नवीन लेखन...

स्तुत्य आणि अनुकरणीय वाट !

लढाईच्या अंतिम क्षणी
संसाराचा कोश तोडून
सामान्याच असामान्य होतात
लढाई जिंकतात
आणि पुन्हा कोशात जाऊन
सामान्य होतात
विजयाची मिरवणूक ते परस्थ्पणे
आपल्या घराच्या खिड्क्यातूनच पाहतात…

कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. संपर्कातून कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची वस्तुस्थिती समजून घेत वारकर्‍यांनी वारीला जाऊन गर्दी करण्याचा कुठलाही अट्टाहास न करता आपल्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ असल्याचे दर्शन महाराष्ट्राला घडवून दिले. त्याचपाठोपाठ आता गणेशभक्तांनीही सामाजिक जाण भान जपत गणेशउत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याला गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणेश उत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान नोंदवले. ‘देश हा देव असे माझा’ अशा अत्यंत अचूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे दहा दिवस रक्तदान, प्लाझ्मादान, गलवानच्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना साह्य, करोनावीर पोलिसांच्या कुटुंबांना साह्य अशा उपक्रमांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. वास्तविक पाहता, 86 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा खंडीत करण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. परंतु ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी आषाढी वारीच्या संदर्भात पोक्तपणा दाखवला, तोच कित्ता लालबाग राजा गणेशोत्सव मंडळानेही गिरवला. स्तुत्य निर्णय घेणाऱ्या गणेश भक्तांच्या या वैचारिक प्रगल्भतेचं संपूर्ण महाराष्ट्र स्वागत करतो आहे. राज्यातील प्रत्येक गणेश मंडळाने त्याचे अनुकरण करावे, हीच आज काळाची गरज आहे.

कोरोना नामक संकट आलं आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. आजवर आपण गृहीत धरलेल्या जगालाच या विषाणूने हादरा दिला. उद्योग, व्यवसाय, नोकरी, सण-उत्सव, समारंभ आदी सगळ्या पातळ्यांवर नकारात्मकता पसरली असताना छत्रपती शिवरायांच्या मराठी मुलखात कोरोना नावाच्या राक्षसाचा मुकाबला करण्यासाठी जनमाणूस उभा ठाकतो, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. मराठी माणसाला लढवय्या म्हटले जाते, ते त्यामुळेच! महाराष्ट्रात परंपरेचा आदर केला जातो. परंतु, संकटाच्या काळात परंपरेचं अवडंबर माजवले जात नाही, हेच तर महाराष्ट्राचे पुरोगामीत्व आहे. पंढरीची वारी, दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव पारंपरिक परंतु सध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेने ते सिद्ध केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. करोना संसर्गाच्या धोक्यामुळे माणसांनी माणसांपासून सदैव जास्तीत जास्त अंतर व कडक शिस्त राखण्याची निकड निर्माण झाली आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर लालबाग राजा गणेश मंडळाने उत्सव सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर भव्य व विशाल मूर्तींसाठी विख्यात असणाऱ्या बहुतेक मंडळांनी मूर्तींची उंची कमी करून, ती तीन, साडेतीन, चार फूट इतकीच मर्यादित ठेवण्याचे ठरविले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना तसेच विसर्जन करताना गर्दी होऊ नये, यासाठी ही उपाययोजना करण्यात येतेय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने मुंबईचा, मुंबईकरांच्या आरोग्याचा आणि एकूणच ‘कोरोना योद्ध्यां’च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयामुळे निश्चितच कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत होईल आणि आरोग्य यंत्रणेवर अधिकचा ताण येणार नाही. या ११ दिवसांत रक्तदान शिबिरे, प्लाझ्मा दान शिबिरे मंडळाकडून राबविली जाणार आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांबरोबर गरजू रुग्णांनाही होईल. मुंबई आणि राज्यातील इतर गणेशोत्सव मंडळांनीही आता लालबागच्या राजाचा आदर्श घेण्याची गरज आहे.

