रेडी … तेरेखोल .. तळकोकण … महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या सीमेजवळच्या … तळकोकणातल्या रेडीचा व्दिभुजा गणेश दशक्रोशीत फार श्रद्धेचं स्थान ठेऊन आहे. रेडी प्रसिद्ध आहे ते इथल्या लोहाच्या खाणींसाठी. रेडीच्या एका बाजूला तेरेखोलचा किल्ला-खाडी तर अलीकडच्या बाजूला महाराजांचा ऐतिहासिक यशवंतगड. सावंतांचा अंमल देखील यशवंतगड आणि या परिसरावर होता. गावात माऊलीचं … नवदुर्गेचं अशी दोन देवळं देखील आहेत. रेडी-तेरेखोल ही दोन गावं महाराष्ट्राच्या गोव्याच्या सीमेवर वसली असून अरबी समुद्राच्या तटावर आहेत.
वेंगुर्ला…. अरवली … मोचेमाड … शिरोडा … या दशक्रोशीत या देवळाविषयी एक कथा सांगितली जाते …. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे.
दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास
त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री.कांबळी व श्री. वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. श्री गणराया प्रगटले!
ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते
(काही फोटो कमेंट्समध्ये दिले आहेत) (मी यशवंतगड चालत फिरून नीट बघितला आहे … लिहेन कधीतरी … )
— प्रकाश पिटकर
पंडित वसंतराव देशपांडे … प्रथम तुला वंदितो … कृपाळा … गजानना गणराया …
https://www.youtube.com/watch?v=LwNuUZDK8_M
Leave a Reply