नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग २

अरुंधती परांजपे उर्फ आरू चा सप्तसूर नावाचा ऑर्केस्ट्रा होता.  नील नावाचा एक उमदा देखणा तरुण अचानक त्यांच्या ऑर्केस्ट्राला भेट देण्यास आला. त्याला येताना पाहून आरुला कोणाचीतरी आठवण झाली. 
तो उत्तम गिटारिस्ट आणि गायकही होता. सगळ्यांच्या आग्रहावरून त्याने एक गाणे म्हणून दाखवले.  आरू जणू त्याचा प्रेमातच पडली.
आता पुढे…………

अजब न्याय नियतीचा – भाग २

पाहता पाहता नील ग्रुपमध्ये कधी मिसळून गेला ते कळलेच नाही. आता नीलच्या येण्याने ‘सप्तसुर’च्या ऑर्केस्ट्रामध्ये अजून नवनवीन गाण्यांची भर पडत होती आणि त्यांची लोकप्रियताही वाढत होती. तसं नीलला ज्या दिवशी पाहिलं तेव्हाच आरूनं आपलं हृदय त्याचा नावावर केलं होतं. हॉलवर रोज त्यांच्या भेटी होतच होत्या. आरुला गिटार वाजवायला शिकायची होती. नील तिला गिटार शिकायलाही मदत करत होता. दोघानांही गाण्याची, संगीताची आवड होतीच, त्यामुळे गाण्यांची प्रॅक्टिस करता करता दोघंही एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांचं त्यांनाही कळले नाही.

मग हळुहळू हॉलशिवाय बाहेर डेटिंग करणे, शॉपिंगला जाणे, एकमेकांना गिफ्ट्स देणे, समुद्रावर फिरायला जाणे, मुव्ही पाहायला जाणे, घरी पोहोचल्यावर रात्री उशिरापर्यंत तासनतास मोबाईलवर गप्पा मारणे सुरु झाले.

एकदा नील आणि आरू प्रॅक्टिस वरून नीलच्या गाडीतून घरी जात होते. वाटेत एके ठिकाणी सिग्नलवर गाडी थांबलेली असताना आरूचे लक्ष शेजारील शोरुमकडे गेले. शोरुमच्या बाहेरील काचेत एक खूप सुंदरसा नीळा आणि आकाशी रंगाचे मोहक कॉम्बिनेशन असलेला ड्रेस लावलेला होता. त्यासोबतच एक नीलमण्यांनी सजवलेला ज्वेलरीचा सेट ठेवलेला दिसत होता. आरूला तो निळा ड्रेस आणि ज्वेलरी खूपच आवडली. ती एकटक त्याकडे पाहात होती. शेजारी नील ड्रायविंग सीटवरून तिच्याशी काहीतरी बोलत होता. पण आरूचे त्याच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नव्हते.

ती आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीये हे पाहून नीलने आरूकडे वळून पहिले तर ती ड्रेस पाहण्यात तल्लीन झाली होती. नीलचंही तिकडे लक्ष गेले. त्यालाही तो ड्रेस खूप आवडला.

तिची तंद्री भंग करून नील तिला म्हणाला, “ओ राणीसरकार, एवढं कशात मन गुंतलय आपलं? जरा आम्हाला तरी कळू दे.”

त्याचा प्रश्नाने आरूची तंद्री भंग झाली.

“कुठे काय ? सहज बाहेर पाहत होते.”

तेवढ्यात ग्रीन सिग्नल पडला. मागच्या गाड्या हॉर्न वाजवायला लागल्या त्यामुळे तो विषय तिथंच संपला.
नीलने गाडी चालू केली आणि ते पुढे निघून गेले.

खरं पाहता आरुकडे अशा असंख्य सुंदर ड्रेसेसनी तिचा वॊर्डरोब भरलेला होता, शिवाय मनाला येईल तेव्हा ती शॉपिंग करू शकत होती. त्यामुळे एखादा ड्रेस आवडणं, तो लगेच खरेदी करणं हि तिच्यासाठी फारच कॅज्युअल गोष्ट होती. दरमहा तिच्या बँक खात्यात भरपूर रक्कम जमा होत असे. शिवाय त्यांच्या ऑर्केस्ट्राचे उत्पन्नही चांगले होते, पण तरीही आरूचे मन थोडेसे खट्टू झालेच.

त्यानंतर दोनच दिवसांनी प्रॅक्टिस संपल्यावर नील आरूला घेऊन त्यांचा फेव्हरिट कॉफी शॉपमध्ये गेला. हे कॉफीशॉप त्यांच्या भेटण्याचं खास ठिकाण होतं. इथं कॉफी तर उत्तम मिळत होतीच, पण तशी गर्दीही खूप नसायची. त्यामुळे त्यांना मनसोक्त गप्पा मारत कितीही वेळ इथे बसता यायचं. त्यांना गप्पा मारायला इतके भरपूर कॉमन विषय असायचे की, काय बोलावे हा कधी प्रश्नच पडत नसे.

कॉफी पिऊन झाल्यावर नीलने आरूला दोन मिनिट डोळे बंद करून बस असे सांगितले. आरूने डोळे मिटल्यावर तिला तिच्या हातात काहीतरी जड वस्तू ठेवल्याचे जाणवले. तिने डोळे उघडून पहिले तर नीलने तिच्या हातात एक मोठ्ठी शॉपिंग बॅग ठेवली होती.

आरूने पटकन बॅग उघडून पहिले तर तिला त्यात दोन बॉक्स दिसले. आरू एकदम आश्चर्याने ओरडलीच, “अरे नील, हे काय आहे? आणि एकदम दोन दोन बॉक्स? आत्ता तर कुणाचा वाढदिवस किव्वा इतर काहीच नाहीये.”
नील हसत हसत म्हणाला, “सरप्राईज आहे जानू, उघडून तर पहा.”

आरूने उत्सुकतेने आधी मोठा बॉक्स उघडला. त्यांत तिला सिग्नल वरच्या दुकानातील आवडलेला निळा ड्रेस होता.
“वॊव, व्हेरी ब्युटीफुल सरप्राईज. मला खूप आवडला हा ड्रेस. ए, पण तिथे तर खूप सारे ड्रेस लावले होते, त्यातून तुला कसं कळालं कि मला हाच ड्रेस आवडला होता ते?”

यावर नील तिला नाटकीपणाने म्हणाला, “जानु, तुझ्या डोळ्यांनी मला सांगितलं कि तुला कोणता ड्रेस आवडला आहे ते. तर राणीसाहेब, आपण आता ते दुसरे सरप्राईज उघडून बघावे आणि आपल्या या सेवकाला उपकृत करावे हि विनंती.”
आरूला नीलच्या नाटकी बोलण्याची खूपच गम्मत वाटत होती. हसतच तिने दुसरा छोटा बॉक्स उघडला. त्यात या ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी सेट होता. त्यात निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स असलेले नीलमणी वापरले होते. आरूचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती नीलला आनंदून म्हणाली, “नील डियर, थँक्यू सो मच फॉर धिस फॅब्युलस सरप्राईज. काहीही झालं तरी हा ड्रेस घ्यायचाच असं मी त्या दिवशी ठरवलं होतं, आणि आज तो प्रत्यक्ष माझ्यासमोर हजर? आणि हा ज्वेलरीचा सेट तर निव्वळ अप्रतिम आहे. लांबून बघताना मला अंदाज आला नव्हता कि हा सेट इतका सुंदर असेल.”
मग हसून ती नील सारखेच नाटकीपणाने त्याला म्हणाली,”या राणी सरकारांना आपण दिलेली भेट पसंत पडली आहे. हमारा दिल खूष हुवा हैं, तरी सेवकांनी त्यांना काय बक्षिस मिळावे अशी अपेक्षा आहे ते सांगावे.”

नील म्हणाला, “राणीसाहेब, आपण कायम असेच हसत, आनंदी राहावे आणि बक्षिस म्हणून आपला अमूल्य वेळ, रोज थोडा तरी या सेवकासाठी द्यावा, एव्हडीच या सेवकाची अपेक्षा आहे.”

“मंजूर, सेवकाची विनंती राणीसाहेबांना मंजूर आहे.”

यावर दोघेही खळखळून हसू लागले.

नील म्हणाला, “खरं सांगतो आरू, ते गिफ्ट उघडताना तुझ्या चेहेऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत होता ना, त्याची किंमत मी कोणत्याच गोष्टीशी करू शकत नाही. बस, ज़िन्दगीभर ऐसेही मुस्कुराते रेहेना.”

‘सप्तसूर’च्या ग्रुपलाही आता आरू आणि नील मधील प्रेमाचा सुगावा लागला होता. ग्रुप मध्ये यावरून त्यांची जाम खेचखेची होत असे.

एक दिवस प्रॅक्टिसला बरेच मेंबर आले नव्हते. म्हणून नेहा आरू बरोबर गप्पा मारत बसली होती. नेहा आरूची एकदम खास मैत्रीण होती. त्या दिवशी नीलही आलेला नव्हता.

नेहा म्हणाली, “आरू, मला तुझ्याशी नीलबाबत थोडं बोलायचं होतं.”

“अग मग बोल ना.”
“आरू, तू नीलबाबत किती सिरीयस आहेस?”
“का ग? असं का विचारतेस?”
“सहजच, अग तो बाहेरून इथं आलेला मुलगा आहे ना. स्वभावानं चांगला आहे, पण त्याच्या बद्दल बाकीची सगळी माहिती आहे का तुला?”
“त्याचे आई बाबा दिल्लीत असतात, असं म्हणाला तो, पण मी जास्त चौकशी नाही केली.”
“मला वाटतं तू कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी कारावीस.”
“नेहा, मला माहितेय, तुला माझी काळजी वाटते ते. मी करीन चौकशी, ok? पण आज अचानक तुला असं का वाटलं?”
“आज नाही, ज्या दिवशी नील इथं आलाय तेव्हापासून मला काहीतरी फिशी आहे असं वाटतंय. त्याला बघितल्यावर मला तो ओळखीचा आहे असंच वाटलं होतं. पण तुमच्या कुणाच्या वागण्यात मला तसं दिसलं नाही, म्हणून मी गप्प बसले.”
“काय सांगतेस? तुलाही असंच वाटलं? मलाही सेम फीलिंग आलं होतं. म्हणजे दिसण्याच्या बाबतीत नाही, पण चालणं, बोलणं, आवाज, हसणं हे सगळं ओळखीचं आहे असा मलाही भास झाला.”
“जिजूंच्या बाबतीतला आपला अनुभव लक्षात आहे ना तुझ्या. एखाद्या व्यक्तीबद्दल पुरेशी माहिती नसली की किती त्रास होतो ते अनुभवलं आहे आपण. म्हणून नीलची सगळी माहिती मिळव असं मी तुला म्हणाले.”
“नेहा, बरोबर आहे तुझं. थँक्स फॉर सजेशन. मी काळजी घेईन.”

*******************
तिकडे दिवसेंदिवस आरूच्या ओर्केस्ट्राची लोकप्रियता वाढत होती आणि इकडे आरू आणि नीलचे प्रेमही बहरत चालले होते.

एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. आरू घरीच आराम करत होती. तेवढ्यात तिला नीलचा कॉल आला.
“हाय आरू, आज संध्याकाळचा काय प्रोग्रॅम आहे?”
“काही नाही, घरीच आहे मी.”
“मग आज आपण बीचवर जाऊया का? खूप दिवसात आपण समुद्रावर फिरायला गेलोच नाहीये.”
“हो, जाऊया. किती वाजता येऊ?”
“संध्याकाळी सहा पर्यंत येशील? आणि हो, येताना तो निळा ड्रेस घालून ये.”
“ठीक आहे, मी येते वेळेत आपल्या नेहमीच्या ठिकाणी.”
“आज तुझ्यासाठी परत एक सरप्राईज आहे.”
“ए बाबा, मला आता परत काही गिफ्ट आणू नकोस. माझ्या कपाटात जागा नाहीये आता काही ठेवायला. बाय.”

******************************

ठरल्याप्रमाणे दोघेही बीचवर भेटले. आरूने निळा ड्रेस घातला होता त्यामुळे ती खूपच छान दिसत होती. नीलने त्याला आरूने गिफ्ट दिलेला लेमन कलरचा शर्ट घातला होता.

गप्पा मारत फिरत असताना नीलने खिशातून एक सुंदर मखमली डबी काढून आरूला थांबवले.
“आरू, जरा थांब ना.”

त्याने आरूचा हात हातात घेतला. तिच्या नजरेत नजर मिळवून तो म्हणाला, “आरू, गेले अनेक महिने आपण एकमेकांबरोबर आहोत, एकमेकांना पसंत आहॊत, आपल्याला एकमेकांचे विचार, आवडी निवडी माहिती झाल्या आहेत. अशावेळी आपण आपल्या भावी आयुष्याबद्दल विचार करायला पाहिजे असे मला वाटते. म्हणून आज मी तुला एक विचारणार आहे आणि तुझे स्पष्ट उत्तर ऐकायला मला आवडेल. देशील ना?”

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..