स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.
पहिल्या तीन श्लोकात भगवंताचे पावित्र्य व लक्ष्मीबरोबरचे साहचर्य वर्णिले आहे. त्यानंतरच्या श्लोकात वेंकटेशाच्या सौंदर्याच्या विविध वैशिष्ट्यांचे वर्णन आहे.
श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनाम् |
श्रीवेङ्कट निवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् || १
मराठी- रमेच्या पतीला, पवित्र गोष्टींचे इच्छुक असणार्यांसाठी सर्व मंगल गोष्टींचा सागर असलेल्या, लक्ष्मीचे घरच असलेल्या, वेंकट पर्वतावर रहाणार्यासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
हिताचा इच्छुकांसाठी दरिया कमलापती ।
वृषाचली रमाचित्ती वसे मंगल त्याप्रती ॥ ०१
लक्ष्मी सविभ्रमालोक सुभ्रू विभ्रम चक्षुषे |
चक्षुषे सर्वलोकानां वेङ्कटेशाय मङ्गलम् || २
मराठी- ज्याच्या भुवया आणि डोळे सुरेख आहेत आणि जे लक्ष्मीच्या अनन्य साधारण सौंदर्याकडे पहात असतात, जो सर्व जगताचा नेत्र आहे, अशा वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
लक्ष्मी विलास बघती सुरेख नयने भुवया ।
विश्वाचे जो लोचन सर्व मंगल हो तया ॥ ०२
श्रीवेङ्कटाद्रि शृङ्गाग्र मङ्गलाभरणाङ्घ्रये |
मङ्गलानां निवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् || ३
मराठी- वेंकट पर्वताच्या शिखरांची टोके ही ज्याच्या पावलंचे भूषण आहेत, जो सर्व पवित्र गोष्टींचे आगर आहे, अशा वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
टोके वृषाद्रिची दागिना असे चरणी जया ।
पावित्र्याचा निवारा जो, सर्व मंगल हो तया ॥ ०३
सर्वावयसौन्दर्यसम्पदा, सर्वचेतसाम् |
सदा सम्मोहनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम् || ४
मराठी- (ज्या वेंकटेशाच्या) सर्व इंद्रियांच्या सौंदर्याची विपुलता सदैव सर्वांच्या मनाला आकर्षित करते, त्या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
सारे विपुल शिगेचे देखणेपण इंद्रिया ।
चित्तांना मोहिनी नित्य, सर्व मंगल हो तया ॥ ०४
नित्याय निरवद्याय सत्यानन्द चिदात्मने |
सर्वान्तरात्मने श्रीमद्-वेङ्कटेशाय मङ्गलम् || ५
मराठी- सार्वकालीन, निष्कलंक, सत्यस्वरूप,आनंदमय,सर्वांच्या अंतरी वास करणा-या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
ज्ञानी, चतुर, संपूर्ण, आनंद नित हो जया ।
राहे सर्व मनांमाजी, सर्व मंगल हो तया ॥ ०५
स्वतः सर्वविदे सर्वशक्तये सर्वशेषिणे |
सुलभाय सुशीलाय वेङ्कटेशाय मङ्गलम् || ६
मराठी- जो स्वतः सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व जगताला पुरून उरलेला आहे, ज्याच्याशी सहजतेने जवळीक साधता येते, जो सौहार्दपूर्ण आहे अशा वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
सुज्ञ, स्वयंभु, सौहार्दपूर्ण, सा-या जगास या
जवळीक, सुसंस्कृत, सर्व मंगल हो तया ॥ ०६
परस्मै ब्रह्मणे पूर्णकामाय परमात्मने |
प्रयुञ्जे परतत्त्वाय वेङ्कटेशाय मङ्गलम् || ७
मराठी- परब्रह्म, पूर्णसंतुष्ट, परमात्मा व निखळ सत्याचे मूळ असलेल्या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
परब्रह्मा समाधानी तैसा परमात्मा तया ।
उद्गमा परतत्त्वाच्या सर्व मंगल हो तया ॥ ०७
आकालतत्त्वमश्रान्तमात्मनामनुपश्यताम् |
अतृप्त्यमृतरूपाय वेङ्कटेशाय मङ्गलम् || ८
मराठी- जेवढी वेळेची मर्यादा शक्य आहे तोवर ज्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात राहूनही आपल्या मनाच्या अमृत प्राशनाची तृप्ती होत नाही अशा वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
नेत्रा जरी समयो प्रदीर्घ रूप बघावया ।
तृप्ति न अमृतप्राशने, सर्व मंगल हो तया ॥ ०८
प्रायः स्वचरणौ पुंसां शरण्यत्वेन पाणिना |
कृपयाऽऽदिशते श्रीमद्-वेङ्कटेशाय मङ्गलम् || ९
मराठी- जो दयाळूपणाने बहुतेक सर्व जनांना आश्रय देण्यासाठी आपल्या हाताने आपल्या पावलांकडे निर्देश करतो त्या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
मुख्यत्वे अपुल्या हाती पद घेण्यास आश्रया ।
कनवाळू सर्वां दावी सर्व मंगल हो तया ॥ ०९
दयाऽमृत तरङ्गिण्या स्तरङ्गैरिव शीतलैः |
अपाङ्गैः सिञ्चते विश्वं वेङ्कटेशाय मङ्गलम् || १०
मराठी- दयारूपी अमृताच्या नदीच्या थंडगार लाटांप्रमाणे (आपल्या) कटाक्षांनी विश्वावर वर्षाव करणा-या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
कृपासुधा नदीच्या थंड गार लहरींपरी ।
दृष्टीची वृष्टी विश्वा सारे तुझे शुभ श्रीहरी ॥ १०
स्रग्-भूषाम्बर हेतीनां सुषमाऽऽवहमूर्तये |
सर्वार्तिशमनायास्तु वेङ्कटेशाय मङ्गलम् || ११
मराठी- सर्व दुःखांचे शमन व्हावे यासाठी (गळ्यातील) हार, अलंकार, पोशाख, आयुधे यांना शोभा देणारी आकृती ज्याची आहे, त्या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
लेणी आयुध माळा वसनां मूर्ती देत रया ।
होण्या शांत मनस्ताप, सर्व मंगल हो तया ॥ ११
श्रीवैकुण्ठ विरक्ताय स्वामि पुष्करिणीतटे |
रमया रममाणाय वेङ्कटेशाय मङ्गलम् || १२
मराठी- श्री वैकुण्ठाचा कंटाळा आल्याने स्वामी पुष्करिणीच्या किनारी लक्ष्मीसह आनंदात दंग झालेल्या वेंकटेशासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
वैकुण्ठी न च स्वारस्य, स्वामि पुश्करिणी तिरी ।
कमलेसह रंगता, होवो मंगल श्रीहरी ॥ १२
श्रीमत्-सुन्दरजामातृमुनिमानसवासिने |
सर्वलोकनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् || १३
मराठी- श्रीमान सुंदरचा जावई असून योग्यांच्या मनात वास करणार्या, सर्व जगताला व्यापून रहाणा-या श्रीनिवासासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
जो राही मुनिमनी, सुंदर श्वशुर जया ।
सर्व विश्व जयें व्याप्त, सर्व मंगल हो तया ॥ १३
मङ्गला शासनपरैर्-मदाचार्य पुरोगमैः |
सर्वैश्च पूर्वैराचार्यैः सत्कृतायास्तु मङ्गलम् || १४
मराठी- मंगलाशासनम् भक्तिभावाने गाणा-या माझ्या आचार्यांनी व त्यापूर्वीच्या सर्व आचार्यांनी पूजिलेल्या त्या श्रीनिवासासाठी मी मंगल गोष्टींची कामना करतो.
मंगलाशासनपदें आचार्य भजती जया ।
तैसेच पूर्वज गुरू , सर्व मंगल हो तया ॥ १४
— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
रचिले जे मंगल, स्वामी प्रतिवादिने पहा |
नसे अन्य कोणी हो, धनंजयचि अमुचा हा! ||
ह्या स्तोत्राबद्दल मला काहीच माहिती नव्हती. भगवंताचे फारच सुंदर वर्णन केले आहे. भाषांतरामुळे अर्थही कळला. धन्यवाद.