समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं !
दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !!
कृपाकरं क्षमाकरं
मुदाकरं यशस्करं !
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!!
समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात.
निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य.
भगवान श्रीगणेश आणि आपल्या विविध अवतारात देवांतक- नरांतक, सिंधू, सिंदुर, कमलासुर इ. अनेक राक्षसांचा निःपात केला. त्यामुळे त्यांना निरस्तदैत्यकुञ्जर असे म्हणतात.
दरेतरोदर- दर शब्दाचा अर्थ आहे घट्ट. मजबूत. परिदृढ. त्याचा इतर म्हणजे विपरीत अर्थात लवचिक, परिवर्तनीय ते दरेतर. असे ज्यांचे उदर अर्थात पोट ते दरेतरोदर.
भगवान श्री गणेशांना लंबोदर असे म्हणतात. त्यांच्या उदराततून ही अनंत कोटीब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि शेवटी त्यातच लय पावतात. त्यामुळे त्यांना लंबोदर म्हणतात. भगवान गणेश असे लंबोदर असल्याने त्यांचे उदर सगळ्यांना सामावून घेणारे लवचिक आहे म्हणून ते दरेतरोदर.
वर म्हणजे सर्वश्रेष्ठ.
वरेभवक्त्रमक्षर- वर म्हणजे श्रेष्ठ. इभ म्हणजे गज अर्थात निर्गुण निराकार. असे निर्गुण-निराकार तत्व आहे ॐ कार ब्रह्म. त्याला अक्षर असे म्हणतात. तेच ज्यांचे वक्त्र अर्थात मुख ते वरेभवक्त्रमक्षर.
मुख ही आपली ओळख आहे. चेहऱ्यावरूनच आपण एकमेकांना ओळखतो. निर्गुण, निराकार ॐ कार हीच मोरया ची ओळख म्हणून मोरया,वरेभवक्त्रमक्षर.
कृपाकर अर्थात भक्तांच्या जीवनात कृपेचा अखंड वर्षाव करणारे.
क्षमाकर अर्थात प्रार्थना करणाऱ्या, क्षमा याचना करणाऱ्या भक्तांच्या चुकांना माफ करणारे.
मुदाकर अर्थात भक्तांच्या जीवनात सर्वोत्तम आनंद निर्माण करणारे.
यशस्कर- अर्थात उपासकांना त्यांच्या मन इच्छित कार्यात यश प्रदान करणारे.
नमस्कृतां मनस्कर- अर्थात धर्म संमत रीतीने वागणाऱ्यांच्या, श्री गणेश चरणावर नत असणाऱ्या सर्व भक्तांच्या मनात येणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे.
अशा भास्वर अर्थात परम तेजस्वी भगवान गणेशांना मी नमस्कार करतो.
— — प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply