काही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे,
यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा. ही वेधशाळा गेली 106 वर्षे अलिबागच्या गळ्यामधील एखाद्या दुर्मिळ अलंकाराचे काम करीत आहे, व समस्त अलिबागकरांचा तो अभिमानबिंदु आहे यात तिळमात्रही शंका नाही, परंतु हवामानाचा अंदाज, वार्यांची दिशा व पावसाचे प्रमाण बिनचुक वर्तविण्याशिवाय ही वेधशाळा काय काम करते असे प्रश्नचिन्ह आजही अनेकांच्या मनात आहे.
पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व वेधशाळेचे महत्वअसे म्हणतात की कोणतीही नैसर्गिक आपत्ती तिचे रौद्र व प्रलयकारी रूप लोकांसमोर आणण्याअगोदर पृथ्वीच्या पोटात हळुहळु जन्म व आकार घेत असते. पृथ्वीच्या पोटात असे अनेक घटक व शक्ती दडलेल्या आहेत की ज्या आपल्या बौध्दिक क्षमतांच्या पलीकडल्या असल्या तरी त्यांचा पृथ्वीवरील समृध्द जीवसृष्टी निर्माण करण्यात व फुलवण्यात सिंहाचा वाटा आहे. त्या शक्तींपैकीच एक अद्भुत शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र. पृथ्वीच्या गर्भातुन निघालेले चुंबकीय शक्तींचे किरण तिच्यावर 5000 किमीपर्यंत जाऊन स्थिरावतात. व पृथ्वीभोवती ते एक चुंबकीय मंडल तयार करतात. या मंडलामुळे आपलं सुर्याच्या अतिनील किरणांपासुन संरक्षण होतं. व त्यामुळे आज पृथ्वीवरील सर्व जीव अगदी आनंदात व उबदार संरक्षणाखाली नांदत आहेत. वेधशाळेचे प्रमुख कार्य म्हणजे या चुंबकीय क्षेत्राचे शास्त्रशुध्द मोजमापन व परीक्षण करणे, व निरनिराळ्या प्रयोगांद्वारे पृथ्वीच्या आत दडलेल्या असंख्य अशा सुक्ष्म बदलांना व अनोख्या शक्ती व चमत्कार टिपुन त्यांचा सखोल आभ्यास करणे हे आहे. सोप्या भाषेत पृथीच्या पोटाची शस्त्रक्रियाच म्हणा ना! चुंबकीय क्षेत्राचं आभ्यासपुर्ण निरिक्षण करण्याबरोबरचं ही वेधशाळा दुर्मीळ खनिजसंपत्तीचा सतत वेध घेत असते. भुकंप झाल्यानंतर कंपनांची तीव्रता, प्रमाण, व यांमागची कारणे य वेधशाळेच्या अहवालावरुन सहज स्पष्ट होऊ शकतात. मानवाच्या बाह्यकृतींचे सार हे त्याच्या अंतरंगात दडलेले असते असे म्हणतात, व वसुंधरा ही याला अपवाद नाही. कारण भुकंप झाल्यानंतर त्याच्या लहरींचा परिणाम हा चुंबकीय क्षेत्रावर आपोआप दिसायला लागतो.
वेधशाळेची स्थापना व इतिहास१८४१ ते १९०५ या प्रदीर्घ कालावधीमध्ये कुलाब्याला कार्यरत असणारी वेधशाळा मुंबई मध्ये ट्राम सुरु झाल्यामुळे व जमिनीमध्ये विद्युतवाहिनी टाकावी लागल्यामुळे अचुकतेच्या बाबतीत कमी पडायला लागली. या वेधशाळेच्या कामात अनेक अडथळे यायला लागले. निरिक्षणात कृत्रिमता यायला लागली. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पुढे सरकल्यामुळे नैसर्गिक माहिती मिळेनाशी झाली. शेवटी ब्रिटीशांनी ही वेधशाळा मुंबई च्या दिशेला सुमारे शंभर किमी अंतरावर वसलेल्या निर्जन गावात म्हणजेचं अलिबागमध्ये ही वेधशाळा हलविण्याचे ठरविले. अलिबाग हे वेधशाळेसाठी अतिशय आदर्श ठिकाण होते. तिथे कुठलेही कारखाने नव्हते. वीज नव्ह्ती. रेल्वे लाइन नव्ह्ती. शिवाय ते खुप कमी अक्षांशावर असल्यामुळे चुंबकीय क्षेत्राचे सर्वात अधिक शुध्द, नैसर्गिक, व सत्यस्थितीच्या जवळ जाणारे परीक्षण व मोजमापन करता येणे इथे सहजशक्य होते. तसेच पृथ्वीच्या पोटातील खनिजद्र्व्यांचे कधीच उत्खनन केले न गेल्यामुळे येथे विपुल खनिजसाठा मिळण्याचीसुध्दा दाट शक्यता होती. वेधशाळेची अलिबागमधील इमारत ही १९०६ साली श्री नानाभाई मुस यांच्या कल्पक नेतृत्वाखाली बांधण्यात आली. ब्रिटीश वास्तुशास्त्रानुसार बनवली गेलेली ही इमारत अतिशय देखणी, टुमदार, व हिरव्या वनराईने वेढलेली असून ती पोरबंदरवरून मागवलेल्या विशेष दगडांपासून साकारण्यात आली आहे. आली आहे. तापमान नियंत्रित करण्याबरोबरच हे दगड चुंबकीय क्षेत्रावर कुठलाही विपरीत परिणाम करीत नाहीत. या दगडांमुळे वेधशाळेला एखाद्या प्राचीन किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
प्रत्यक्ष कार्यवेधशाळेच्या मुख्य इमारतीच्या आतमध्ये एक इमारत आहे जिथे प्रत्यक्ष क्षेत्राचा संशोधनपुर्ण आभ्यास केला जातो. या इमारतीच्या दोन्ही भिंती लाकडी असून त्यांच्या आत भुसा भरलेला असतो. या सगळ्यांच्या आतमध्ये रेकोर्डिंग रूम बनविली गेली आहे जिथे तीन मोठे चुंबक तिन्ही दिशांना ठेवलेले असतात. या संपुर्ण परिसरात पांढरा नव्हे तर लाल प्रकाश वापरला जातो. या यंत्रावर फोटोपेपर लावण्यात येतो. हे यंत्र चोवीस तास फिरत असते. चुंबकीय क्षेत्रातील अतिशय सुक्ष्म बदलांची व पृथ्वीच्या आतील उलाढालींची य यंत्राद्वारे चोवीस तास नोंद ठेवण्यात् येते. हा फोटोपेपर पारंपारिक व जुन्या पध्दतीने (सोल्युशन मध्ये बुडवून) विकसीत करुन मिळालेले फोटो बारकाईने अभ्यासण्यात येतात. भारतामधील चुंबकीय क्षेत्राची व पृथ्वीच्या अंतर रूपाची सर्वात अचुक व नैसर्गिक नोंद या वेधशाळेमार्फत केली जाते कारण हि वेधशाळा अगदी कमी अक्षांशावर वसलेली असून जगातील इतक्या कमी अक्षांशावर वसलेली अशी ही एकच वेधशाळा आहे. भुचुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी इथे निरनिराळे प्रयोग केले जातात व या प्रयोगांद्वारे वेगवेगळ्या दिशांचं चुंबकीय क्षेत्र किती आहे हे ठरवल जात. या वेधशाळेने बनवलेला अहवाल व नोंदवलेला प्रत्येक बदल हा इन्टरमॅग्नेट च्या मदतीने अमेरिका, रशिया, यांसारख्या प्रतिष्ठित देशांच्या भुचुंबकीय संस्थांना नियमितपणे कळवला जातो. या वेधशाळेच्या शब्दांना आंतराष्ट्रीय पारड्यात खुप चांगल वजन आहे. ही नोंद मग विविध वृत्तपत्रांमधून व मासिकांमधून प्रकाशित केली जाते.
हवामान नोंदणी अलिबाग वेधशाळा ही सुरूवातीला भारतीय हवामान खात्याच्या अधिपत्याखाली होती. 1971 साली जरी चुंबकीय वेधशाळा व हवामान खाते या दोन्ही संस्था वेगळ्या झाल्या तरी हवामान खात्याने त्यांची वार्याचा
वेग , दिशा, तापमान, व पावसाचा अंदाज वर्तवणारी यंत्रे वेधशाळेमध्येच ठेवली. त्यामुळे अगदी आजगायत येथे चुंबकिय क्षेत्राचे परीक्षण व संशोधन करण्याबरोबरच हवामानाचा अचुक अंदाज, वार्यांची दिशा व वेग, पावसाबद्दलचे अनुमान व तापमानाचे मोजमापन या सर्व गोष्टी दिवसातुन दोनदा येथे केल्या जातात व ई मेलद्वारे हवामान खात्याला ही सारी माहिती पाठविण्यात येते.
अलिबाग चुंबकीय वेधशाळेला आंतरराष्ट्रिय स्तरावर अतिशय सन्मानित अस स्थान व अनन्यसाधारण महत्व आहे. कारण दुसर्या महायुध्दाच्या वेळी जेव्हा जगातील सार्या वेधशाळा बंद करण्यात आल्या होत्या तेव्हा फक्त ही वेधशाळा तिचं काम अगदी तत्परतेन करत होती. 2004 ला या वेधशाळेचा सुवर्णजयंती महोत्सव मोठ्या धडाक्यात साजरा करण्यात आला ज्याप्रसंगी जगातील अनेक प्रख्यात संशोधकांना व वैज्ञानिकांना आमंत्रित करण्यात आल होतं.
— अनिकेत जोशी
Leave a Reply