एतीहाद एयर वेज चे मुंबई अबू धाबी आणि अबू धाबी ते पॅरिस असे फ्लाईट होते. पुढे पॅरिस हून मार्सेली नावाच्या छोट्याशा विमानतळावर एयर फ्रान्स चे अर्ध्या तासाचे फ्लाईट होते. मार्सेली एअरपोर्ट वरून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केल्यावर फ्रान्सच्या लवेरा या पोर्ट मध्ये जहाजावर जॉईन केले. जॉईन केल्या केल्या जहाज ब्लॅक सी च्या दिशेने निघाले. रात्री नऊ वाजता जहाज पोर्टच्या बाहेर खोल समुद्रात गेल्यावर फुल्ल अहेड ची इंजिन साठी ब्रिजवरून कमांड दिली गेली. हळू हळू इंजिनचे आर पी एम वाढवत मॅक्सीमम वर नेण्यात आले. जहाजाने चांगलाच वेग पकडला होता. ब्रीज वरून थर्ड मेट ने रनिंग फुल्ल अहेड म्हणजे आमच्या भाषेत RFA ची वेळ दिली. ती वेळ टाकल्यानंतर डिपार्चर चेकलिस्ट वर माझी सही करून चीफ इंजिनियर ची सही घेऊन चेकलिस्ट चा कागद फाईल ला लावून टाकला. चीफ इंजिनियर वर जाताना सांगून गेला पटकन राऊंड मार आणि इंजिन रूम अनमॅन्ड कर. आता बारी होती अनमॅन्ड मशिनरी स्पेस म्हणजे UMS चेकलिस्ट भरायची. पाच पांनाची चेकलिस्ट भरायलाच पंधरा ते वीस मिनिटे लागतात. इंजिन रूम मध्ये कंट्रोल रूम सह आणखीन स्टियरींग रूम, प्युरिफायर रूम अशा रूम्स असतात आग लागली की या रूमचे दरवाजे बंद असल्याने ती आग बाहेर पडत नाही. स्मोक आणि फायर डिटेक्टर असल्याने कुठे आग लागली तो झोन किंवा रूम लगेच ब्रिजवर लक्षात येतं. अशा सर्व रूम चे व्हेंटिलेशन आणि एग्झाॅस्ट फॅन सुरू आहेत का, तापमान किंवा गर्मी किती आहे, कुठे काही ऑईल किंवा पाण्याचा लीक आहे का हे सगळं बघायचे असते. जनरेटर आणि मेन इंजिन तसेच बॉयलर साठी कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे इंधन वापरले जाते त्यांच्यासाठी रोज वापरासाठी असणाऱ्या टक्यांमध्ये पुरेसे इंधन भरलेले आहे का त्याचे तापमान योग्य आहे का फ्युएल पंप मधून निघणाऱ्या इंधनाचे प्रेशर योग्य आहे का, कुलिंग वॉटर चे तापमान आणि प्रेशर, अशा एक ना अनेक गोष्टी तपासायच्या असतात.
रात्री अलार्म आल्यानंतर तो रिसेट करायला त्या रात्रीचा ड्युटी इंजिनिअर एकटा इंजिन रूम मध्ये येतो. अलार्म सोबत एक टायमर सुध्दा अॅक्टिव्हेट होतो ज्याला डेड मॅन अलार्म म्हणतात एकटा इंजिनियर काम करत असताना त्याने प्रत्येक दहा मिनिटांनी हा अलार्म इंजिन रूम मध्ये असलेला एक स्वीच दाबून रिसेट करायचा असतो प्रत्येक मजल्यावर हा स्विच दिलेला असतो. जर इंजिनियर काम करत असताना काही अपघात झाला आणि त्याला डेड मॅन अलार्म रिसेट करता आला नाही तर हा अलार्म ब्रिजवर वाजतो आणि त्यानुसार ब्रिजवर असलेला ड्युटी ऑफिसर सगळ्यांना याबाबत माहिती देतो. मग ड्युटी इंजिनियर व्यवस्थित आहे की त्याला काही अपघात झालाय का हे बघायला बाकीचे इंजिनिअर येऊन खात्री करून घेतात. इंजिन रूम मधील अलार्म पण तसेच असतात फोर्थ ,थर्ड ,सेकंड आणि चीफ इंजिनियर या प्रत्येकांच्या केबिन मध्ये अलार्म पॅनल असते. फोर्थ ,थर्ड आणि सेकंड या तिघांना प्रत्येकी एक दिवसाआड नाईट ड्युटी असते ज्याची नाईट असेल फक्त त्याच्याच केबिन मध्ये सुरवातीला तीन मिनिटे इंजिन रूम मधील अलार्म वाजतो जर त्याने तीन मिनिटात अलार्म रिसिव्ह केला नाही तर चीफ इंजिनियर सह इतर सर्व इंजिनियर च्या केबिन मध्ये अलार्म वाजतो. कधी कधी ड्युटी इंजिनिअर गाढ झोपलेला असतो किंवा केबिन मध्ये नसतो अशा वेळी आॅल इंजिनियर्स अलार्म बहुतेकदा होत असतो. इंजिनियर्स च्या केबिन सह मेस रूम, स्मोक रूम, जिम रूम ,ब्रीज अशा प्रत्येक ठिकाणी UMS अलार्म पॅनल असतो आणि त्याचा आवाज सुध्दा इतका मोठा असतो की कोणी कितीही गाढ झोपलेला असला तरी खाडकन जागा होतो आणि तीन मिनिटांचे आतच अलार्म रिसिव्ह करायला इंजिन कंट्रोल रूम मध्ये पोचलेला असतो.
जहाजावर अपघात किंवा कोणाला इजा होऊ नये यासाठी तसेच इंजिन व मशिनरी साठी वॉर्निंग अलार्म आणि सेफ्टी असतात तसेच प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतलेली असते. या सर्व सेफ्टी सिस्टीम व्यवस्था सुरू आहेत की नाही योग्य वेळी काम करतील की नाही यासाठी त्यांची वेळोवेळी तपासणी व देखभाल केली जाते. तसेच सगळे अधिकारी मिळून प्रत्येक कामाचे नियोजन व आखणी करून मगच कामाला सुरवात करतात.
चेकलिस्ट या खरं म्हणजे एखाद्या मशिनरी किंवा इंजिन संदर्भात तसेच जहाजावर सुरू असलेल्या विविध कामांमध्ये काही गडबड होऊ नये यासाठी बनवलेल्या असतात, त्यांच्या मध्ये सिक्वेन्स मध्ये कोण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि त्या केल्या की नाहीत याची खात्री करून जो कोणी ड्युटी इंजिनिअर किंवा ऑफिसर असेल त्याची सही असते. अपघात किंवा काही गडबड झाल्यास सही करणारा जबाबदार धरला जात असल्याने अशा या चेकलीस्ट व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने प्रत्येकजण वेळोवेळी भरत असतो.
जहाजावर कोणतेही काम करण्यासाठी परमिट बनवावे लागतात. उंचावर काम करायचे असेल तर वर्कींग अलॉफ्ट परमिट म्हणजे सेफ्टी बेल्ट किंवा सेफ्टी हरनेस जो पट्टा संपूर्ण अंगाभोवती असतो आणि उंचावर चढल्यावर त्याला असणारी दोरीचा हूक एखाद्या भक्कम आधाराला अडकवला जातो जेणेकरून काम करणाऱ्याचा तोल गेला तरी तो खाली न पडता या पट्ट्याला लोंब कळून राहतो. जहाजावर काम करताना दहा फुटांवरून कोणी खाली पडला की एकतर कायमचा लुळा पांगळा तरी होतो किंवा कपाळ मोक्ष होऊन मृत्यू सुध्दा पावतो.
एखाद्या बंद असलेल्या टाकीत काम करायचे असेल तर एनक्लोज्ड स्पेस परमिट बनवावे लागते. एखाद्या टाकीमध्ये विषारी वायू असतात किंवा ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे हे विषारी वायू बाहेर काढून त्यात पुरेसा ऑक्सिजन आहे की नाही हे तपासले जाते तसेच त्या टाकीत काम करायला जाणाऱ्या वर लक्ष ठेवायला एक व्यक्ती ,आत पुरेसा प्रकाश ,संपर्क करण्यासाठी वॉकी टॉकी, वेळोवेळी पुरेसा ऑक्सिजन आहे की नाही इतर विषारी वायू तर नाहीत ना व त्यांचे प्रमाण दर्शविणारे गॅस मीटर अशी उपकरणे दिली जातात.
जहाजावर इलेक्ट्रिक शॉक लागून खूप अपघात होतात ज्यामध्ये एकतर खूप गंभीर इजा किंवा मृत्यू हा ठरलेलाच असतो. कोणत्याही इलेक्ट्रिक मोटर किंवा उपकरणांवर काम करण्यापूर्वी इलेक्ट्रिक परमिट बनवले जाते. जहाजावर इलेक्ट्रिक ऑफिसर ला बत्ती साब बोलतात. बत्ती साब हा जहाजावरील सगळ्यात महत्वाचा अधिकारी असतो. कोणतेही इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक बिघाड झाला की बत्ती साब तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर काम करताना इलेक्ट्रिक परमिट बनवणे गरजेचे असते ज्यामध्ये एखाद्या उपकरणाचा मेन पावर सप्लाय बंद केला जातो तसेच कोणी चालू करू नये म्हणून तिथे लॉक लावून सूचना केली जाते.
प्रत्येक परमिट साठी काम सुरू करायची वेळ तसेच मध्ये मध्ये ऑक्सिजन किंवा विषारी वायू आहेत की नाहीत हे तपासणे आणि त्यांच्या नोंदी करणे. काम सुरू करण्यापूर्वी केलेल्या तपासण्या त्या तपासण्या योग्य आहेत की नाहीत याची वरिष्ठांकडून खात्री केली जाते. काम करणाऱ्या व्यक्तींच्या सह्या, त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तींच्या सह्या जबाबदार अधिकारी व इंजिनीयर अशा सर्वांच्या सह्या झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. काम पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा सगळ्यांच्या सह्या तसेच काम पूर्ण झाल्यावर त्या कामानंतर सगळं पूर्वीसारखं स्थिर स्थावर व चालू केले की नाही याची खात्री करून परमिट काम पूर्ण झाले म्हणून बंद करण्यात येते.
जहाजावर काम करणाऱ्या प्रत्येकाला जीव धोक्यात घालून काम करावे लागते. विषारी वायू, कमी ऑक्सिजन, सव्वाशे अंश सेल्सिअस तापमान असलेले इंधन, तीनशे ते साडे तीनशे अंश सेल्सिअस तापमान असणारे इंजिन मधून बाहेर पडणारे उष्ण गॅसेस व वाफ तसेच ऑटोमॅटिकली सुरू होणाऱ्या मशिनरी या सगळ्यांच्या संपर्कात अपघात झाल्यास कोणतीही वैद्यकीय मदत मिळू शकणार नाही अशी परिस्थिती जहाजावर असते. खोल समुद्रात कोणाचा मृत्यू जरी झाला तरी जहाज मग चार, आठ किंवा पंधरा दिवसात जो पर्यंत पोर्ट मध्ये येत नाही तोपर्यंत त्याचे प्रेत जहाजावर असलेल्या मिट किंवा फिश रूम मध्ये ठेवायची वेळ येते. प्रत्येक जवाबदार अधिकाऱ्याने किंवा काम करणाऱ्या खलाशाने जर तंतोतंत या चेकलिस्ट आणि परमिट चे पालन केले तर जवळपास शून्य अपघात बघायला मिळतील. परंतु दरवर्षी लहान मोठ्या जहाजावर हजारो लोक छोट्या मोठ्या अपघातांमध्ये एकतर कायमचे अपंग तरी होतात नाहीतर जीव तरी गमावून बसतात. बऱ्याच वेळा तर एखाद्याला वाचवायला जातात आणि एका सह दोघे तिघे जण बळी जातात.
रोज रोज छोट्या मोठ्या कामासाठी बनवल्या जाणाऱ्या चेकलिस्ट व परमिट यामुळे रंगवले जाणारे कागद आणि भरणाऱ्या फाईल वाढत असल्या तरी होणाऱ्या अपघातांना बऱ्याच वेळा मानवी चुका, काम करणाऱ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स, अधिकाऱ्यांचा हेकेखोरपणा हे कारणीभूत असतात तसेच काम लवकर संपवण्याची घाई किंवा वर्क प्रेशर या सर्वांमुळे येणारा ताण यामुळे होणारे अपघात काही केल्या कमी होत नाहीत.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B.E.(mech),DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply