आयुधे, जसे चक्र,त्रिशूल, धनुष्य,कमळ इ. त्यांच्या हातात असतात.
पुढे यांच्या पासून पंचेश्वर वेगळे तयार झाल्यावर हे श्रीवल्लभेश आपल्या हातातील ह्या शक्ती त्यांना कार्यासाठी प्रदान करतात.
चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय.
जय गजानन.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply