राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्।
राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।।
राजन्- शोभासंपन्न असलेली,
मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस.
मन्दगमनां – त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली.
राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी.
राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान श्रीविष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून भगवान ब्रह्मदेव प्रगटले आहेत. त्यामुळे ज्यांना राजीवप्रभव असे म्हटले आहे. ते ज्यांच्या अग्रभागी आहेत असा सर्व देवांचा समुदाय म्हणजे राजीवप्रभवादि.
देवमकुटै- अशा सर्व देवांच्या मुकुटांनी राजत्पदाम्भोरुहाम्- पद म्हणजे पाय, अंभोरूह म्हणजे कमळ. राजत् म्हणजे शोभून दिसणारी. अशा सर्व देवांच्या मुकुटांनी जिचे चरणकमल शोभून दिसत आहेत अशी. या सर्व देवता चरणावर मस्तक ठेवत असल्याने, आईचे पाय दिसतच नाही तर या देवांचे मुकुटच दिसतात अशी सुंदर कल्पना आचार्यश्री करीत आहेत.
राजीवायतमन्दमण्डितकुचां- राजीव म्हणजे कमळ, आयत म्हणजे फुललेले, मंद म्हणजे हळुवार हलणारे, मंडितकुचा अर्थात वक्षस्थल शोभून दिसणारी.
आई जगदंबेने गळ्यात फुललेल्या कमळाची माळ घातली आहे. आईच्या मंद श्वासाने आणि हृदयाच्या हळुवार हालचालीने, ती माळ मंद हलत आहे. तिने शोभून दिसणारी.
राजाधिराजेश्वरीं- सर्व राजांचीही महाराणी असणारी.
श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा ,श्री भ्रमराम्बेचे मी भजन करतो.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply