प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम- कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति।
श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति॥५॥
पाश्चात्य साहित्यातील एक वाक्य प्रसिद्ध आहे, नावात काय ठेवले आहे? अर्थात त्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी, नावात काय ठेवले आहे? हा प्रश्न पाश्चात्त्यांनाच पडू शकतो. भारतीय संस्कृती तर सरळ सांगते जे काय ठेवले आहे ते नावातच ठेवले आहे. नामातच ठेवले आहे.
भगवंताचे नाम ही भक्ताची सर्वात आवडती गोष्ट. नामाच्या आधारे नामी पर्यंत पोहोचणे हे साधनेचे वर्म.
प्रस्तुत श्लोकात पूज्यपाद आचार्यश्री आई लालितेच्या विविध नावांचा विचार प्रस्तुत करीत आहेत.
आरंभी स्मरण, त्यानंतर वंदन आणि आता नामोच्चारण.
बौद्धिक स्तरावर स्मरण, मानसिक स्तरावर वंदन आणि शरीराच्या मुखाने सातत्याने नामोच्चारण अशी ही रचना.
त्यासाठी आचार्य म्हणतात,
प्रातर्वदामि- मी सकाळी बोलतो. नाम घेतो.
वचसा- वाणीने.
ललिते – हे आई ललितांबे !
तव पुण्यनाम- तुझी पुण्यदायक नावे.
कोणकोणती आहेत ही नावे? तर
कामेश्वरी- सकल कामनांची ईश्वरी. अर्थात भक्तांच्या सकलं कामना पूर्ण करणारी.
कमला- कमळामध्ये निवास करणारी. कमळाप्रमाणे उर्ध्वगामी वृत्ती असणारी. ती वृत्ती प्रदान करणारी.
महेश्वरी- महेश्वराची सहलीलाचारीनी.
श्रीशाम्भवी- शंभू अर्थात भगवान शंकर. शम् म्हणजे कल्याण. तर भू म्हणजे निर्माण होणे. ज्यांच्या चरणाशी जगाचे कल्याण निर्माण होते ते शंभू. त्यांची चैतन्यशक्ती ती शंभूची शांभवी.
जगतां जननी – सकल विश्वाची जननी. आदिशक्ती. मूळमाया.
परा- परा शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ.
परा हा एक वाणी चा प्रकार देखील आहे. चौथ्या प्रकारच्या या वाणीत साधकाला अखंड ओंकार नाद ऐकू येतो. तो ओंकार आईचे स्वरूप आहे .
वाग्देवता- वाणीची देवता. जगातील सर्वच पशूंना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आवाज काढता येतो. त्यांना देखील ध्वनी आहे. पण त्यांना वाणी नाही. त्यांना आपल्या मनातील सर्व भावना पाहिजे तशा बोलता येत नाही. वाणी हे माणसाचे वैभव आहे. आई ललिता त्या वाणीची देवता आहे. सोप्या शब्दात ती आपल्याला मनुष्यत्व प्रदान करणारी आहे.
त्रिपुरेश्वरी- या आई जगदंबा ललितेची उपासना श्री त्रिपुरसुंदरी रूपात केली जाते.
त्रिपुर शब्दाचा अर्थ स्वर्ग, मृत्यु ,पाताळ. तर देहाच्या बाबतीतला अर्थ स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. या सगळ्यांची स्वामिनी.
सकाळी मी वाणीने तिचे भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply