गेल्या वेळेला बायकोनी जिथुन डाळीच्या पिठाचा डबा काढुन द्यायला सांगितला होता तिथुनच मी डबा काढला आणि गँस स्टोव्हच्या उजव्या बाजुला ठेवला. स्टोव्ह पेटवण्यासाठी घड्याळात बघुन मनात अँटी क्लाँक फिरवण्यासाठी नाँब कशी फिरवाची हे पक्क केल आणि उजव्या हातातल्या लायटरनी तीन चारदा फटाक फटाक केल पण मंद बुध्दी लायटर काही केल्या पेटेना. गँसचा वास घरभर पसरला. मी पुन्हा घड्याळ बघुन नॉब क्लॉकवॉइज फिरवला आणि देव्हार्यातुन काडेपेटी मिळवली आणि नॉब अँटी क्लाँक फिरवुन काडी पेटवताच तिच्या चिथावणीनी गँसही पेटुन उठला.
पीठ गाळण्यासाठी ट्रॉलीतुन गाळणं काढाव का चाळण या संभ्रमात पडलो. संजीव कपुरचा फोन लागला नाही म्हणुन गाळणं का चाळण या निर्णयासाठी मीच छाप का काटाकरुन चाळणीच्या बाजुनी कौल मिळवला. एकही भोक न बुजलेली मध्यमहुन बारीक भोकाची चाळण शोधुन दोघांना पुरेल इतपत झुणका होइल एवढ पीठ गाळुन काढल आणि पिठाचा डबा जागेवर टाकला. मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करायचे होते पण सुरी मिळे ना! शेवटी समोर कोयता दिसला त्यानीच पहिल्यांदा सगळ्या मिरच्यांची देठ छाटली आणि मग शिवणाच्या दुधारी कात्रीनीच मिरच्यांचे बारीक एकसारखे तुकडे केले. लगे हात त्याच कात्रीनी कोथिंबीरही सपासप कापुन काढली. चिरलेला कांदा आणि सोललेल्या लसणीच्या पाकळ्या फ्रिजमधे रेडी पझेशन मिळाल्याने कोयता आणि कात्री दोन्ही घातक शस्त्र मी लगेच चार हात लांब केली.
आल्याला वज्रमुठीच्या एकाच तडाख्यानी मुर्छित करुन छिन्नविछ्न्न केले. मोहरी ओळखण आवघड नव्हत पण जीर आणि ओव्यातला फरक कळण टफ गेल. शेवटी खाउन फरक ठरवला आणि मुठभर जीर बर्णीतुन एका प्लेटवर डौनलोड केल. झुणक्याची वातावरण निर्मिती बरीचशी पूर्ण झाली.
तवा गरम करून त्यात तेल टाकण्यापूर्वी तव्यावर बोटानी “श्री” लिहिल. तेल गरम झाल्याच दिसताच चिरलेला कांदा त्यात सोडला आणि बायकोच्या फेंट गुलाबी लिपस्टिक सारखा थोडा तांबूस दिसायला लागल्यावर त्याला कंपनी म्हणुन त्यात लसूणीच्या पाकळ्या, जीरे आणि मुर्छितावस्थेतील आले या सर्वांची पेस्ट ढकलली. तव्यावर दाटीवाटीनी रमलेल्या ह्या मिश्रणाला मिरच्यांचे तुकडे टाकुन मी मधे मधे डिवचत राह्यलो.
पाणी घालुन तयार ठेवलेले सेमी सॉलिड कंडिशनमधले द्रावण मी त्यात घातले आणि पहाता पहाता कांदामिश्रित आधीचे मिश्रण आणि अत्ताच टाकलेला द्रव माझ्या मध्यस्थीने एकरुप झालेले पाहुन मीच कृतकृत्य पावलो. जणुकाही त्या आनंदाप्रित्यर्थच तयार ठेवलेली कोथिंबीर आणि दोन-चार चिमटी गरम मसाला घालून त्यांची आवश्यक तेवढी घट्ट मैत्री होई पर्यंत मी ठिबकसिंचन चालु ठेवाले.
बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली.
बायकोनी पहिला घास तोंडात घेताच मला फैलावर घेतला. पीठाच्या डब्याची पोझीशन चेंज झाल्यामुळे माझ्या हाती भलतच पीठ लागल होत. झुणका तव्यावर तसाच विसावाला होता आणि माझी अवस्था मात्र बायकोनी ” तव्यावर झुणका अन् मणक्यावर दणका” अशी करुन सोडली होती.
तरी मला वाटतच होत माझा झुणका शेवटपर्यत पिवळसर का नाही झाला!!
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply