स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं !कृपाकोमलोदार लीलावतारं !!
कलाबिंदुगं गीयते योगिवर्यै-
र्गणाधीशमीशानसूनुं तमीडे !! ६!!
स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितार- अक्ष म्हणजे डोळा. त्यातील तार म्हणजे आतले बुबुळ. ते पिङ्ग अर्थात भुरकट लाल, तांबडे झाले आहेत असे. आलोल अर्थात चंचल. थरथरणारे.
स्फुरत् शब्दातही तोच भाव आहे. जणू ती थरथर दुप्पट दाखवण्यासाठी.
डोळे लालहोऊन थरथर केव्हा करतात? तर राग आल्यावर. संताप आल्यावर.
ही पहिली ओळ दुष्टांसाठी आहे. त्यांना पाहिल्यावर त्यांचे डोळे लाल होतात आणि थरथरतात असे ते स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितार.
दुसरी ओळ मात्र सज्जनांसाठी आहे. भक्तांसाठी आहे.
कृपाकोमलोदारलीलावतार- त्या भक्तांवर कृपा करतांना, दृष्टी अत्यंत कोमल ठेवणारे, त्या भक्तांच्या करिता उदार अशा लीला करणारे ते कृपाकोमलोदारलीलावतार.
कलाबिंदुग – हा शब्द व्यवस्थित समजून घ्यायला हवा. यात कला म्हणजे चंद्रकोर. बिंदू अर्थात अनुस्वार. या दोन्हींनी युक्त असा ग म्हणजे कलाबिंदुग.
अर्थात भगवान गणेशांचा एकाक्षरी महामंत्र. पण तो सरळ न सांगताना असा कला, बिंदू युक्त ग असा सांगितला. कारण मंत्र असा केव्हाही, कोणीही, कुठेही उच्चारायचा नसतो. मंत्र श्री गुरूंनी शिष्याला देण्याचा विषय आहे.
मंत्र हा शब्द देखील मोठा सुंदर आहे. ‘मननात् त्रायते!’ अर्थात चिंतन-मनन केल्याने साधकांना तारून नेणारा तो मंत्र. कशाचे चिंतन-मनन? तर गणेशांच्या एकाक्षरी मंत्राचे. कसे करायचे? तर एक मार्ग असा आहे की ओंकार आणि गणेश एकाक्षरी मंत्र हे दोन्ही समान आहेत. या दोन्हींच्या उच्चारांची मिळणारी स्पंदने समान आहेत. म्हणजे एकाक्षरी मंत्र आणि ओंकार एकच आहेत. म्हणजेच भगवान गणेश आणि ओंकार एकच आहेत. देवा तूंचि गणेशु ! अशा स्वरूपात श्री ज्ञानेश्वर महाराज हे एकत्व सांगतात.
असे श्री मोरया चे ओंकार ब्रह्मत्व कथन करणारा हा मंत्र.
अशा त्या मंत्राच्या द्वारे योगी लोक त्या भगवान गणेशांच्या वैभवाचे गायन करतात. अर्थात अत्यंत आनंदाने त्या मोरयाला आळवत राहतात.
विविध अवतारांच्या रूपात शिवपुत्र झालेल्या त्या श्री गणेशांची मी वंदना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply