पतिनिधनानंतर प्रकाशला वाढवण्यासाठी घेतलेल्या खस्ताचे आज त्यांना काहीच वाटत नव्हते.आयुष्याचा सगळा चित्रपटच त्यांच्या नजरेसमोर तरळत होता.सासू – सास-यांचा आधार तर नव-याच्या आधीच सुटला होता. नातेवाईक फक्त इस्टेटीवर डोळा ठेऊन होते. त्यावेळी त्या जर खंबीरपणे उभ्या राहिल्या नसत्या तर आज त्यांना नातेवाईकांनी नक्कीच देशोधडीला लावले असते. तरूण वयात नवरा जाउनदेखील परत लग्नाचा विचारदेखील मनात शिरु दिला नव्हता. सारे आयुष्य प्रकाशच्या भोवती गुंफुन टाकले.आपल्या वैयक्तिक आशा-आकांक्षा सगळ्या प्रकाशमय करुन टाकल्या. पुण्यात डेक्कनसारख्या ठिकाणी असलेला सास-यांनी बांधलेला बंगला असल्याने निदान राहत्या घराचा तरी प्रश्न नव्हता. पण नव-याची थोडीफार जी पुंजी होती ती पहिल्या काही वर्षातच संपुष्टात आली. तरुणवयातच नोकरीसाठी बाहेर पडावे लागले. लोकांच्या विखारी नजरा मन करपवून टाकत होत्या पण त्यावेळी त्यांच्या नज
ेसमोर एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे प्रकाशला शिकवून मोठा करणे. त्यासाठी त्यांना स्वतःच्या कष्टाचे काहीच वाटत नव्हते. प्रकाश इंजिनीयर झाल्यावर त्यांनी एक जबाबदारी नीट पार पडल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर दिसत होते. पण प्रकाशने पुढे शिकण्यासाठी अमेरीकेला जाण्याचा हट्ट
धरला आणि सिंधूताईंनी पुन्हा कंबर कसली. आपल्या नावावर बॅंकेकडून कर्ज उचलले आणि प्रकाशला शिक्षणासाठी पाठवले. आज दहा वर्षे उलटून गेली. सुरवाती सुरवातीला अधून-मधून प्रकाश पत्र पाठवून आपली खुशाली कळवत असे. सिंधूताई त्या पत्राला उराशी कवटाळून मुलाच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करीत पुढच्या पत्राकडे डोळे लावून बसत. एक दिवस अचानक एका पत्राने त्यांच्यावर बॉम्ब टाकला. प्रकाशने अमेरीकेतच सेटल असलेल्या एका गुजराथी मुलीबरोबर लग्न केले होते. आपल्याला साधे विचारातसुध्दा न घेता प्रकाशने लग्न केल्याचा त्यांना मोठा मानसिक धक्का लागला पण आठवड्याभरातच त्यांनी स्वतःला सावरले. प्रकाश सुखी आहे ना मग झाले तर, असे म्हणून त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली. हळूहळू पत्रे यायची पण बंद झाली. आईचे काळीज पोराची खुशाली कळावी म्हणून जळाविना माशासारखे तडफडे. लेकाची अतिच आठवण आली तर बाहेरून फोन करीत. नंतर नंतर तर त्यांचा फोन आला किप्रकाशची बायको तुटकपणे प्रकाश घरात नाही सांगून फोन फटकन ठेवून देई. त्या धाडकन फोन ठेवल्याच्या आवाजाने त्यांच्या काळजाचे तुकडे तुकडे होत. डोळ्याचे पाणी थांबता थांबत नसे. पण परवा अचानक प्रकाशचे पत्र आले कि तो येतो आहे आणि अगदी महिनाभर रहाणार होता.सिंधूताईंना आभाळ ठेंगणे झाले. अगदी काय करू नि काय नको असे त्यांना होउन गेले होते. आल्या दिवसापासून कोणता स्वयंपाक करायचा ते त्यांनी ठरवून टाकले. प्रकाशच्या सर्व आवडीनिवडी त्यांच्या तोंडपाठ होत्या. गेले तीन दिवस सिंधूताई
चा डोळ्याला डोळा लागला नव्हता. बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आणि या वयातसुध्दा सिंधूताई दाराकडे पळत गेल्या. प्रकाशने घरात प्रवेश केला आणि आल्या आल्या खाली वाकून आईला नमस्कार केला. पाठोपाठ प्रकाशच्या बायकोने प्रवेश केला. तिच्या कडेवर दोन वर्षाचे बाळ होते. प्रकाशच्या बायकोनेसुध्दा आल्याबरोबर वाकुन नमस्कार केला. सिंधुताईंचे डोळे भरून आले. त्यांनी पटकन पुढे होत बाळाला उराशी धरले. जणू मागची कटु दहा वर्षे जीवनात आलीच नाही असे त्यांना वाटत होते. आता मागचे काही आठवायचे नाही हे त्यांनी मनाशी ठरवून टाकले. प्रकाश म्हणाला,
आई, ही तुझी सून धारा आणि हा नातू अमेय.
आई, तू आता थकलीस. आता तू एकटीने राहणे मला योग्य वाटत नाही.
अरे, पण आता या वयाला मी कोठे जाऊन राहणार. आयुष्यभर कोणाची मिंधी झाली नाही.आता म्हातारपणी कोणाचे उपकार कशाला घ्यायचे.
अग, तुझा मुलगा एवढा खंबीर असताना दुस-या कोणाचे उपकार कशाला पाहिजेत. मी म्हणत होतो कि तू आता माझ्या बरोबरच चल.
पण या घराचे काय करणार. आज या घराची किंमत काही कोटीत झाली असेल. आपण सगळेच जर निघून गेलो तर याची पार वाट लागेल.
हे घर ठेवायचेच कशाला. सरळ विकून टाकायचे आणि जायचे. तसेही आता भारतात कोण येणार आहे.
असे कसे बोलवते रे तुला. माझ्या सास-यांनी बाधलेले घर आहे. तुझे बालपण इथेच गेले. माझ्या सगळ्या आठवणी या घराशी जोडल्या गेल्या आहेत. हे घर विकायचे म्हणजे त्या सर्व आठवणींना बाजारात विकण्यासारखे आहे.
अग, मला काहीच वाटत नाही असे वाटते
का तुला. पण मी इतकी चांगली नोकरी सोडून परत येऊ शकणार नाही आणि तू
नाही आलीस तर तुझ्या नातवाला आजी कशी मिळणार.
पण इतक्या थोड्या दिवसात सगळा व्यवहार कसा होणार.
त्याची चिंता नको, धाराच्या वडलांच्या ओळखीचे मेहता नावाचे एक बिल्डर आहेत. ते चांगली किंमतपण द्यायला तयार आहेत. माझे सगळे बोलणे झाले आहे.
तुला योग्य वाटेल ते कर. पण जपून कर बाबा.
इतके वर्षांनी मुलगा आला पण आईला बरोबर घेऊन जातो आहे हं. असे लोकांचे उद्गार ऐकले कि त्यांना अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटत होते. प्रकाशने घराचा सारा व्यवहार चोखपणे पार पाडला. सिंधूताईंना भरून आले आणि ते साहजिकही होते. संपूर्ण आयुष्य या घरात गेले होते. आता आपला देश आपली माणसे सोडून दूर परक्या देशी उर्वरित आयुष्य काढायचे. पण त्यातही एक समाधान होते. आपल्या मुलाबरोबर, नातवाबरोबर रहाण्याचा आनंद होता. आपला संसार अर्धवट राहिला पण आता मुलाचा भरला संसार बघत पूर्णत्वाला न्यायचा.
आई, मी जरा या दोघांना घेऊन बाकी फॉरमॅलिटीज पु-या करतो. तुझ्याच्याने एवढी दगदग होणार नाही.
आजी, कोणासाठी थांबलायत
माझा लेक आत चेकिंगसाठी गेलाय. तो आला कि मग आम्ही अमेरीकेला जाणार आहोत.
अरे यांचा मुलगा तर मघासच्या फ्लाईटने गेला. त्याच्याबरोबर एक छोटे बाळ आणि एक बाईपण होत्या.
— राजेंद्र भालचंद्र देशपांडे
Leave a Reply