कोरोना संसर्गाच्या भीतीने आज संपूर्ण जगाला ग्रासले आहे. यावर्षीची पहिली सहा महिने अशीच रखडत गेली. अजून किती काळ हे सावट असणार आहे, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत संसर्ग टाळणे हाच एकमेव मार्ग आपल्यासमोर उपलब्ध असताना त्याचं अनुकरण करणे आपल्यासाठी, देशासाठी, समाजासाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील भाविक जनता तो मार्ग स्वीकारते आहे, ही आपली एक उपलब्धी म्हणावी लागेल. परंतु, ही मानसिकता सार्वत्रिक होण्याची गरज आहे. लालबाग राजा गणेश मंडळाने जो निर्णय घेतला त्याच अनुकरण संपूर्ण राज्यातील संपूर्ण लहान-मोठ्या गणेश मंडळांनी केलं तर कोरोना विरोधातील लढा अधिक सुसाह्य होईल. सोबतच, खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा केल्याचं समाधान आपल्याला मिळू शकेल. लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा त्यामागे त्यांचा हेतू जनजागृती हाच होता. इंग्रज सत्तेविरुध्द जनता संघटित व्हावी. त्यांच्यात सामाजिक सलोखा निमार्ण होऊन स्वातंत्र्य लढ्याला गती मिळावी. अशा अनेक राष्ट्रहिताच्या उद्दात हेतूसाठी टिळकांनी महाराष्ट्राच्या घराघरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून घराबाहेर आणला. आजच्या बिकट परिस्थितीतही गणेशोत्सवातून जनप्रबोधनाची चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या विविध संकटातून मार्ग काढण्याचा गणेश उत्सव हा एक पर्याय ठरू शकतो!

आषाढी वारी, गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी वा इतर कुठलाही सण समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात समूहभावनेची जाणीव निर्माण करून तसे संस्कार रुजविण्यासाठी आहे. कारण जनतेच्या एकत्रित समुहभावनेमध्ये मोठी शक्ती असते. जगाच्या इतिहासात आजवर जितक्या क्रांत्या झाल्या, त्या लोक संघटित झाल्यामुळेचं! देवी, कॉलरा, प्लेग यासारखे जीवघेणे साथीचे रोगही माणसाच्या इच्छाशक्ती समोर नष्ट झाले. कोरोना संसर्ग साथीचाही असाच नायनाट होणार आहे. अर्थात वेळ कमी अधिक लागू शकेल! परंतु, कोरोनावर आपण मात करु, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण तोवर आपल्याला हा लढा एकजुटीने आणि सकारात्मक विचारांनी सुरू ठेवावा लागेल. राहिला प्रश्न श्रद्धेचा तर, श्रीगणेश हा बुध्दीचा देव आहे. संकटांवर मात करण्याची शक्ती देणारा देव आहे. मूर्ती छोटी असो वा मोठी, श्रध्दा तेवढीच राहते. मानवसेवा, राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे आमच्या संत महात्म्यांनी सांगून ठेवले आहे. आणि, आताची वेळ महोत्सव साजरा करण्याची नाही तर ‘सेवा उत्सव’ साजरा करण्याची आहे. सामान्य माणसाने ठरवले तर तो कुठल्याही संकटावर मात करू शकतो! काळोखाचा आणि निराशेचा सागर कितीही अथांग असला तरी त्या सागरात प्रकाशाचे बेट निर्माण निर्माण करायची क्षमता सामान्य माणसाच्या समूहशक्तीत आहे.. त्यासाठी त्याला आपला कोश तोडून बाहेर यावे लागेल.

कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात..

लढाईच्या अंतिम क्षणी
संसाराचा कोश तोडून
सामान्याच असामान्य होतात
लढाई जिंकतात
आणि पुन्हा कोशात जाऊन
सामान्य होतात
विजयाची मिरवणूक ते परस्थ्पणे
आपल्या घराच्या खिड्क्यातूनच पाहतात…

–ऍड. हरिदास उंबरकर
बुलढाणा

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..