स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖
भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् – उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
पराशक्तिमित्रं – पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
नमः पंचवक्त्रम् – अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply