लेखक – अतुल चौधरी
`आम्ही साहित्यिक’चे लेखक
तसं पाहिलं तर सर्व काही सुरळीत चालू होतं. झाडे तोडली म्हणून पर्यावरणवादी आक्रोश करत होते, निवडणुकांच्या तोंडावर दररोजच काहीतरी अगदी जेवणानंतर मसाला पान चघळण्याच्या नित्यक्रमा प्रमाणे रंगतदार घटना घडतच होत्या; आंदोलने, रस्त्यातील खड्डे, बुडणाऱ्या बँका, बेरोजगारी सर्व काही अगदी चंद्र सूर्याच्या कक्षेत फिरण्याच्या नियमितपणाप्रमाणे शिस्तबद्ध सुरूच होते. आर्थिक मंदी आहे का नाही या गहन प्रश्नावर सामाजिक उद्बोधन करणारे कितीतरी नवीन अर्थशास्त्रज्ञ आपले पांडित्य मांडत होते. ज्ञान जागृती, ज्ञान वर्धन अखंडपणे सुरू असताना, अस्वस्थतेचे कुठले नामोनिशाण नव्हते.
अस्वस्थता आणि निर्मितीप्रक्रिया यांचे काहीसे नाते मात्र जरूर असावे. मावळतीच्या किरणांनी दर सांजवेळी अस्वस्थता जाणवून ग्रेस नी ‘संध्याकाळच्या कविता’ लिहिल्या. नंतर, कित्येक समीक्षक, वाचक अहोरात्र त्यांच्या दुर्बोधतेचा डंखा पेटवत होते. ग्रेसच्या हिवाळ्यातील संध्याकाळी कोणीतरी चोरून नेलेले आकाश आणि कोण्या पर्वतपठारावरील वाऱ्याने चोरून नेलेली चंद्रजमवणीतली चांदणी शोधण्याच्या अस्वस्थतेत कित्येक वर्षे गेली. त्या अस्वस्थतेत कित्येक कवींचे सूर्यास्त उदयास आले; नवनिर्मितीकारांनी वेदनेच्या जाणीवांची अनुभूती उपभोगली. तेही आता सरून गेले, नवे काही न गवसल्याने सर्व काही सुरळीतपणे चालू असल्याने, जाणीवांच्या संवेदनशील अस्मितेची चाहूल देखील दिसेनाशी झाली.आक्रोश चंदनी कस्तुरीमृगाचा ओस पडला होता, दारातील सोनचाफा सुगंधाचा व्यापार करत होता. मराठी रसिक सुखावून गेला.
नेमीची येतो पावसाळा,नेमीची पडता खड्डे;
पालवी अर्घ्य जिव्हाळा,अंधारी मोजता चट्टे.
शीळ धुक्यात विणून भटके वैराण नावाडी,
साद शब्दात रमून ऋण तरंगे चांदणी!
तर नित्यनियमाने साहित्यसंमेलने येतात; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नेहमीप्रमाणे अध्यक्षीय निवड होते. कुठलीही प्रतिक्रिया व प्रतिसाद न देता उदारमतवादी रसिक मायबाप गहिवरलेल्या अंतकरणाने नवीन अध्यक्षांची नेहमीप्रमाणे दुर्लक्षित दखल घेतात; कुठेच अस्वस्थता नाही. साहित्यक्षेत्राला कुठले नवीन वळण नाही, नवप्रवाह नाही. नावाडी क्षीण दुबळा असल्याचा आकांतही नाही. कुठे साधक-बाधक साहित्यिक चर्चेला मिळत असलेल्या मर्यादित व्यासपीठाकडून कसलीच अपेक्षा व्यक्त होत नाही. वाचकांची निष्ठेची देखील एक गूढ अशी स्वस्थता कुठल्यातरी सीमारेषांच्या चाकोरीत बंद होऊनही अस्वस्थ शब्दांचा बुडबुडादेखील पृष्ठभागावर निदर्शनास येत नाही. सर्व काही कसं सुरळीत चाललंय. अस्वस्थ काहूराची चांदणी पल्याडी क्षितिजी गेली.
सर्वसामान्यांच्या साहित्य संमेलनापासून काय अपेक्षा असतात; त्यांचा व्यासपीठावरील सहभाग महत्त्वाचा असू शकतो का? साहित्यनिर्मितीची नाळ ही अस्वस्थतेत असेल तर उद्या कुठल्या रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवलेल्या एखाद्या अमराठी परकीय सर्वश्रेष्ठ जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची गौरवपूर्ण संधी रसिकांनी जरूर दिली पाहिजे. कदाचित अस्वस्थ मनाचे फुलोरे शब्दांकित करण्याची थोडीफार लज्जा शाबूत असल्याच्या पुराव्यादाखल हा छोटासा लेखप्रपंच!
प्रतिभावंतांच्या या प्रायोजित मेळाव्यातून रसिकांनी पाठ फिरवली तर त्यात आश्चर्यजनक असे काहीच भासणार नाही परंतु रसिकांना आकर्षित करू शकतील असे प्रतिभावंत निवडून त्यांच्या साहित्यिक मूल्यदानास योग्य तो सन्मान म्हणून अशा संमेलनांना आवर्जून उपस्थिती दाखवणाऱ्या सर्वसामान्य प्रामाणिक वाचकांचा टाहो तरी या स्वस्थतेत सुरळीतपणे मुका होत आहे. साहित्याचे वेड व त्याविषयी तळमळ वाटणाऱ्या सच्या चोखंदळ वाचकांची दातखीळ बसवण्यास नवीन साहित्य संमेलन अध्यक्षांची निवड कारणीभूत आहे असे तरी स्वस्थपणे म्हणावे का? कुठेच काही नवीन नाही, सर्व काही सुरळीत, कुठेच अस्वस्थता नाही.
मावळतीची किरणे मंदगार वारा
सावलीत दडपे उभादेह सारा;
हरखून नभी न्याहाळणे सोडा,
ढगाने पळवला अश्वमेध घोडा!
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास पामराच्या शुभेच्छा!
— अतुल चौधरी
`आम्ही साहित्यिक’चे लेखक
कीती छान लीहलं आहेस