नवीन लेखन...

दिवाळी ऑनबोर्ड

माझे पहिले जहाज ब्राझिलच्या किनारपट्टीवर आणि अमेझॉन नदीमध्ये असलेल्या पोर्ट मध्ये ये जा करायचे. ब्राझिलच्या सागरी हद्दीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाज थांबू शकत नसे कारण तसे केल्यास जहाजाला ब्राझिल मध्ये स्थानिक जहाज म्हणून रजिस्टर करावे लागले असते. तीन महिने पूर्ण व्हायच्या आत जहाज जर ब्राझिलच्या दक्षिण भागात असेल तर खाली उरुग्वे मध्ये जवळच्याच मॉन्टेविडियो या पोर्ट मध्ये थोडेसे इंधन भरण्यासाठी पाठवले जात असे. जर जहाज ब्राझिलच्या उत्तरेकडे असेल तर वर त्रिनिदाद बेटाजवळ पाठवले जाई. इंधन फक्त जहाज ब्राझिल च्या सागरी हद्दीबाहेर इंधन भरण्यासाठी जाऊन आले याचा एक लिखित पुरावा म्हणून घेतले जात असे. दर तीन महिन्यांनी जहाज एकतर उरुग्वे किंवा त्रिनिदाद कडे जाऊन येत असे. मी जॉईन करायच्या काही दिवस अगोदर जहाज मॉन्टेविडियो मध्ये जाऊन आले होते. सुमारे अडीच महिन्यांनंतर जहाज रिओ दि जानेरो वरून सँतोस पोर्ट मध्ये गेले तिथून मॉन्टेविडियो येथे इंधन भरून पेपर वर्क आटोपून पुन्हा दुसऱ्या दिवशी ब्राझिलच्या हद्दीत आले. जहाजावर त्यावेळेस व्हिस्की किंवा बीयर पिण्याला बंदी नव्हती त्यामुळे दहा पंधरा दिवसात जहाजावर काही ना काही निमित्त काढून पार्टी होत असे. जहाजाचा संपूर्ण क्रु आणि ऑफिसर्स पार्टी मध्ये भरपूर खाऊन पिऊन गाण्यांच्या ठेक्यावर रात्र रात्रभर नाचत असत. कधी ब्रीज विंग वर तर कधी स्मोक रूम मध्ये पार्टी रंगात येत असे. सुरवातीला विविध गेम्स वगैरे खेळून झाले की मोठ्या आवाजात गाणी लावले जात असत मग सगळे नाचायला सूरवात करत. सात वाजता सुरू होणाऱ्या पार्ट्या दोन तीन वाजेपर्यंत चालू राहायच्या. काही जण नऊ दहा वाजता कल्टी मारायचे तर काहीजण कल्टी मारलेल्याना केबिन मध्ये जाऊन पुन्हा जबरदस्तीने घेऊन येत असतं .

दर आठ दिवसांनी पोर्ट मध्ये बाहेर जायला शोर लिव आणि पार्ट्या यामुळे जहाजावर भराभर वेळ जात होता. ज्युनियर इंजिनियर असल्याने पहिल्यांदा जहाजावर कमीत कमी आठ ते नऊ महिने काढायला लागणार होते. सोमय्या कॉलेजला डिग्री करताना पाहिले वर्ष स्वतः च्या घरी न राहता एक वर्ष आणि प्री सी ट्रेनिंग सुरू असताना आणखीन एक वर्षभर घर सोडून राहिलो होतो पण प्रत्येक सणा सुदीला स्वतः च्या घरीच असायचो. पहिल्यांदाच जहाजावर आल्यापासून गणपती आणि दसऱ्याला घरी नव्हतो. त्यावेळेला व्हॉटसअप किंवा फेसबुक सुरू झाले नसल्याने आणि इंटरनेट किंवा मोबाइल आजच्या एवढे प्रगत नसल्याने घरच्यांशी आणि प्रियाशी फक्त सॅटेलाईट फोनवर बोलणे व्हायचे. त्या फोनवर बोलल्यानंतर आवाज पोचायला दोन ते तीन सेकंद लागायचे आणि ऐकताना सुध्दा तसेच व्हायचे सुरवातीला गोंधळ व्हायचा पण नंतर नंतर एक एक शब्द बोलुन आणि नंतर नंतर एक एक वाक्य बोलून पॉज घ्यायला लागत असे. अकरा वर्षांपूर्वी सेल्फी आणि फोटो काढण्याची तेव्हढी क्रेझ नव्हती. खरं म्हणजे तेव्हा फ्रंट कॅमेरा फेसबुक आणि व्हॉटसअप नसल्याने कोण किती आनंदात आहे किंवा सुखदुःखात आहे त्याची खबरबात कॉल केल्यावरच मिळत असे. हल्ली जसं रेस्टॉरंट मध्ये जेवायला चाललो, जेवायला बसलोय, रेडी टू इट आणि बिल देताना पर्यंत फोटो काढून पोस्ट केल्या जातात त्यामुळे कोण कुठे काय खातोय आणि काय करतोय ते एका क्लिक सरशी समजून येतं.

जहाजावर गणपती आणि दसरा हे सण आले कधी गेले कधी ते काही कळलंच नाही. पण उरुग्वे ला जाऊन आल्यापासून जहाजाला ब्राझिल मध्ये पुन्हा तीन महिने होत आले होते. यावेळेस जहाज अमेझॉन नदीमधून बाहेर पडले असल्याने जहाज त्रिनिदाद बेटांकडे वळवण्यात आले. ज्या दिवशी जहाज त्रिनिदाद बेटा जवळ जाऊन पोचले त्या दिवशी दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. जहाजावर ख्रिश्चन कुक जाऊन महिना भरपूर्वी एक मुस्लिम कूक आला होता त्याने त्याच्या परीने दिवाळीसाठी खीर आणि गुलाबजाम बनवले होते. जहाजाला इंधन सप्लाय करण्यासाठी आलेल्या बार्ज मध्ये दोन तीन जण भारतीय वंशाचे त्रिनिदाद बेटावर स्थायिक झालेले खलाशी होते. त्यांनी त्यांच्या घरून जिलेबी, बर्फी आणि लाडू आणले होते. देशा पासून लांब राहून एक दोन पिढ्या बदलल्या तरी हिंदू धर्म आणि संस्कार टिकवून असलेली भारतीय वंशाची लोकं आणि त्यांचा भारतीय सणांबद्दल असलेला उत्साह आणि उदारपणा पाहून भारवल्यासारखे झाले. त्यांनी जहाजावर पाठवलेली मिठाई रात्री जेवणाच्या वेळी मोठं मोठ्या प्लेट्स मध्ये सजवण्यात आली. पिवळी आणि नारंगी जिलेबी सात महिन्यानंतर बघायला मिळत होती. तसे जहाजावर जॉईन करणारे येताना सोबत काजू कतली किंवा बर्फी वगैरे घेऊन येतच असतात पण जिलेबी आणि लाडू सहसा कधी बघायला मिळत नाहीत. सगळ्यांनी बार्ज वर असलेल्या भारतीय वंशाच्या खलाशांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अंधार पडायला लागल्यावर त्रिनिदाद च्या किनाऱ्यावर फटाक्यांची आतिषबाजी सुध्दा बघायला मिळाली. दिवाळीत मामाकडे भाऊबीजेला मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावरून रात्री मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया आणि कुलाबा परिसरातून होणाऱ्या आतिषबाजीची आठवण झाली.
दिवाळी असताना आणखीन एका जहाजावर युरोप मध्ये कूक ने दिवाळी साठी काही केले नाही म्हणून इलेक्ट्रिक ऑफिसर ने कॅप्टन ची परवानगी मागून स्वतः बुंदी बनवली आणि त्यापासून लाडू बनवायला सूरवात केली मग कुकला पण शरम वाटून त्याने लाडू वळून दिले आणि सगळ्यांसाठी खीर सुध्दा बनवली. जहाजावर नोकरी करत असताना कधी दिवाळी मिळते तर कधी जहाजावर काम करण्यात घालवावी लागते. गणपती नाही तर दिवाळी आणि दिवाळी नंतर येणारे साखरपुडा आणि लग्नाचे कार्यक्रम यापैकी प्रत्येक वर्षी कशावर ना कशावर पाणी सोडावे लागते. जवळच्या नात्यातले साखरपुडे आणि लग्न आपल्या सोयीप्रमाणे पुढे मागे करता येतात पण सण मात्र त्यांच्या तिथीप्रमाणे साजरे होत असल्याने ते मात्र कंपनीच्या सोयीप्रमाणे अनुभवायला मिळतात.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..