आपण एका जागी स्थिर उभे असतो. आपला श्वासोच्छ्वास सोडला तर आपली कोणतीही हालचाल होत नसते. अशा वेळी एखादा फुटबॉल आपल्यावर येऊन आदळला, तर काय होईल? आपण जागच्या जागी डगमगू. किंवा तोल जाऊन कुठं तरी भेलकांडत जाऊ. कदाचित पडूही. कदाचित आपण एखादी छोटीसी उडीही घेऊ. क्रिकेटचा,
किंवा टेनिसचाही, चेंडू वेगानं येऊन आदळला तर आपल्याला इजाही होऊ शकते. एखादं हाडही मोडू शकतं. किमान ज्या जागी तो येऊन आदळला तिथलं तापमान वाढतं आणि त्या जागी उष्णता जाणवते. असं होण्याचं कारण म्हणजे त्या वेगानं येणार्या चेंडूत ऊर्जा असते. आणि टक्कर झाली की त्यातली काही ऊर्जा आपल्याला मिळते. त्यापायी मग आपलं शरीर अशा निरनिराळ्या प्रकारे उत्तेजित होतं. प्रकाश म्हणजे तर मूर्तिमंत ऊर्जा. त्यामुळे प्रकाशकिरण असे येऊन एखाद्या पदार्थावर आदळले आणि त्याच्याकडून शोषले गेले की त्या प्रकाशकिरणांची ऊर्जा त्या पदार्थाला मिळते. साहजिकच तो उत्तेजित होतो. त्याचा परिणाम मग त्या पदार्थाच्या त्यानंतरच्या वागणुकीत होतोच. या उत्तेजित अवस्थेचे दृष्य परिणाम मात्र वेगवेगळे होऊ शकतात. काही वेळा ही वाढीव ऊर्जा उष्णतेच्या रुपात आपलं अस्तित्व दाखवून देते. सूर्यप्रकाशात बराच वेळ एखादी वस्तू ठेवली गेली की ती तापते याचं कारण हेच आहे. आणि वस्तूच कशाला थंडीच्या दिवसात उन्हात म्हणजेच सूर्यप्रकाशात बसायला मन घेतं याचंही कारण हेच आहे, सूर्यप्रकाशाच्या झोतामुळे मिळणारी उब हवीहवीशी वाटते. पण उन्हाळ्याच्या वैशाखवणव्यात तो सूर्यप्रकाश होरपळून काढतो. याचं कारण त्या उन्हात येण्यापूर्वी असलेलं तापमान जसं आहे तसंच या दोन मोसमांमध्ये अंगावर पडणार्या किरणांची दिशा आणि त्यांची दीप्ती यामधल्या फरकातही आहे. तसा तो असला तरी प्रकाश किरण शोषून घेतल्यावर मिळालेली वाढीव ऊर्जा उष्णतेच्या रुपात प्रकट हो
ते हे वास्तव सर्वच काळात दिसून येतं. भारतासारख्या विषुववृत्तीय प्रदेशात पांढर्या रंगाच्या
कपड्यांना अधिक पसंती देण्यात येते. पण युरोपसारख्या तुलनेनं थंड हवामान असणार्या प्रदेशात काळ्या रंगाचे कपडे घालण्यावर भर देण्यात येतो तो यामुळेच.
चित्रसंदर्भः पांढर्या कपड्यातील भारतीय आणि काळ्या कपड्यांमधील युरोपीय
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply