MENU
नवीन लेखन...

सॅल्युट

आजही मरीन इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) म्हणजेच आमच्या मेरी मुंबई येथील प्री सी ट्रेनिंगचा पहिला दिवस आठवतोय. पहिल्याच दिवशी पहिल्याच लेक्चर मध्ये भारतीय नौदलातील रिटायर्ड झालेले एक अधिकारी इंस्ट्रक्टर म्हणून आमच्या वर्गावर आले होते. त्यांनी मग सगळ्यांना विचारले की तुम्हाला माहिती आहे का आर्मी, एअरफोर्स आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये सॅल्युट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सैन्याच्या तिन्ही दलांचे सॅल्युट वेगवेगळे असतात ही माहिती त्यावेळी नवीन होती कारण सॅल्युटचे एवढे निरीक्षण कधी केले नव्हते. आता ते कसे असतात हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्याप्रमाणे सगळ्यांना लागली होती. मग त्या इन्स्ट्रक्टर ने आर्मीचा सॅल्युट दाखवला, सगळी बोटे एकत्र करून ज्याला सॅल्युट करायचा आहे त्याच्याकडे पाहून तळहात त्याला दिसेल अशाप्रकारे कपाळाला लावला जातो. एअरफोर्स मध्ये सगळी बोटे एकत्र करून तळहात जमिनीकडे 45 अंशाच्या कोनात म्हणजे खालच्या दिशेला ठेवून कपाळाला लावला जातो. नेव्ही मध्ये सगळी बोटे एकत्र करून तळहात 90 अंशाच्या कोनात लावून खाली जमिनीच्या दिशेकडे ठेवून कपाळाला लावला जातो.

काम करताना ऑईल, ग्रीस लागून किंवा इतर कशानेही तळहात काळे होत असतात म्हणून अस्वच्छ तळहात ज्याला सॅल्युट करायचा आहे त्याला दिसू नये म्हणून खाली जमिनीकडे ठेवला जातो. सॅल्युट म्हणजे एकमेकांना नम्रपणे दिलेला आदर आणि विश्वासाचे आणि प्रतीक असतो. आपल्या सहकाऱ्याला मग तो वयाने, अधिकाराने आणि अनुभवाने लहान किंवा मोठा असला तरीही समोर पहिल्यांदा दिसल्यावर किंवा सुट्टी झाल्यावर जाताना एकमेकांना सॅल्युट केला जातो. पहिल्याच दिवशी आम्हाला सर्वांना याची कल्पना देऊन, सॅल्युटची प्रॅक्टिस करायला लावली. त्या दिवशी आम्ही सगळे रात्री एकमेकांना झोपायला जाईपर्यंत कारण नसतांना उगाचच सॅल्युट करत होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नुसतं हाय हॅलो किंवा गुड मॉर्निंग करण्यापेक्षा एकमेकांना सॅल्युट करून गुड मॉर्निंग सर बोलून हसत होतो. मेरी मध्ये ट्रेनिंग करत असताना इन्स्टिट्यूट मधील सगळ्या इंस्ट्रक्टरना आणि मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये जे अधिकारी दिसतील त्यांना सॅल्युट करायचो. आपण एखाद्याला सॅल्युट केला की समोरच्याचा हात सुध्दा आपसूकच सॅल्युट करण्यासाठी वर जातो याचा अनुभव आला. समोरचा अधिकाराने किंवा वयाने लहान किंवा मोठा असला तरी सॅल्युटला स्मितहास्य देऊन प्रतीसॅल्युट करतोच करतो. बाबा पोलीस खात्यामध्ये अधिकारी असल्याने लहान पणापासून त्यांना सॅल्युट करून अभिवादन करणारे त्यांचे सहकारी नेहमी दिसायचे. पोलीस स्टेशन मध्ये बाबा जात असताना जे समोर येतील ते सगळे जण सावधान पोजिशन मध्ये येवून कडक सॅल्युट ठोकायचे बाबा सुध्दा त्यांना अभिवादन करून त्यांच्या केबिनमध्ये जायचे. हे सर्व पहात असताना बाबांबद्दल खूप अभिमान वाटायचा. त्यांचे अधिकार आणि रॅऺक मुळे त्यांना हा मान सन्मान मिळत असावा अशी कल्पना असायची पण एखाद्या पोलीस स्टेशन मधून त्यांची बदली झाल्यावर निरोप समारंभात त्यांचे सहकारी जेव्हा भाषण करताना भावूक व्हायचे तेव्हा ते सर्वजण मनापासून सॅल्युट करून माझ्या बाबांप्रती आदर व्यक्त करायचे याची खात्री होत असे.

सॅल्युट करणे आणि ते करण्यामागची व स्विकारण्याची भावना मर्चंट नेव्ही मध्ये अनुभवायला मिळाली. जहाजावर फारसे सॅल्युट करण्याची वेळ येत नाही परंतु कधी कधी अशी वेळ येते की आपल्या सिनियर किंवा ज्युनियर अधिकाऱ्यांना किंवा खलाशांना सॅल्युट करण्यासाठी आपसूकच हात वर जातो. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये नेव्हाल डॉकयार्ड इथे जेव्हढे कडक सॅल्युट ठोकले तेव्हढे सॅल्युट जहाजावर ठोकायची वेळ आली नाही. जहाजावर प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये जेवढा व्यस्त असतो त्याहीपेक्षा जास्त चिंताग्रस्त असतो त्यामुळे सॅल्युट करायला आणि बघायला वेळच नसतो एकमेकांना. पण जेव्हा ओळखीचे अधिकारी आणि खलाशी एकमेकांना जहाजावर किंवा एखाद्या शहरात कंपनी ऑफिस मध्ये एकमेकांना खूप वर्षांनी भेटतात तेव्हा एकमेकांना सॅल्युट केल्याशिवाय रहात नाहीत.

पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जहाजावर भारताचा शानदार तिरंगा फडकवला जाऊन तिरंग्याला सॅल्युट करण्यासाठी सगळे ब्रिजच्या वर असलेल्या मंकी आयलंड येथे जमा होतात. देशाच्या बाहेर समुद्रात असताना जहाजावर डौलाने फडकणाऱ्या आपल्या तिरंग्याला सॅल्युट करताना जो आनंद मिळतो तेवढा आनंद कधीच मिळत नाही. एखाद्या अधिकाऱ्याला किंवा खलाशाला लग्नापूर्वी प्रेयसीला आणि लग्नानंतर बायकोला तिच्याप्रती असलेल्या त्याच्या भावना सॅल्युट करून व्यक्त करता येतात. प्रियकर युनिफॉर्म मध्ये असो वा नसो पण तो जेव्हा त्याच्या प्रेयसीला सॅल्युट करतो तेव्हा त्याच्या प्रेयसीला मोठी गंमत वाटते. बघ प्रिया मी तुला सॅल्युट करतोय त्या सॅल्युट मागच्या माझ्या तुझ्याप्रती असलेल्या भावना समजून घे असेच त्याला सुचवायचे असते. शिस्त किंवा शिरस्ता म्हणून सॅल्यूट करताना समोरच्याच्या प्रती असलेल्या भावना डोळ्यात आणि चेहऱ्यावर उमटल्या जातात त्यामुळे केवळ अधिकाराने मोठा आहे म्हणून सॅल्युट करायची नामुष्की कोणावर ओढवली गेली असली तरी त्यामागचे भाव कोणालाही लगेच ओळखता येतात.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..