स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply