नवीन लेखन...

संगीत, अभिनय, काव्य व इतर अवांतर ! (नशायात्रा – भाग २४)

(कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा मागोवा या सदरात घेतलेला आहे..)


तसे आमच्या घरी संगीताची आवड सुरवातीपासून आहे , माझे आजोबा सयाजीराव महाराजांच्याद दरबारी नोकरी करत असत , तसेच ते कीर्तनकारही होते , माझ्या वडिलांना देखील संगीताची आवड होती त्यांचे थोडेसे संगीत शिक्षण देखील झाले होते व राजकोटच्या रेडीओ केंद्रावर त्यांनी तरुणपणी गायन देखील केले होते , मलाही लहानपणापासून संगीत आवडत असे , सकाळी शाळा असताना आई रेडीओ लावून मग आम्हाला उठवत असे त्यावर छान गीते लागत , संत तुकाराम , संत एकनाथ , संत् कबीर यांचे अभंग , भीमसेन जोशी , प्रल्हाद शिंदे , लता मंगेशकर , आशा भोसले यांनी गाईलेली भक्ती गीते , भावगीते , विरहगीते मी ऐकत् असे अनेकदा अर्थ कळला नाही तरी ऐकायला आवडे . नाशिक रोड येथे आमच्या माहितीत एकच संगीत क्लास होता , त्याचे नाव ‘ श्रद्धा ‘ संगीत विद्यालय . कुलकर्णी म्हणून कोणी मँडम हा क्लास चालवत असत बिटको टाँकीजच्या शेजारी हा क्लास त्यांच्या राहत्या घरीच चालत असे .

मला आणि माझ्या मोठ्या भावाला दोघानाही संगीत शिकवले पाहिजे अशी वडिलांची इच्छा होती पण दोघांना एकाच वेळी संगीत क्लास मघ्ये घालणे त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नव्हते , म्हणून मोठा भाऊ बहुधा आठवीत असताना त्याला त्यांनी संगीताचा क्लास लावला , मी त्या वेळी पाचवीत होतो मला नंतर क्लास लावणार होते . त्या क्लासचा भावाचा अनुभव काही ठीक नव्हता , अनेकदा सुट्या देत , किवा कुलकर्णी बाई घरकाम सांभाळून क्लास घेत असल्याने पुरेसा वेळ देत नसत म्हणून भावाने पण लवकरच क्लास सोडला मग माझे संगीत शिकणे राहूनच गेले व नंतर जेव्हा क्लास लावू शकत होतो तेव्हा भलत्याच गोष्टीत अडकलो होतो .तरी रेडिओ वर एकून माझी बरीच गाणी पाठ झालेली होती व मी ती गाणी हुबेहूब म्हणण्याचा प्रयत्न देखील करीत असे , माझा आवाज चांगला आहे असे मित्र आणि नातलग म्हणत त्यामुळे कोण्या नातलगांकडे गेलो , काही कौटुंबिक कार्यक्रम असला , शाळेचे स्नेह संमेलन वगैरे ठिकाणी मी मला येत असलेली गाणी म्हणत असे व माझे कौतुक देखील होई , मोठा होऊ लागलो तशी हिंदी गाणी देखील पाठ होत गेली .

गांजाचे व इतर व्यसने लागल्यावर आम्ही मित्र दुर्गाबागेत तासंतास बसून गाणी म्हणत असू , गांजा प्यायल्यावर आवाज अधिक मोकळा होतो असा माझा अनुभव आहे , मी किशोर कुमार , मोहम्मद रफी , मुकेश , . मन्नाडे , सुधीर फडके , वगैरेंची गाणी आरामात म्हणत असे व माझा आवाज देखील तेव्हढा उंच जाई , असफल प्रेम प्रकरणा नंतर तर हिंदी मराठी विरह गीते मला जास्तच आवडू लागली होती , मी जेव्हा केव्हा अंगणातल्या संडासात गांजा किवा गर्द अथवा दारू प्यायला जाऊन बसत असे तेव्हा कोणाचे लक्ष नाही असे पाहून मी हळू हळू संडासात रेडीओ देखील नेण्यास सुरवात केली , नशेत ती आर्त स्वरातील विरहगीते एकून माझा वेळ छान जाई , असे वाटे की आपलेच दुखः ते गाऊन दाखवत आहेत , त्या स्वरातील दर्द मनाला भिडे , नंतर नंतर तर रेडीओ देखील सोबत असलाच पाहिजे अशी सवय झाली , आमच्याकडे त्या वेळी फिलिप्स चा एक लहान ट्रान्झीस्टर होता तो घेऊन मी रात्री १० ते ११.३० म्हणजे सुमारे दीड तास आणि दुपारी ११ किवा १ ते २ असा वेळ संडासात नशा करण्यात आणि गाणी एकण्यात घालवीत असे रेडीओ सिलोन ‘ तामिलीर्शात ‘ , संगीत सरिता ‘ ” आप की पसंद ” विविध भरतीवरील इतर संगीतमय कार्यक्रमांच्या वेळा मला पाठ झाल्या होत्या..

जेव्हा मी संडासात रेडीओ नेतोय हे घरच्यांना समजले तेव्हा त्यांनी आडकाठी केली मला ,म्हणाले ‘ हे काय भलतेच सुरु केले आहेस ? तुला वेड बीड लागले की काय ? ” पण मी ऐकणाऱ्या मुलांपैकी नव्हतोच . भावाने तर दोन तीन वेळा रेडीओ मधील सेल काढून ठेवले होते पण ते माझ्या लक्षात आल्यावर मी पुन्हा बाहेर येऊन भावाशी भांडून सेल घेऊन रेडीओ सुरु करीत असे , म्हणजे आता हे एकटा असताना नशा करत असेन तेव्हा सोबत संगीत असल्या खेरीज मला मजा येत नसे . अर्थात त्या मुळेच असावे मला सुमारे २००० च्या वर हिंदी व मराठी गाणी तोंडपाठ आहेत .त्या वेळी मी माझी एक गाण्याची कँसेट देखील स्वतः रेकोर्ड करून ठेवली होती , मला उगीचच वाटे की मी फार मोठा गायक हूऊ शकलो असतो पण …माझे नशीब की मला संगीत शिकता आले नाही . १२ वी ला पंचवटी कॉलेजला असताना मला गँदरिंग मध्ये गाण्याचे , अभिनयाचे आणि समूह नृत्याचे बक्षिस देखील मिळाले आहे अशी एकदम तीन बक्षिसे पटकविणारा मी त्या वर्षीचा एकमात्र होतो ..

गांजा पीत असताना एकदा घरी कशावरून तरी खूप भांडण झाले आणि माझे डोके फिरले वाटले घर सोडून निघून जावे . मुंबईला पळून जाऊन मोठा अभिनेता , गायक वगैरे झाल्याची उदाहरणे मला माहित होती , तसेच सिनेमात जसा हिरो लहानपणी घर सोडून जातो आणि मुंबईत होऊन मोठा श्रीमंत , नामवंत होतो तसेच आपणही करू म्हणजे सगळ्यांना आपली किंमत कळेल , काहीतरी धाडसी पाउल उचलल्याशिवाय कुटुंबियांची तोंडे बंद होणार नाहीत असा विचार केला , आपण मुंबईला जाऊन लता मंगेशकर यांना भेटायचे आणि त्यांना आपली गाणी ऐकवायची त्या नक्की आपल्याला काहीतरी संधी मिळवून देतील असा अतिआत्मविश्वास वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडलो ( इतक्या सकाळी उठून महाराज कुठे निघाले या बद्दल घरच्यांना जरा आश्चर्य वाटले , कुठे निघालास ?वगैरे प्रश्न आईने विचारले पण काहीही उत्तर न देता निघालो ) ..सोबत माझी गाणी रेकोर्ड केलेली केंसेट घेतली , जवळ कालचे उरलेले फक्त २० रुपये होते , आधी अड्ड्यावर जाऊन गांजा प्यायलो , एक पुडी सोबत घेतली त्या वेळी गांजाची एक पुडी केवळ १ रुपयाला मिळत असे .जवळ आता १५ रुपये उरले होते , मग रेल्वे स्टेशन वर येऊन सकाळची मनमाड हून मुंबईकडे जाणारी ‘ पंचवटी ‘ एक्प्रेस पकडली . वडील रेल्वेत होते त्या मुळे तिकीट चेकर ची वैगरे भीती वाटत नसे , तसेच बहुतेक मवाली पण स्टेशनवरच केले असल्याने तिकीट चेकरला कसे चुकवायचे ते चांगले माहित होते .

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..