नवीन लेखन...

नोकरीला रामराम.. स्वत:चा व्यवसाय ! (नशायात्रा – भाग ४५)

प्रशिक्षण अर्धवट सोडून आलो होतो तरी देखील इस्माईल भाई यांनी व आमच्या टीम च्या लोकांनी माझा चांगला अहवाल दिल्याने नंतर २ दिवस आराम केल्यानंतर माझी नेमणूक स्वतंत्र गाडीवर ‘ प्रचारक ‘ म्हणन झाली . म्हणजे आता एका नव्या गाडीवर मी इस्माईल भाईंची प्रचारक पदाची भूमिका निभावणार होतो . आम्हाला नगर , कोपरगाव हा भाग दिला गेला एकंदर १० दिवसांच्या दौऱ्यासाठी . तेथे ही पहिले चार दिवस जवळ ब्राऊन शुगर चा साठा होता म्हणून चांगले गेले व नंतर जवळचा माल संपल्यानंतर माझी टर्की सुरु झाली , आता प्रशिक्षण नसल्यामुळे तसा मी सभ्यपणाचा बुरखा काढून टाकला होता व बिनदिक्कत सर्वांसमोर बिडी सिगरेट ओढत होतो , त्या टीमचे मँनेजर रोज रात्री थोडी दारू पिणारे होते , मी देखील त्यांच्या सोबत दारू पिऊ लागलो , कोपरगाव बस स्टँड पासून जवळच मी ऐक गांजाचा अड्डा देखील शोधून काढला होता , मग रोज यथेच्छ दारू गांजा पिणे सुरु झाले , गांजा दारू पीत होतो तरी मूळ गर्द ची मजा काही येत नव्हती तसेच दारू प्यायल्यानंतर मी अधिक आक्रमक होत असे , म्हणजे मारामारी शिवीगाळ असे प्रसंग घडत असत माझ्याकडून दारू प्यायल्यानंतर..

( दारू तसे पहिले तर शास्त्रीय भाषेत ऐक ‘डिप्रेसंट ‘ आहे , म्हणजे शरीर मन यांना अधिक शिथिल करणारे रसायन . पण दारूचे सेवन केल्यानंतर निरनिराळ्या प्रकारे लोक वागतात ऐक वर्ग असा आहे की दारू पिऊन एकदम शांत बसतात , कोणाशीही काहीच बोलत नाहीत , दुसऱ्या प्रकारच्या लोकांना दारू प्यायली की प्रचंड बडबड सुचते ते सारखे तेच तेच बोलत राहतात आणि अगदी आसपासच्या लोकांना जीव नकोसा करतात , तिसरा वर्ग जरा हिंसक असतो तिसऱ्या वर्गातील लोक हे दारू प्यायले की त्यांना जुन्या अपमानाच्या घटना , प्रसंग आठवतात , एकंदरीत मनाविरुध्द गोष्टींबद्दल मनात खदखदत असलेला त्यांचा संताप बाहेर पडू पाहतो अश्या वेळी ते भांडणे उकरून काढतात , शिविगाळ करतात , मारामारी करतात , भले मार खातात पण तरीही मुजोरी करत राहतात . चौथा वर्ग आहे ते लोक दारू प्यायले की त्यांना एकदम भावनिक चढउतार दाखवतात मध्येच दुखा:ने रडणे, प्रेमाचे भरते आल्यासारखे जवळच्या लोकांना मिठ्या मारणे , पाया पडणे अशी नाटके करतात ) मी या पैकी २ आणि ३ या प्रकारात होतो , त्या मुळे दारू प्यायलो आणि आसपास कोणी असले की मी प्रचंड बडबड करत असे किवा जर कोणाशी काही वाद झाला तर एकदम मारामारी करत असे . एकदा याच भरात मी नाशिकरोड स्टेशन जवळ मित्रांमध्येच वाद झाला म्हणून एका मित्रावर जवळ बसलेल्या चप्पला चपला शिवून देणाऱ्या व्यक्तीची आरी उगारली होती , नशीब इतर मित्रांनी मला पकडले म्हणून माझ्या हातून काही भयंकर घडले नव्हते..

कोपरगाव येथे कसे तरी १० दिवस मी पूर्ण केले आणि येतांनाच मनाशी ठरवले की ही नोकरी सोडून द्यायची आणि स्वतचा काहीतरी धंदा सुरु करायचा ( बहुधा सर्व व्यसनी लोकांना स्वतचा व्यवसाय करायला जास्त आवडते याचे प्रमुख कारण असे की त्यांना नोकरीत असलेली वेळेची , मालकाची किवा वरिष्ठांची गुलामी किवा बांधिलकी आवडत नसते , स्वतच्या मर्जीने त्यांना जगायचे असते , कोणतही बंधन नको असते , शिवाय धंदा म्हणजे रोज पैसे हातात खुळखुळत असतात , नोकरीत महिन्यातून एकदाच पगार मिळतो ) , नाशिकला आल्यावर मी घरात कटकट सुरु केली की मी नोकरी करणार नाही , जेवणाचे हाल होतात , माझी तब्येत बिघडते वगैरे आणि सरळ राजीनामा देवून झाल्या १५ दिवसांचा पगार घेऊन घरी आलो तो पगार मला मजा करायला ४ दिवस पुरला , वडिलांची सेवानिवृत्ती आता जवळ आली होती म्हणून त्यानाही मी ते सेवानिवृत्त होण्याच्या आत कुठेतरी सेटल व्हावे असे वाटत होते , त्यांनी मला रेल्वेतच नोकरी करण्याचा प्रस्ताव दिला म्हणजे आधी टेम्पररी खलाशी म्हणून भरती व्हायचे आणि मग रेल्वेच्या परीक्षा देवून कायमचे रेल्वेत सामील व्हायचे ..

