जहाजावर किचनला गॅली बोलले जातं. जेवण बनवण्यासाठी या गॅली मध्ये एक कुक आणि त्याला मदत करायला तसेच अधिकाऱ्यांना जेवण सर्व्ह करण्यासाठी एक स्टिवर्ड असतो. जहाजावर हल्ली एकच कुक असतो तरीपण त्याला सगळे चीफ कुक असेच बोलतात. एकटा चीफ कुक सकाळी पाच साडेपाच पासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी तीन वाजल्यापासून सात वाजेपर्यन्त सर्व खलाशी आणि अधिकाऱ्यांचे असे मिळून एकूण 25 ते 30 जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण फक्त स्टिवर्ड ला हाताशी घेऊन बनवत असतो. गॅली मध्ये जेवण बनवताना किंवा इतर काही शिजवताना प्रत्यक्ष आगीशी संबंध येत नाही. इलेक्ट्रिक हॉट प्लेटवरच सगळं जेवण शिजवले जाते. या हॉट प्लेटवर शिजवण्यासाठी ठेवलेली भांडी जहाज हेलकावत असताना पडू नये म्हणून व्यवस्था केलेली असते. प्रत्येक जहाजावर फिश रुम, वेज रूम आणि मिट रूम असतात. ब्रिटिश लोकांच्या जहाजावर तर बियर थंड ठेवण्यासाठी बियर रूमची सुद्धा व्यवस्था असायची पण आता झिरो अल्कोहोल पॉलिसी मुळे काही जुन्या जहाजांवरील या बियर रूम फक्त नावापुरत्या उरलेल्या आहेत.
जहाजावर प्रोविजन सप्लाय झाल्यावर ताज्या पालेभाज्यांसह इतर भाज्या सात ते आठ दिवस बऱ्यापैकी खायला मिळतात पण जसजसे दिवस वाढत जातात तसं तशा या भाज्या जेवणातून कमी कमी होत जातात. आणखीन आठ दहा दिवसानी मग फ्रोजन व्हेजिटेबल्स शिवाय पर्याय नसतो. फिश आणि मटण तर सांगायलाच नको जहाजावर येण्यापूर्वी ते किती दिवसांपूर्वीचं आहे ते कळायला मार्ग नसतो तशी त्यांच्यावर पॅकिंग आणि एक्सपायरी डेट असते पण जहाजावर एका कॅप्टन च्या चुकीमुळे मिट रूम मध्ये असलेले मटण जवळपास आठ महिन्यापुर्वी पासून शिल्लक होतं आणि संपता संपत नसल्याची माहिती मिळाली होती. 25 ऐवजी 250 किलो मागणी केल्यामुळे हा प्रकार झाला होता सप्लायरच्या लक्षात हि चुकी आणून दिली तरी सुद्धा त्याने रडत रडत 100 किलो कसंबसं परत नेलं होत, पण उरलेलं 150 किलो संपायला आठ नऊ महिने लागले होते आठवड्यातून एक दोन वेळा बीफ आणि एक दोन वेळा पोर्क बनत असल्याने मटण तसंच पडून राहायचं. जहाजावर मासे सुद्धा महिना महिना भर फ्रीज केलेले असतात. एकदा का जहाज निघालं की पुढच्या बंदरात पोचेपर्यंत नवीन प्रोविजन येत नाही त्यामुळे लांबची व्हायेज असली की एक माहिन्याऐवजी दीड महिनाभर पुरेल एवढं प्रोविजन घेतले जाते. ब्रेड अंडी भाजीपाला मटण मच्छी यांची एक्सपायरी उलटून आठवडेच काय महिने पण निघून जातात. फ्रीज केलेले असल्याने खराब होत नाही एवढंच. चिकन आणि मटण समोरा समोर कापलेला असेल तरच घेणारे किंवा सकाळचा असेल तर दुपारी घ्यायला नकार देणारे पाहिले की स्वतःची खरोखर कीव आल्याशिवाय रहात नाही.
जहाज बंदरात नांगर टाकून उभं असलं की काही खलाशी आणि हौशी अधिकारी गळ टाकून मच्छी पकडतात. कॅप्टन किंवा एखादा चीफ इंजिनीयर जास्तच हौशी असला की गळाला लागलेली मच्छी ताबडतोब बनवायला सांगतात. एका जहाजावर तर भूमध्य समुद्रात माल्टा बंदरात असताना आपल्याकडे बागडे मिळतात तसे बागडे मोठ्या प्रमाणावर गळाला लागत होते. त्यावेळी हार्ड लिकर बंद होती पण बियरच्या केसेस मागवल्या गेल्या रात्री नऊ वाजून गेले असल्याने मेस रूम मधल्या मायक्रोवेव्ह मध्ये ताजे बागडे मीठ मसाला लावून शिजवून खाल्ले आठ दहा जणांनी ताजी मच्छी मिळाली की ती मायक्रोवेव्ह मध्ये शिजो नाहीतर अर्धी कच्ची राहो सगळे जण चवीचवीने खात असतात.
जहाजावर मच्छी पकडण्यास एकतर बऱ्याचशा कंपन्याकडून तरी बंदी असते किंवा बंदर प्रशासनाकडून तरी असते. जहाज कार्गो लोंडिंग किंवा डिस्चार्ज करत असेल तेव्हा तर असतेच असते. पाण्यात मच्छी पकडण्यासाठी गळ फेकत असताना तो बाजूला उभ्या असलेल्या खलाशाच्या डोळ्यात अडकून त्याला एवढी गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यासाठी त्या खालशाला हॉस्पिटलला नेल्यामुळे कंपनीला बोट अरेंज करण्यापासून ते हॉस्पिटलचा खर्च तसेच त्याला घरी पाठवण्याचा असा मिळून हजारो अमेरिकन डॉलर्स चा फटका बसला.काही जहाजांवर मच्छी पकडत असताना पाण्यात पडलेल्या आणि बुडालेल्या खालाशांचे पण किस्से आहेत. बस तेव्हापासून सगळ्या कंपन्यांनी त्यांच्या जहाजांवर गळच काय पण कोणत्याही प्रकारे मासेमारी करायला बंदी घातली. असे असूनसुद्धा काही जहाजांवर गळ टाकून ताजी मच्छी पकडण्याची हौस पुरी केलीच जाते.
गॅली लागूनच मेस रुम असतात एका बाजूला अधिकाऱ्यांसाठी आणि एका बाजूला खालाशांसाठी कधी कधी या मेस रूम मध्येच सिगारेटची धुरांडी चालविणाऱ्यांसाठी स्मोक रूम सुद्धा असते जुन्या जहाजांवर TV VCR आणि ऑडिओ सिस्टिम ने सुसज्ज अशा स्मोक रूम असतात त्या पण खलाशी आणि अधिकारी यांच्यासाठी वेगवेगळ्या बनवलेल्या असतात. ब्रिटिश किंवा युरोपियन अधिकारी असतील तर अशा जहाजांवर ब्रँडेड दारू ने सजवलेले सुसज्ज असे बार पण या स्मोक रूममध्ये असतात. पण आता बऱ्याचशा जहाजांवर गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी अशी परिस्थिती राहिली आहे. जस जशी कॉम्पुटर मध्ये उत्क्रांती होऊ लागली तस तसं या स्मोक रुम मधला राबता कमी कमी होऊ लागला. पूर्वी सगळे सिनियर आणि ज्युनियर अधिकारी रात्री जेवण झालं की एकत्र बसून एखादा पिक्चर किंवा गाणी बघत बसायचे एकमेकांशी गप्पा मारायचे तासनतास. पण जस जसे लॅपटॉप येऊ लागले तस तसं एकत्र येणारे कमीकमी होऊ लागले. हल्ली मोबाईल मुळे तर केबिन बाहेर ड्युटी व्यतिरिक्त फक्त नाश्ता आणि दोन वेळचं जेवण यासाठी फक्त बाहेर पडतात सगळे. मेस रूम मध्ये जेवायला एकमेकांना भेटलेच तर थोडंफार बोलणं होत असतं बास, मग कोण काय करतोय याच कोणाला कोणाशीच काही देणं घेणं नसतं. मेस रुम मध्ये माझ्या खुर्चीवर का बसलास याच्यावरून पण काही ज्युनियर अधिकाऱ्यांमध्ये हातापायी होण्याची वेळ आलेली बघायला मिळाली आहे. सेलिंग शिप म्हणजे समुद्र सफरीवर जाणाऱ्या जहाजांवर गॅली किंवा मेस रूम मध्ये खाण्याच्या वस्तूंवर खूप नियंत्रण ठेवण्यात येते. जसं की एखादं दिवशी संत्री असतील तर एकाला एकच या प्रमाणे मोजून ठेवली जातात. खरं म्हणजे हे सर्व कंपनी आणि कॅप्टन वर अवलंबून असतं. प्रति दिवस प्रति माणशी विक्चुअलींग म्हणजे खाणेपिणे करीता सात ते आठ डॉलर्स म्हणजे साधारण पाचशे ते साडेपाचशे रुपये एका व्यक्तीवर खर्च केला जातो मग तो अधिकारी असो की खलाशी असो. कधी कधी पाहिजेल त्या फ्लेवर चा ज्यूस नाहीतर कधी कधी ज्याला कडवट चव आणि फारसं कोणी पीत नाही असा ऑरेंज किंवा ग्रेप फ्रुट असेच ज्यूस मागवले जातात. म्हणजे कोणी प्यायला नको किंवा संपला म्हणून मागायला नको. पण काही काही कॅप्टन कंपनीशी भांडुन खाण्यापिण्याची चांगली सोय करतात. ब्राझील मध्ये कलिंगड, अननस यांच्यापासून बनवलेले ताजे ज्यूस अवोकॅडो चा मिल्कशेक आणि एकाने तर शहाळी मागवण्याचा पराक्रम पण केला होता. सकाळी नाश्त्या सोबत एक एक मोठं ब्राझील मधलं शहाळ सोलून तयार असायचं. मच्छी बोट दिसल्यावर जहाजाचा वेग कमी करून त्या बोटीना थांबवून त्यांच्याकडून कोळंबी आणि खेकडे घेणारे कॅप्टन सुद्धा पहायला मिळाले. दिवसभर काम केल्यावर आपल्याला पाहिजे ते खायला न मिळता, मिळेल ते खायला लागतं जहाजावर. जहाजावर सगळ्यात कठीण काम कोणाचं असेल तर ते फक्त कुक चे. त्याने बनवलेलं जेवण सगळ्यांना आवडेलच असं नसतं. एखादं दिवशी एखादा पदार्थ चांगला झाला तर उशिरा जेवणाऱ्यांच्या वाट्याला येत नाही. सकाळची भाजी किंवा डाळ रात्रीला पुन्हा गरम करून मांडतात त्यामुळे फक्त व्हेज खाणाऱ्यांची अवस्था सर्वात वाईट असते. नॉनव्हेज वाल्याला व्हेज चे ऑप्शन असते पण फक्त व्हेज वाल्याला एकच पर्याय.
जहाजावर जॉईन झाल्यापासून घरी जाण्यापर्यंत कोणी दिवस किंवा महिने मोजत नाहीत. मला घरी जाण्यासाठी अजून चार बिर्याणी खाव्या लागतील याचा अर्थ मला अजून चार रविवार किंवा चार आठवडे तरी जहाजावर काढायचे आहेत. याला कारण पण असच आहे. बहुतेक सगळ्या जहाजांवर रविवारी अर्धा दिवस सुट्टी असते. प्रत्येक रविवारी सगळ्या जहाजांवर बिर्याणी बनतेच बनते. चिकन नाहीतर मटण यापैकी एक किंवा बीफ आणि पोर्क कधी कधी फिश ची सुद्धा. पण बीफ आणि पोर्क सोबत चिकनची पण लागतेच काही काही कुक बनवतात दोन्ही. या बिर्याणी सोबत दही टाकून केलेला रायता आणि पापड हे सुद्धा असणारच. काही कॅप्टन तर पापड सुद्धा मोजून तळायला सांगतात प्रत्येकी एक या प्रमाणे. या रुटीन संडे बिर्याणी मुळे घरी सुट्टीवर असताना रविवारी बिर्याणी खायला मिळाली नाही की चुकचुकल्यासारखं वाटतं. जहाज ब्राझील सारख्या देशांमध्ये तिथल्या तिथे फिरत असेल तर भारतीय मसाले आणि कडधान्ये मिळत नाहीत. मग मुंबई ऑफिस जहाजावर जॉईन कारणाऱ्यासोबत मसाले पापड कडधान्याने भरलेली मोठी सुटकेस मुंबईहुन ब्राझील पर्यंत जहाजावर पाठवून देते. जहाजावर सगळे अधिकारी आणि खलाशी भारतीय असले की गॅली आणि जेवणाचं असंच असतं.
सगळे जण पोटासाठी कमावतो असं बोलतात पण त्याच पोटाला भरण्यासाठी ज्या चवीचं आणि जस असेल तसं निमूटपणे खात असतात. काही कुक किंवा कॅप्टन असले की कधी कधी स्वतःच्या घरी जे पदार्थ आणि जेवण खायला मिळत नाही असं दर्जेदार जेवण आणि पदार्थ सुद्धा मिळतात. महिन्याला लाखो रुपये पगार घेणारे अधिकारी जेवताना फक्त उकडलेल्या भाज्या बिना तेलकट आणि तिखटा शिवाय बनवलेलं खाताना बघून कीव येते. त्यांची कोणाला हार्ट प्रॉब्लेम तर कोणाला हार्ट प्रॉब्लेम होऊ नये म्हणून स्वतःला बेचव खाण्याची सवय लावून घेतलेली असते. कामाच्या ठिकाणी राउंड घेताना एखादा पाना किंवा नट बोल्ट पडलेला दिसला की तो उचलून जागेवर ठेवण्यासाठी एखाद्या खलाशाला बोलावून सांगणारे अधिकारी जेव्हा संध्याकाळी जिम रूम मध्ये सायकलिंग किंवा ट्रेड मिल वर धावताना बघितल्यावर नवल वाटल्याशिवाय राहात नाही.
गॅली आणि खाण्यापिण्याचे काटेकोर टायमिंग पाळण्यामुळे जहाजावर सहसा खाण्यापिण्यामुळे कोणी कधीही आजारी पडत नाहीत. संध्याकाळी सहा ते सात या डिनर टायमिंग नंतर सकाळी सात वाजेपर्यंत काही खायचे असल्यास अगोदरच बाहेर काढून ठेवावे लागते. घरापासून लांब राहण्याची तडजोड करता करता खाण्यापिण्याशीसुद्धा तडजोड करून प्रत्येक जण खाऊन झालेल्या आणि खायच्या बाकी असलेल्या बिर्याण्या मोजत असतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply