हे…निर्दयी माणसा..
गर्विष्ठ माणसा..
स्वार्थ आणि फक्त स्वार्थानचंं बरबटलेल्या माणसा..
अहंकारानं मती भ्रष्ट झालेल्या माणसा..
अतिआत्मविश्वासानं उन्मत्त झालेल्या माणसा..
डोळस असूनही आंधळा झालेल्या माणसा..
शेवटी तुच ठरलास तुझ्या मृत्युचा शिल्पकार…
एक ना एक दिवस हे होणारच होतं..
तुझ्या असंख्य पापाचा घडा भरणारच होता…
शहाणपणाच्या तो-यातला अतिशहाणपणा तुला भोवणारचं होता…
शेवटी काय मिळवलस रे एवढा ज्ञानी होऊन,,
यशावर यश मिळवून त्याच्या नशेनं उन्मत्त होऊन..
अत्र तत्र सर्वत्र सर्व कांही मी आणि मीच आहे या अभिर्भावात सतत वावरुन..
आणि एवढं सारं करुन मिळवलंस तरी काय ?
एका अदृष्य मेलेल्या विषाणूकडून न भुतो न भविष्यती असा दारुण पराभव..
कुठलीही हालचाल न करता मृत्युपुढे पत्करलेली सपशेल शरणागती..
गतीनं प्रगतीकडे निघालेल्या तुझ्या मनसुब्यांची झालेली अधोगती…
आधुनिकतेच्या नादात तू चक्क जन्मदात्या निसर्गालाच हरताळ फासायला निघाला होतास.. विज्ञानाच्या कसोटीवर सुखाच्या अतिहव्यासानं प्रत्यक्ष सृष्टीला वेठीस धरणार होतास ना..?
काय झालं बघ तूझ्या या कर्मांच…
दोन्ही हात शाबूत असूनही कुणाशीही हात न मिळवता येणं..
स्वतःच्याच घरात बंदिस्त झालास घोर अपराध्यासारखा.. पैसा अडका धनदौलत सारं सारं मुबलक असूनही लाचार झालास भिका-यासारखा..
भीक द्यायलाही कुणी नाही आणि घ्यायलाही कुणी नाही..
सर्वत्र पसरलीय स्मशान शांततेलाही मागे टाकणारी भयानक शांतता..
तुच निर्मिलेल्या तुझ्या विश्वात तुला साधा श्वासही घेता येऊ नये अशी मरणासन्न अगतिकता..
सदैव मी..माझं..माझं करणारं.. आत्मस्तुतीच्या प्रमादात भयानं पछाडलेलं तुझ दुर्बल मन..
नात्यांच्या पाशात गुरफटूनही तुला कुणीही जवळ न येऊ देणारा तुझा कल्पोकल्पित तथाकथित गोतावळा.,
त्यांच तुझ्या अगदी सावलीलाही जवळ न करणं …
तुच बघं तुझ्या कर्माची दुर्दशा..
सर्वदूर प्रेतांचे ढिग..
क्षणाक्षणानं तडतफडून तडफडून मरणारे तुझे सखे सोबती..तुझे प्राणप्रिय आप्तगणं..
अंतिमक्षणी पाण्याच्या अगदी दोन थेंबानाही पारखं झालेला तुझा निष्प्राण देह..
तुझ्या अंतिम संस्कारावरही निर्बंध यावेत यापेक्षा मोठी शोकांतिका तरी काय असणारं ? शेवट जवळ आलाय..
साक्षात मृत्यु समोर उभा आहे..
कोणत्याही क्षणी तू त्याच्या मगरमिठीत गुरफटणार आहेस..
निदानं आता तरी शहाण्यासारखं वाग..
केलेल्या दुष्कृत्यांचा पाढा वाच..
काय चूकलं..कुठं चूकलं याच्या फंदात न पडता सरळ कबुली दे केलेल्या वाईट कर्मांची..
मृत्युशय्येवर पडल्या पडल्या निदान एवढं तरी औदार्य दाखव..
कुणास ठाऊक सावरशीलही कदाचित..
सावरशीलही कदाचित….
किशोर ओगले..
1.4.2020
Leave a Reply