नवीन लेखन...

अंध महिला पुनर्वसन समिती, अलिबाग

 
दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते. आयुष्य हे जर गाणं असेल, तर दृष्टी हा त्या गाण्याचा ताल आहे, ठेका आहे, ज्यांच्याशिवाय हे गाणं अतिशय उत्तम गायकाने गायलं असून सुध्दा बेचव व बेरंगी ठरू शकतं. काही व्यक्तींना ही भेट देण्यात निसर्गच कमी पडतो, तर काहींना ही शक्ती गंभीर अपघातामुळे, इजेमुळे किंवा आजारामुळे गमवावी लागते. आयुष्यामधील प्रत्येक क्षण ही त्यांच्यासाठी एक लढाई असते, ज्यात त्यांना स्वतःचा प्रतिस्पर्धी बघण्याची सुध्दा संधी मिळत नाही. लहानपणी आंधळी-कोशिंबीर खेळताना, जी दहा मिनीटे आपण इतरांना पकडण्यासाठी केविलवाणी खटपट करतो, हेच त्यांच्यासाठी अख्ख आयुष्य असतं. आपण त्यांच्या दुःखाची खोली मोजू शकतच नाही, हे खरं असलं तरी अशा अनेक व्यक्ती व संख्या आहेत ज्या त्यांना हरप्रकारची मदत करण्यासाठी, व त्यांच्या आतला प्रकाश पुन्हा उजवण्यासाठी कार्यरत आहेत.

अंध महिलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी ही सहानुभूतीची असली तरीही फारच कमी लोकं या महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करतात. या महिलांची आर्थिक घडी नीट बसावी, त्यांच्या स्वप्नांना व महत्वाकाक्षांना नवा किनारा मिळावा, तसेच त्यांच्या अचाट कल्पनाशक्तीला,

व प्रतिभेला निवारा मिळावा या हेतुने अलिबागमध्ये NAB चे केंद्र सुरू करण्यात आलं होतं. या केंद्राच्या माध्यमातून विविध कलाकुसरीच्या वस्तू, गृहपयोगी साधने व घर सजविण्यासाठी लागणारे साहित्य बनविण्याचं काम जोमाने सुरू झालं व या सर्व महिलांना त्यांचे विचार, भावना व काळोख्या जंगलातसुध्दा तेजाने चमचमणार्‍या काजव्यांसारखं त्यांनी जपलेलं भावविश्व इतरांपुढे उलगण्याची कलात्मक संधी मिळाली. जो वेळ घरात दुःखी व निराशावादी विचार करण्यात जायचा त्या वेळेचा उपयोग समाजाच्या हितासाठी होऊ लागला, इतकेच नाही तर या महिलांना समवयीन व समदुःखी मैत्रिणीसुध्दा मिळाल्या ज्यांच्याबरोबर आयुष्यात आलेली दुःख व सोसलेल्या वेदना वाटण्यात, तसेच आनंदाचे प्रसंग एकत्र साजरे करण्यात त्यांचा वेळ मोठया समाधानात जावू लागला. या केंद्राने महिलांना स्वावलंबनाचा मार्ग तर दाखवलाच, परंतु निसरडया झालेल्या त्यांच्या आयुष्याच्या वाटा पुन्हा मजबूत करण्याचं कार्य चोख बजावलं. या महिलांच्या आर्थिक पुनर्वसनाबरोबरच त्यांच मानसिक पुनर्वसन केलं. त्यांच्या मनाला व शरीराला विविध कौशल्यचं खाद्य पुरवलं, तसेच त्यांच्यामधील हरवलेला आत्मविश्वास, जिद्द, व आशावाद पुन्हा खेचून आणला. विखुरलेली स्वप्नं पुन्हा साधली गेली., तसेच त्यांच्या अंतरंगामध्ये कित्येक वर्षे खितपत पडलेली सुप्त गुणांची व कलाकौशल्यांची दालने पुन्हा खुली केली गेली.

प्रशिक्षण :-NAB च्या केंद्राने या अंध महिलांच्या हृदयातील अखंड तेवणार्‍या पणतीचं कार्य करण्याबरोबरच त्यांना आर्थिकदृष्टया परिपुर्ण व परिपक्व बनवलय. आपणही काही निर्माण करू शकतो, हे त्यांच्या मनावर प्रशिक्षणाद्वारे सतत बिंबवलं जातं. या महिलांना वारंवार प्रशिक्षण द्यावं लागतं, त्यांच्या ओंजळीत सतत आत्मविश्वासाचा व स्वयंसेवेचा प्रकश भरून ठेवावा लागतो, तीच तीच गोष्ट त्यांना अनेकदा शिकवावी लागते, व डोकं थंड ठेवून खूप मोठया आवाजात त्यांच्याशी संवाद साधायला लागतो. ही चिकाटी या केंद्राच्या असोसिएट डायरेक्टर सौ. वृंदा थत्ते व त्यांच्या काही सहकार्‍यांनी प्रयत्नपुर्वक अंगी बाणवली आहे. या महिलांना जाण्या-येण्यासाठी सवलतीचा पास दिला जातो. संजय गांधी निराधार योजनेनुसार या महिलांना दारिद्र्यरेषेखालचं रेशनकार्ड दिलं जातं. त्यांनी बनवलेल्या वस्तू विकल्या जावोत अथवा न जावोत, दर दिवसाची ७५ रु. मजूरी त्यांना दिली जाते. छोटया मोठया व्यवसायांकरिता जसे की पी सी ओ चालवणे, घरघंटी, भाजी विकणे, इ. साठी सरकारी अनुदानसुध्दा मिळतं. या केंद्राने अनेक चळवळया व उत्साही महिलांना असे व्यवसाय थाटण्याची सोय करुन दिली आहे.

प्रत्यक्ष काम :-महिलांच्या करमणुकीसाठी व त्यांच्या आयुष्यात सौख्याचे विविध रंग उधळण्यासाठी येथे सामुहिक जागरण, हळदी कुंकु, भिशी असे छोटे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या महिलांची इतर ज्ञानेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असून केवळ स्पर्शज्ञानावरून त्या वेगवेगळी माणसं ओळखू शकतात, त्यांच्या नुसत्या आवाजावरून त्यांची मनस्थिती ओळखू शकतात, निरनिराळया व्यक्तींचे मोबाईल क्रमांक चांगल्या पध्दतीने लक्षात ठेवू शकतात. यातील काही महिलांना व्यवहारज्ञानसुध्दा प्रचंड असतं. त्यांची काम करण्याची उमेद व जिद्द टिकून राहावी, त्यांच्या पंखांना कलेच्या आभाळात स्वैर उडण्यासाठी बळ यावं, तसेच त्यांच्या आत्मविश्वासाचं समाजातील इतर व्यक्तीकडून खच्चीकरण केलं जावू नये, यासाठी इथे वारंवार या महिलांचं सामुपदेशन केलं जातं. वेगवेगळया गोष्टी त्यांना शिकवून, आल्या परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करायला शिकवलं जातं. कधीकधी नवनवीन कल्पक उपक्रमांद्वारे ’टाकाऊ पासून टिकाऊ‘ चा मंत्र इथे जोपासला जातो. इतर NAB केंद्रांमध्ये अतिरिक्त साठलेले ब्रेल पेपर्स इथे मागवले जातात, व त्यांपासून सुंदर एन्व्हलप्स्, कागदी पिशव्या व मोठया शॉपिंग बॅग्ज तयार केल्या जातात. याशिवाय इथल्या वस्तूंचं जसे की शुभेच्छापत्रे, आकाशकंदिल, राख्या, पणत्या, मेणबत्या, नाजूक कलाकुसर केलेले टी-होल्डर्स व बांगडयांचे बॉक्सेस, शोभेची विविधरंगी फुले, तोरणे, बुके, जेल ग्लासेस, अतिशय बारीक व मनमोहक काम केलेली ज्वेलरी इत्यादींच सौंदर्य अगदी मनात साठवण्यासारखं असतं. वेगवेगळया आकारांच्या, रंगांच्या व

नक्षींनी मढलेल्या इथल्या मेणबत्या पाहिल्या तरी डोळयांच पारणं फिटतं, या गृहपयोगी वस्तूंबरोबरच खडू, काथ्याची दोरी, फिनाईल, पायपुसणी व सुंदर कलाकृतींनी व नक्षीकामाने सजवलेल
डायरीसुध्दा इथे विकायला ठेवली जाते. या सर्व वस्तू आसपासच्या दुकांनामध्ये, रायगड बाजारमध्ये व मुंबईच्या विविध प्रदर्शनांमध्ये पाठवल्या जातात. इथे बनवलेली वेगवेगळया आकारांची एन्व्हल्पस्, एच.पी.सी.एल. व इतर मोठया कंपन्यांना विकली जातात.

वस्तूंना केवळ परिस्पर्शाद्वारे सुंदर व जिवंत बनवण्याचे कसब या महिलांना शिकवणार्‍या व त्यांच्याशी मैत्रीचं नातं निर्माण करून अतिशय प्रेमाने व मायेने त्यांना आर्थिकदृष्टया व भावनिकदृष्टया कणखर बनवणार्‍या सौ.वृंदा थत्ते यांना नुकतेच रायगड भुषण, चेंढरे सन्मान व महाराष्ट्राची सुकन्या असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..