पण हा प्रस्ताव मी नाकारला मी आणि खलाशी म्हणजे चक्क स्वतचा अपमान समजत होतो मला एकदम मोठा अधिकारी व्हायचे होते किवा स्वतचा धंदा सुरु करायचा होता , आता वाटतेय की त्यावेळी वडिलांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर बरे झाले असते माझ्या सोबतच्या एका मित्राने आधी खलाशी म्हणून नोकरी केली आणि नंतर रेल्वेच्या परीक्षा देवून आता तो मस्त रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून सेटल झालाय चांगला . मी घरातील लोकांकडे मला तुम्ही ऑटोरिक्षा घेऊन द्या म्हणून मागे लागलो , वडील फारसे विरोधात नव्हते मात्र मोठ्या भावाने ऑटोरिक्षाच्या योजनेला सख्त विरोध केला , त्याला माझी मित्र मंडळी आणि माझा स्वभाव चांगला माहित होता हा ऑटो घेणार म्हणजे व्यवसाय कमी आणि मित्रांबरोबर फालतुगीरीच जास्त करणार , शिवाय काही गुन्हेगारी कृत्ये देखील करू शकतो हे त्याला ठावूक होते मग मी दुसरा प्रस्ताव ठेवला की मी ‘पानपट्टी ‘ सुरु करतो ..नाशिकरोड रेल्वे स्टेशन समोर माझ्या अब्दुल नावाच्या मित्राचे ऐक पान सिगरेट चे ‘ संघर्ष ‘ पण भांडार नावाचे दुकान होते ( अजूनही ते दुकान आहे बहुतेक तेथे आता अब्दुल चा मुलगा बसतो ) या दुकानात मी नेहमी टाईम पास म्हणून अब्दुल ला मदत करीत असे , अब्दुल चरसी होता त्यामूळे आमचे चांगले जमत होते , तर मला वेगवेगळी पाने लावणे वगैरे जमत होते म्हणून मी पानपट्टीचा प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव ऐकून वडीलाना धक्काच बसला . तरी तेखील ते कसे तरी तयार झाले , भावाला हे देखील मंजूर नव्हते पण त्यातल्या त्यात हा एका जागी बसून राहील असा व्यवसाय म्हणून त्याने मान्यता दिली …

पानटपरी टाकण्यासाठी आधी जागा आवश्यक होती , मी सिन्नर फाटा शिवसेना शाखेचा सेक्रेटरी असल्यामुळे जागेची अडचण आली नाही , सिन्नर फाट्याला भाजीबाजार सुरु होतो तेथून ते रेल्वे स्टेशन ओलांडून पलीकडे नाशिकरोड शहरात जाण्यासाठी ऐक छोटा पादचारी पूल आहे त्या पुलाच्या सिन्नर फाटा भागाच्या पायथ्याशी मी जागा निवडली , बिंधास्त त्याजागेवर अतिक्रमण करायचे ठरवले तशी ती जागा म्युनिसिपाल्टीची होती त्यामूळे फारशी अडचण येणार नव्हती , वडिलांनी मग लाकडी टपरी वगैरे बनवण्यासाठी मला परवानगी दिली आणि पैसेही .. त्यातील काही पैसे नशेत आणि काही पैसे कामात असे लावून ऐक ५ बाय ५ ची साधारण १० फुट उंचीची लाकडी टपरी बनवली त्या टपरीत ऐक वरचा भाग आणि मध्ये पार्टीशन टाकून खाली रिकामा भाग असे ठेवले , म्हणजे जेव्हा दुकानात कोणी नसेल तेव्हा मला खालच्या रिकाम्या भागात माझे धंदे करता येणार होते . वडिलांनी एकंदरीत १० हजार रुपये खर्च केले पानटपरी साठी . १५ ऑगस्ट १९८७ या दिवशी माझ्या पानटपरीचे उद्घाटन त्यावेळचे नाशिकरोड चे शिवसेना अध्यक्ष श्री . प्रभाकर कर्डिले यांच्या हस्ते झाले ..त्या दिवशी सिन्नर फाटा दलित पँथर शाखेने कोणत्यातरी कारणावरून १५ ऑगस्ट हा दिवस ‘ काळा दिवस ‘ म्हणून साजरा करायचे ठरवले होते त्या मुळे माझे काही मित्र शर्टाला काळ्या पट्ट्या लावून होते ते देखील पानटपरी ज्या जागी बनवली त्या जागेवरून उचलून सिन्नर फाटा येथे आणण्याकरिता मदत करण्यासाठी हजर होते .दलित पँथर , शिवसेना , बहुजन युवा संघटना , आणि मराठा महासंघ या सर्व संघटनांचे माझे मित्र उद्घाटनासाठी उपस्थित होते पानटपरी चे नाव ‘ एकता ‘ पान भांडार असे ठेवले होते मी व तशी पाटी देखील रंगवून वर लावली होती . उद्घाटन आल्यावर लगेच ऐक तासभरातच मी दुकान बंद करून मित्रांना पार्टी दिली …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..